मुंबई : (Uddhav Thackeray Saamana Interview) उबाठा खासदार संजय राऊत यांनी उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. ‘सामना’तून ही उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ मुलाखत येत्या १९ आणि २० जुलै रोजी दोन भागांमध्ये प्रसारित होणार आहे. मुलाखतीला ‘ब्रँड ठाकरे’ अशी टॅगलाईन देण्यात आली आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी एक्सवर टीझर पोस्ट करुन माहिती दिली आहे. १९ आणि २० जुलैला सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे मिळणार, असेही या टीझरमधून सांगितले जात आहे.
उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामना 19 आणि 20 July सर्व प्रश्नांची रोख ठोक उत्तरे! pic.twitter.com/eYvXlW0Z6z
या दोन मिनिटाच्या टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान संजय राऊतांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ठाकरे वारे काही हटत नाहीत, ते काही थंड पडत नाहीत, असे राऊतांनी विचारल्यानंतर, त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ठाकरे म्हणजे संघर्ष. आणि हा संघर्ष 'मतलबी' वाऱ्यांसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी आम्ही करत आलो आहोत. माझे आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब मग मी आहे, आदित्य आहे. आणि आता राजही सोबत आलेला आहे”, असे म्हणत त्यांनी मनसे बरोबरच्या युतीबाबत पुन्हा एकदा सूचक विधान केले आहे.
युतीबाबत कोणतंही भाष्य नको
एकीकडे उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक असल्याचे बोलत असले तरी राज ठाकरेंनी सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात आहे. "विजयी मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता, त्याचा राजकारणाशी संबंध नाही. नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान चित्र स्पष्ट होईल, त्यानंतर युतीसंदर्भात बघू", असे विधान राज ठाकरे यांनी इगतपुरी येथे सुरू असलेल्या तीन दिवसीय शिबिरादरम्यान पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना केले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\