सौदीचा नवा अभ्यासक्रम

    21-Jul-2023   
Total Views |
Anti-Israeli content removed from textbooks in Saudi Arabia

इस्रायलच्या निर्मितीनंतर आजूबाजूच्या अरब देशांनी इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर जे झाले, त्याचा संदर्भ देण्यासाठी आजचा विषय आहे. जेव्हा शेजारच्या, आजूबाजूच्या मुस्लीम राष्ट्रांनी इस्रायलवर हल्ला केला, त्यावेळी इस्रायलने त्या हल्ल्याला चोख उत्तर तर दिलेच ; उलट गाझापट्टी आणि आजूबाजूच्या प्रदेशावरही सत्ता प्रस्थापित केली. त्यातही जेरूसलेम आणि अल अक्सा, हे कायमच ज्यू, मुस्लीम आणि ख्रिश्चनांसाठी संवेदनशीलतेचा मुद्दा ठरला. मुस्लिमांसाठी, तर अल अकसा मशीद म्हणजे मक्का-मदिनानंतरचे पवित्र स्थान. त्यामुळे मुस्लीम देश इस्रायलच्या कायमच विरोधात. ज्यू आणि त्यांचा देश इस्रायल याच्याबद्दल जगभरातल्या मुस्लीम राष्ट्रांच्या मनात द्वेषाचेच वातावरण होते.

तेच का? आपल्या भारतातल्या अगदी गल्लीबोळातल्या काही मुस्लिमांस विचारले, तर अपवाद वगळता बहुतेकांना इस्रायल म्हणजे मुस्लिमांचे शत्रू राष्ट्र असेच माहिती आहे. (कदाचित त्यामुळेच, तर मुंब्रा येथील मुस्लीम मतदारांची मतं पदरात पाडून घेण्यासाठी तेथील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मागे ’सेव्ह गाझा’चे टिशर्ट घातलले असावे.) असो. तसेही १९४८ पासून मुस्लीम देश आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू झालेला संघर्ष सातत्याने या ना त्या कारणाने सुरूच आहे. १९७७ साली जरा वेगळे वातावरण तयार झाले. कारण, कायमच तणावाच्या स्थितीत राहण्यापेक्षा, युद्धसदृश्य जीवन जगण्यापेक्षा इस्रायलशी समन्वय साधावा, असा प्रयत्न इजिप्तच्या तत्कालीन पंतप्रधानांनी अल सादात यांनी केला.

दि. १९ नोव्हेंबर १९७७ रोजी इस्रायलच्या संसदेमध्ये शांती करार मांडण्यासाठी त्यांनी जेरूसलेम येथे दौरा केला. त्याला किमान यश लाभले. पुढे त्यांना यासाठी ’नोबेल’ पुरस्कारही प्राप्त झाला. पण, इस्रायलशी संवाद साधला, शत्रू राष्ट्राकडे शांतीचा प्रस्ताव मांडला. म्हणून जगभरातल्या मुस्लीम राष्ट्रांनी इजिप्त आणि अल सादात विरोधात आघाडीच उघडली. पुढे अल सादात यांची १९८१ साली हत्याही झाली. इस्रायल आणि इजिप्त शांती समन्वयाला अडथळा आला. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मुस्लीम देशांवर दबादबा असलेल्या सौदी अरेबियाचे वर्तन इस्रायलच्या बाबतीत काही वेगळे नव्हते. सौदी अरेबियाने, तर इस्रायलला मदत करणार्‍या आणि मैत्री असणार्‍या राष्ट्रांवर आर्थिक बहिष्कारच घातला होता. या देशांशी पेट्रोल निर्यात बंदी केली होती.

सौदी अरेबियाच्या शाळांमध्ये पूर्वी भूगोल विषयामध्ये जगाचा नकाशाही असायचा. मात्र, त्या नकाशामध्ये इस्रायल देशच नसायचा. थोडक्यात, इस्रायल नावाचा देश जगात आहे, असे मान्य करण्यासच सौदी अरेबियासह अनेक मुस्लीम राष्ट्रांचा नकार होता. इतकेच काय आता सौदी अरेबियाच्या पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमात ज्यू समाजातील व्यक्तींचा उल्लेख ’डुक्कर‘आणि ’माकड‘ असाही केलेला होता. मात्र, परिर्वतन हाच विश्वाचा नियम आहे. हे गीतेतले वाक्य इथेही लागू झाले आहे. जे कालपर्यंत एकमेकांचे कट्टर शत्रू होते, ते आज एकमेकांचे शुभचिंतक झाले आहेत. सौदी अरेबियाने इस्रायलला शत्रूराष्ट्राच्या यादीतून बाहेर काढल्यासारखे वरवरचे चित्र आहे. कारण आता सौदीच्या भूगोलामध्ये इस्रायल देशाचा नकाशा दिसणार आहे. तसेच, सौदीच्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्यू संदर्भात आक्षेपार्हरित्या ‘माकड’ किंवा ‘डुक्कर’ वगैरे जे काही लिहिले गेले होते, ते आता वगळण्याचे ठरले आहे. त्यावर कारवाई होत आहे.

पण, सौदी अरेबियाला इस्रायलबद्दल हा साक्षात्कार का झाला असेल? संयुक्त अरब अमिराती ज्याला ‘युएई’ म्हटले जाते, या दोन देशांचे जगभरातल्या मुस्लीम देशावर वर्चस्व कुणाचे यावरून वाद आहेत. पेट्रोलच्या निर्यातीवरून दरावरून या दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. ’ओपेक’ या संघटनेमध्ये सौदी अरेबियाचा दबदबा आहे. यापूर्वीही कतारवर सौदी अरेबियाने इतर मुस्लीम देशांच्या मदतीने आर्थिक बहिष्कार टाकला होता, तर दुसरीकडे सौदी अरेबियाने सीरियासारख्या देशाला मदत करून मुस्लीम देशांचा कैवारी म्हणून दाखवले होते.

युएईच्या विरोधात आर्थिक आणि सर्वच स्तरावर शक्तिशाली होण्यासाठी सौदी अरेबियाला आजूबाजूच्या राष्ट्रांशी शत्रुत्व करणे महागात पडू शकते. केवळ युएईला शह देण्यासाठी सौदी अरेबियाने इस्रायलबाबत हे पाऊल उचलले असेल का?

९५९४९६९६३८

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.