“वीर परिवार सहायता योजना २०२५” – सैनिक परिवारांसाठी मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र सुरू
09-Aug-2025
Total Views |
मुंबई, भारतीय सैनिकांच्या त्याग, पराक्रम आणि योगदानाप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना सन्मान देण्यासाठी “वीर परिवार सहायता योजना २०२५” अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई उपनगर, कलिना येथे मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बांद्रा यांच्या द्वारे विधी सेवा केंद्राची स्थापना मा. प्रमुख न्यायाधीश, श्रीमती ठाकरे, कौटुंबिक न्यायालय आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजळ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या केंद्राचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर मुकुल चितळे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कल्याण संघटक सुभेदार धनंजय आफळे, कार्यालयीन कर्मचारी, माजी सैनिक आणि विधिज्ञ राजू मोरे उपस्थित होते.
या केंद्राच्या माध्यमातून आजी/माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता-पिता आणि अवलंबितांना पेन्शन, जमिनीचे हक्क, न्यायालयीन प्रकरणे, कौटुंबिक वाद, वैवाहिक वाद आदी विषयांवर त्वरित व विनामूल्य कायदेशीर सल्ला मिळणार आहे. या उपक्रमामुळे सैनिक परिवारांची कायदेशीर साक्षरता वाढून, आपल्या हक्क व सुविधांविषयी जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.