Air India Plane Crash updates: आजारी वडिलांसाठी कॅप्टन सुमीत घेणार होते निवृत्ती, पण दैवाच्या मनात काहीतरी वेगळचं होतं...
17-Jun-2025
Total Views | 33
मुंबई : आपल्या ८८ वर्षांच्या आजारी वडिलांची सुश्रूषा करण्यासाठी सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय अहमदाबाद अपघातग्रस्त विमानाचे कॅप्टन सुमीत यांना घ्यायचा होता. मात्र तो आम्हाला आता सोडून गेला आहे, अशा भावना त्यांच्या एका जवळच्या मित्राने व्यक्त केल्या आहेत. अहमदाबाद विमान दु्र्घेटनेत बळी ठरलेले कॅप्टन सुमीत सभरवाल यांचे पार्थिव मंगळवार दि. १४ रोजी त्यांच्या मुंबईतील घरी परतले. यावेळी, कॅप्टन सुमीत यांना अंतिम निरोप देण्यासाठी त्यांच्या परीवारातील सदस्य मित्र, शेजारी आणि सहकारी उपस्थित होते. दरम्यान, ते राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. कॅप्टन सुमीत यांच्या ८८ वर्षीय वडीलांनी भावूक होऊन आपल्या मुलाला निरोप दिला.
कॅ.सुमीत यांच्यावर चकाला येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडोंचा जनसमुदाय उपस्थित होता. कॅप्टन सुमीत यांच्या आठवणींना अनेकांनी उजाळा दिला. त्यांचा शांत स्वभाव अनेकांना आपलासा करुन घेई. ५६ वर्षीय कॅ. सुमीत यांना तब्बल ८ हदार २०० तासांहून अधिक विमान उड्डाणाचा अनुभव होता.
अपघातावेळी प्राथमिक अहवालांनुसार, त्यांनी उड्डाणानंतर लगेचच मेडे कॉल दिला होता. पण, हा कॉल अयशस्वी ठरला. २४२ प्रवाशांनी यात आपला जीव गमावला. कॅ. सुमीत यांना निरोप देण्यासाठी ज्येष्ठ उद्योगपती निरंजन हिरानंदानी उपस्थित होते. ते म्हणाले, “प्रत्येकाने विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. या गोष्टीचा सखोल तपास व्हायला हवा. अशा प्रकारे होणारे शेकडो मृत्यू आपल्याला परवडणारे नाहीत. सुमीत प्रमाणेच आज अनेक कुटूंबं उद्धवस्त झाली आहेत. केवळ विमान वाहतूक क्षेत्रातच नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात सुरक्षिततेला प्राधान्य द्यायला हवे.”
बाबांची काळजी घेण्यासाठी होणार होते निवृत्त
कॅप्टन सुमीत यांच्या एका जवळच्या मित्राने सांगितले कि, "सुमीत एक अद्भूत व्यक्ती होता. मी माझे अश्रू आवरू शकत नाही. त्याने आतापर्यंत त्याच्या आजारी वडिलांची खूप काळजी घेतली. लवकरच आपला पूर्ण वेळ वडीलांना देण्यासाठी सुमीत आपल्या सेवेतून निवृत्त होणार होता. आम्ही खरोखर एक चांगला माणूस गमावला."