रमी : पत्त्यांची आणि ऑनलाईन क्रीडाविश्वातली...

    10-Aug-2025
Total Views |

गेले महिनाभर महाराष्ट्रामध्ये रमी या खेळाचे नाव अनेकदा चर्चेत आले. त्याला कारण झाले मंत्री माणिकराव कोकाटे. या आधीही रमीसद़ृष्य खेळ ऑनलाईन जाहिरातीमुळे प्रसिद्ध झाले असले, तरी ते योग्य की अयोग्य यावर देशात चर्चा सुरूच आहे. या रमी खेळाचे स्वरूप, इतिहास, त्याचे प्रकार यांचा घेतलेला आढावा...

नाशिकच्या सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ, त्यांच्या विरोधकांनी समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला. यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या. ’शेतकर्यांनो विसरा हमी, खेळा रम्मी,’ असा खणखणीत टोलाही त्यांना विरोधकांकडून लगावण्यात आला.

त्यानंतर अखेर दि. ३१ जुलै रोजी फडणवीस सरकारमध्ये दोन फेरबदल झाले. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिमंत्रिपद काढून घेतले आणि त्यांना क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय देण्यात आले. ”कोकाटे यांच्याकडून याआधीही एकदा असेच घडले होते, तेव्हा मी दखल घेत त्यांना समज दिली होती. यानंतर दुसर्यांदा घडल्यावरही त्यांना मी जाणीव करून दिली होती. इजा झालं, बिजा झालं, तिजाची वेळ आणून देऊ नका,” असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटे यांना म्हटले.

जागतिक महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत विजेत्या दिव्या देशमुखचा दि. २ ऑगस्ट रोजी, राज्य शासनाच्यावतीने ‘नागरी सत्कार’ करण्यात आला. क्रीडा खाते स्वीकारल्यानंतर कोकाटे यांचा हा पहिलाच शासकीय कार्यक्रम होता.

एकाने योग्यच म्हटले आहे की, मंत्र्याने आपल्या खात्याशी संबंधित सामाजिक घटकांविषयी संवेदनशील राहून, समर्पित वृत्तीने त्यांच्यासाठी काम करणे अपेक्षित असते. अशी समर्पित वृत्ती आणि क्रीडा खात्यातील ज्ञान संपादन करण्यासाठी त्या लोकांना आपण उपहासाने म्हणू शकतो की, आता रमीचे ज्ञान संबंधितांनी संपादन करावे. भले ते ज्ञान देणारे भारतात उपलब्ध नसतील, तरी विदेशातील तज्ज्ञाला मुंबई मुक्कामासाठी पाचारण करावे किंवा स्पेनसारख्या देशाचा एक दौरा आयोजित करून, आपले राज्य आणि देश रमी निष्णात करावा. कारण, आपण ‘रम-रमा’ हे बघत आलो आहोतच; पण आजकालच्या रमीचा प्रवेश या ‘र’मध्ये होऊ नये म्हणजे मिळवले. आईवडिलांनी मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे मुलाने ऑनलाईन रमीमध्ये गमावले. त्यानंतर कुटुंबीय काय म्हणतील, याच्या चिंतेतून त्याने आत्महत्या केली. ही बातमीदेखील चिंतेत टाकणारी असली, तरी रमीकडे एक कार्ड गेम म्हणून बघणारेही अनेकजण आहेत.

माननीयांची वर उल्लेख केलेली उपहासात्मक बाब

संबंधितांनी सोडून देऊन मला कृपया माफी द्यावी कारण, यातील रमीकडे केवळ एक कार्ड गेमहा एक क्रीडा प्रकार म्हणून मी बघत आहे. आज चर्चेत असलेल्या रमीच्या बाबतीत असलेले माझ्याकडचे संकलित ज्ञान, येथे त्यानिमित्त मला शेअर करावेसे वाटते एवढेच.

अनेकांनी आयुष्यात एकदातरी रमीचा डाव खेळला असेल किंवा जवळून बघितला असेल. हा पत्यांचा खेळ आता ऑनलाईनही उपलब्ध आहे. ‘कोणीही ‘जंगली रमी’ अॅपवर मोफत रमी खेळू शकतो. रमीच्या स्पर्धा काही ठिकाणी होतात पण, आंतरराष्ट्रीय स्तरावर फार होत नाहीत. त्यांचे आयोजन स्थानिक पतळीवरच अधिक होते. या लासिक ’कार्ड गेम’चा इतिहास जाणून घेण्याचा आपण येथे प्रयत्न करू.

बैठ्या खेळाचा एक लोकप्रिय प्रकार म्हणजे पत्ते. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत व सर्व स्तरांच्या लोकांमध्ये, पत्त्यांचे विविध खेळ लोकप्रिय आहेत. प्राचीन काळातील पत्त्यांचा लोकप्रिय भारतीय खेळ म्हणजे ‘गंजीफा.’ आधुनिक काळात पत्त्यांचे अगणित खेळ आहेत. पत्त्यांच्या खेळांत एका खेळाडूपासून ते अनेक खेळाडूंना भाग घेता येईल, असे विविध प्रकार रूढ आहेत. ’पेशन्स’ किंवा ’सॉलिटेअर’ हा एकाच व्यक्तीने खेळल जातो. यामध्ये जवळजवळ ३५० प्रकार रूढ आहेत. दोन व्यक्तींना खेळाण्यासाठी ‘पिकेट’सारखे प्रकार लोकप्रिय आहेत. तीन व्यक्तींचे ‘पाच-तीन-दोन’सारखे प्रकार आहेत. चार खेळाडूंसाठी ‘ब्रिज’, ‘व्हिस्ट’, ‘सात हाती’सारखे खेळ आहेत. ‘नॅप’ या खेळात दोन ते सहापर्यंत खेळाडूही सहभागी होतात. रमी या खेळातही जास्त संख्येने खेळाडू सहभागी होऊ शकतात.

पत्ते विशिष्ट प्रकारांनी जुळवण्याच्या खेळांमध्ये, ‘पोकर’सारख्या अत्यंत कौशल्यपूर्ण खेळापासून ते रमीसारख्या अनेक पद्धतींनी खेळता येणार्या खेळांचा समावेश होतो. आता आपण रमीचा इतिहास पाहू. रमीचे मूळ अनेक ठिकाणी असल्याचे मानले जाते. मात्र प्रचलित सिद्धांतानुसार, रमीची उत्पत्ती स्पेनमध्ये झाल्याचा उल्लेख आढळतो. नंतर १९व्या शतकात स्पॅनिश लोकांच्या स्थलांतरणामुळे हा खेळ अमेरिकेत पसरला. या खेळाचे मूळ नाव ‘कॉन्क्वियन’असे होते, जे या खेळाचे पहिले रूप मानले जाते.

एकाच समान चिन्हाच्या तीन वा अधिक पत्त्यांची क्रमवार रचना म्हणजे ‘सिक्वेन्स’. तसेच, समान आकड्यांच्या वा चित्रांच्या तीन वा चार पत्त्यांची जुळणी करणे, हे रमी या खेळाचे मुख्य तत्त्व होय. या जुळणीच्या आधारे रमीचे अनेक प्रकार रूढ आहेत. ते सामान्यतः पाच गटांत विभागले जातात; (१) रमी हा मूळ प्रकार, (२) ५०० रमी या गटात ‘कॅनास्ता’, ‘ओलाहोमा’ इत्यादी प्रकारांचा समावेश होतो, (३) कॉन्ट्रॅट रमी, (४) नॉक रमी (यातून ‘जीन रमी’ हो लोकप्रिय प्रकार उगम पावला), (५) काँक्विअन (यातून ‘पॅन’ हा प्रकार निर्माण झाला). यांपैकी काही खेळांत फक्त एकाच प्रकारची जुळणी मान्य असते. उदा. ‘कॅनास्ता’ या खेळात क्रमरचना निषिद्ध मानली जाते.

सतराव्या शतकापासून अशा प्रकारच्या जुळणीतत्त्वाचा अवलंब होत असे. जुळणीतत्त्वावर आधारित ‘मॉजाँग’ या प्राचीन चिनी खेळातही रमीची पूर्वचिन्हे आढळतात. पत्त्यांमध्ये पोकर हा सुद्धा लोकप्रिय खेळ आहे. यामध्ये खेळाडू पत्त्यांच्या आधारावर पैशाची बाजी लावतात. अमेरिकेतील स्पॅनिश स्थलांतरितांच्या कथेप्रमाणेच, रमीला पोकरशी जोडणारे अनेक सिद्धांत आहेत. व्हिस्की पोकर नावाचाही पोकरचा विशिष्ट प्रकार, आजच्या रमीशी जुळणारा आहे. पुढे त्याला ‘रम पोकर’ म्हटले जाऊ लागले आणि अखेरीस तो खेळ फक्त रमी म्हणून प्रसिद्ध झाला. मूळ रमीबद्दलचा आणखी एक सिद्धांत असा आहे की, त्याचे नाव ब्रिटिश अपभ्रंश ‘रम’पासून आले आहे. त्याचा अर्थ विचित्र असा आहे. ब्रिटिशांनी या खेळाला मनोरंजनाचा एक विचित्र मार्ग म्हणून पाहिले. जेव्हा हा खेळ लोकप्रिय झाला, तेव्हा त्याला रमी हे नाव मिळाले. काही लोक असेही मानतात की, त्याचे नाव रम या अल्कोहोलिक पेयापासून आले असून, पूर्वी हा खेळ अल्कोहोलिक पेयांसाठी खेळला जात असे.

बहुतेक लोक रमीची उत्पत्ती स्पेन किंवा इंग्लंडमध्ये झाल्याचे मानतात. परंतु, या खेळाची उत्पत्ती चीनमध्ये झाल्याबद्दलही एक पर्यायी सिद्धांत प्रसिद्ध आहे. हजार वर्षांहून अधिक काळ अस्तित्वात असलेला ‘माहजोंग’ हा एक चिनी पत्त्यांचा खेळ प्रसिद्ध आहे. हा खेळ टाईल्स वापरून खेळला जातो. मराठीत याला ‘माहजोंग’ किंवा ‘माह-जोंग’ असेच म्हणतात. हा खेळ चार खेळाडूंद्वारे खेळला जातो. यामध्ये टाईल्स जुळवणे किंवा सेट करणे आवश्यक असते. माहजोंग रमीसारखाच असल्याचा दावा यामुळे केला जातो की, दोघेही जिंकण्यासाठी पत्ते काढण्याची आणि टाकून देण्यासाठी समान तंत्र वापरतात. ‘माहजोंग’नंतर भारतात पसरला आणि भारतीय रमीसाठीचा मार्ग मोकळा झाला. हा खेळ रमीचाच एक प्रकार आहे, ज्यामध्ये खेळाच्या सुरुवातीला प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार्या १३ पत्त्यांमधून आवश्यक संयोजन करणे समाविष्ट आहे. जर एका टेबलावर दोनपेक्षा जास्त खेळाडू असतील, तर ५२ पत्त्यांचे दोन डेक आणि प्रत्येक डेकसह एक जोकर वापरला जातो.

रमीच्या उत्पत्तीबद्दल कोणता सिद्धांत योग्य आहे, हे आपण कधीही निश्चितपणे सांगू शकणार नाही.

आजकाल तुम्ही कधीही, कुठेही ऑनलाईन पद्धतीने रमी खेळू शकता. यमुळे स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेशन असलेल्या प्रत्येकासाठी हा खेळ सहज उपलब्ध झाला आहे. त्यांना कार्ड डेक बाळगण्याची किंवा साथीदाराची वाट पाहण्याची गरज भासत नाही. तुम्ही ‘जंगली रमी’ अॅपवर रोख बक्षिसांच्या स्वरूपात, खरे पैसेही जिंकू शकता.

रमी या खेळात कितीही खेळाडू भाग घेऊ शकतात. जास्त खेळाडू असल्यास पत्त्यांचे दोन जोड वापरले जातात. या खेळाचे निश्चित व सर्वमान्य असे नियम नाहीत. त्यामुळे त्यात अनेकदा बरेच प्रकारभेद आढळतात. पाच खेळाडूंमध्ये पत्त्यांचे दोन जोड घेऊन डाव कसा खेळला जातो, हे येथे वानगीदाखल दिले आहे. प्रत्येकाला १३ पत्ते वाटल्यानंतर, उरलेले पत्ते सर्व खेळाडूंच्या मध्यभागी पालथे ठेवायचे व त्यांतील एक पान उघडे करायचे. या पत्त्याच्या रंगाचे किंवा विरुद्ध रंगाचे पत्ते आणि जोकरची पाने रमीत जोकर म्हणून धरली जातात. ती कोणत्याही पत्त्याऐवजी, डाव लावताना पूरक म्हणून वापरता येतात. पत्ते वाटलेल्या खेळाडूच्या उजव्या हाताला बसलेला खेळाडू, उर्वरित पत्त्यांमधील एक पत्ता घेऊन खेळास सुरुवात करतो व हातातले नको असलेले पान टाकून देतो. त्याच्या पुढच्या खेळाडूला पूर्वीच्या खेळाडूने टाकलेले पान घेता येते. अन्यथा तो संचातला एक नवीन पत्ताही घेऊ शकतो. अशा पद्धतीने खेळ चालू राहतो व अखेरीस मान्य जुळणीतत्त्वानुसार ज्या खेळाडूची सर्व पाने लागतील, त्याला रमी मिळाल्याचे मानले जाते. बाकीच्या खेळाडूंच्या न लागलेल्या पानांची जी बेरीज होईल, तितके गुण जिंकणार्या खेळाडूला मिळतात. रमीचे डाव बहुधा पैसे लावून खेळतात वा निव्वळ करमणुकीखातरही खेळले जातात. हा खेळ भारतात पुष्कळच लोकप्रिय आहे.

पत्ते खेळणे पूर्णपणे योग्य किंवा अयोग्य नसते. त्याचा वापर कसा केला जातो, यावर ते अवलंबून असते. मनोरंजनासाठी किंवा मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी पत्ते खेळणे ठीक आहे परंतु, पैसे लावून खेळल्यास ते अयोग्य ठरते. कारण, त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. पत्यांमध्ये जास्त वेळ घालवल्याने, इतर महत्त्वाची कामेही दुर्लक्ष होऊन वेळेचा अपव्यय होतो. कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ शकते. काहींसाठी हा खेळ व्यसनदेखील होते. पत्ते खेळणे मनोरंजन म्हणून ठीक आहे परंतु, ते जास्त प्रमाणात किंवा पैशासाठी खेळणे टाळले पाहिजे. अन्यथा, रम-रमाच्या जोडीला रमीचा प्रवेश कसा होईल, हे कळणारही नाही.

जनतेला सावध करणेच राज्य सरकारांच्या आणि न्यायव्यवस्थेच्या हातात आहे. काही राज्यांमध्ये ऑनलाईन रमीवर बंदी आहे, तर काही राज्यांमध्ये ते चक्क कायदेशीर आहे. केरळ उच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये ऑनलाईन रमीवरील बंदी उठवताना, रमी हा कौशल्याचा खेळ असल्याचे सांगत, एका तर्हेने रमीचे समर्थन केले होते. केरळमधील रमीच्या दृष्टिकोनाबाबत विशेषतः युक्तिवाद करण्यात आला. ऑनलाईन रमीवर बंदी असताना, भौतिक रमीला परवानगी देता येत नव्हती. यामुळे गेमसाठी बनवलेल्या ऑनलाईन अॅप्सचे, मोठे आर्थिक नुकसान होत होते. सरकारने यापूर्वी केरळ गेमिंग कायदा १९६०च्या ‘कलम १४अ’च्या अधिसूचनेनुसार, रमीवर बंदी घातली होती. त्यांनी असाही दावा केला की, ‘कलम १९’चे उल्लंघन झाले आहे कारण, या बंदीमुळे कंपन्यांना मुक्त व्यापार करता येत नाही. मुख्य मुद्दा स्टेकच्या भूमिकेबद्दलदेखील होता आणि याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की, सरकारचा निर्णय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांच्या विरोधात आहे. त्यांनी आंध्र प्रदेश राज्य विरुद्ध सत्यनारायण आणि केआर लक्ष्मणन विरुद्ध तामिळनाडू राज्य, या निकालाचा आधार घेतला होता.

भारतातील ऑनलाईन रिअल मनी गेमिंग (RMG)


रमीसारखी ऑनलाईन गेमिंग सेवा ही कौशल्याचा खेळ आहे की संधीचा खेळ आहे, असा वाद नेहमीच न्यायालयात येत असतो. तसाच एक वाद म्हणजे, रमी कौशल्याचा खेळ मानल्यास, त्यावर आकारला जाणारा ‘जीएसटी’चा दर आणि जर तो संधीचा खेळ मानला, तर त्यावर आकारला जाणारा ‘जीएसटी’चा दर यात भिन्नता असते. या वादात असलेल्या एका महत्त्वाच्या खटल्याची अंतिम सुनावणी चालू असून, किती कोटी रुपयांच्या कर भरायचा हा निकाल अपेक्षित आहे. फॅन्टसी स्पोर्ट्स, रमी आणि पोकर हे कौशल्याचे खेळ आहेत की नाही, यावर ज्युरी अजूनही अनिश्चित आहे. विविध उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायायाची भुमिकाही भिन्न आहे. ऑनलाईन रमीचे कायदेशीर स्वरूप एक गुंतागुंतीचा विषय आहे. क्रिकेटपटू, सिनेक्षेत्रातील तारे-तारका या सर्वांकडूनच ऑनलाईन रमीची जाहिरात करण्यात येते. अशांचा जनमानसावर नक्कीच परिणाम होतो, असे परिणाम रोखायला जनमानसाची अंतरिक इच्छाशक्ती मोलाची ठरते. ती कशी प्रबळ करायची हे बघायला हवे.

‘कार्ड गेम’वाली रमी ही कामकाज चालू असो अथवा नसो, ती कुठे, कोणी, कोणत्याही कारणाने लक्ष्मी अपमानित होणार नाही याची काळजी घेत, समाजातील सर्वच प्रकारच्या मंडळींनी खेळावी की न् खेळावी, हे सुज्ञास सांगणे न लगे! अन्यथा पत्यांच्या खेळातील रमी आपला पत्ता कधी कट करेल, हे समजणारही नाही. चला तर मंडळींनो याचा विधिनिषेध बाळगू, मर्यादा पाळत काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजून घेऊन, अयोग्य गोष्टींपासून स्वतःला वेळीच दूर ठेवत, त्या कार्ड गेमचा निखळ आनंद तेवढा घेऊ.


श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
९४२२०३१७०४