नवी दिल्ली, अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या एएआयबीच्या प्राथमिक अहवालाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उत्तर दिले.
अहमदाबाद विमान अपघाताबाबत एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) च्या अहवालात पक्षपातीपणाच्या आरोपांना सरकारने उत्तर दिले आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी संसदेत सांगितले की एएआयबी तपशीलवार, नियम-आधारित प्रक्रिया पाळते आणि पूर्णपणे निष्पक्ष आहे. तपास नियमांनुसार केला जात आहे. परदेशी प्रसारमाध्यमे एएआयबी अहवालाबद्दल खोटे वार्तांकन करत असल्याचाही ठपका त्यांनी ठेवला आहे.
ते पुढे म्हणाले की, विमान अपघाताच्या कारणांवर कोणताही निष्कर्ष काढणे अद्याप घाईचे आहे कारण तपास अद्याप सुरू आहे आणि अंतिम अहवाल मूळ कारणांसह बाहेर येईल. त्यांनी सर्वांना वेळेपूर्वी कोणत्याही अफवा पसरवू नयेत असे आवाहनही केले. एएआयबीला अपघातग्रस्त एअर इंडिया विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटा डीकोड करण्यात यश आले आहे, याकडेही केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले.
एअर इंडियाला ९ नोटीशी जारी – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री
नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी राज्यसभेत सांगितले की, गेल्या सहा महिन्यांत एअर इंडियाला ५ वेगवेगळ्या सुरक्षा उल्लंघनांसाठी एकूण ९ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. एका उल्लंघनावर कारवाई पूर्ण झाली आहे.