भारतीय संस्कृतीत सुरक्षित, सुखी आनंदी व स्वस्थ जीवनासाठी अनेक धार्मिक संस्कार विधिपूर्वक करण्याची परंपरा आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हे संस्कार परिस्थितीनुसार बदलून, पण मूळ स्वरूप कायम ठेवून ‘डिजिटल मोड’मध्ये ऑनलाईन करता येतील.
आजच्या ‘डिजिटल’ जागतिकीकरणाच्या युगात, भारतात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून अनेक विकासाची कामे केली जात आहेत. पायाभूत सुविधा जागतिक दर्जाच्या होत आहेत. अनेक प्रशस्त महामार्ग, उत्तुंग कार्यालयीन व निवासी इमारती, आधुनिक उपकरणांनी सज्ज अशी रुग्णालये, घरात वापरायची आधुनिक उपकरणे यांचा वापर होताना व ’जीपीएस सिस्टीम’सारख्या आधुनिक उपकरणांनी व नव्या तंत्रज्ञानाने युक्त अशी वाहने रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. प्रत्येक लहानथोरांच्या हातात बाजारात येणारे नवे नवे मोबाईल फोन दिसत असून, त्यावरून बातम्या, शाळा महाविद्यालयाचे शिक्षण, परीक्षा, चित्रपट, नाटक टीव्ही मालिका पाहणे व ईमेल-चॅट, बँकेचे व्यवहार, अनेक गोष्टींची खरेदी विक्री, नाटक, चित्रपट रेल्वे विमाने यांच्या तिकिटांचे बुकिंग करणे अशी अनेक कामे शाळकरी मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण करताना दिसताहेत. थोडक्यात, गाव पातळीपासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत देश ’स्मार्ट’ होताना दिसत आहे.
फोन, कम्प्युटर व देश ’स्मार्ट’ होत असताना, आपण स्वतः ’स्मार्ट’ होण्यासाठी जी शिस्त आपण आपल्यात बाणवून घ्यावयास हवी त्याबद्दल मात्र अजून बेफिकीर आहोत. त्यामुळे रस्त्यावरील अपघात, शॉर्टसर्किटकिंवा जुन्या ट्रान्सफॉर्मर व इतर अनेक विजेवर चालणार्या यंत्रांची वेळेवर नियमित न होणारी देखभाल व दुरूस्ती त्यामुळे लागणार्या आगी, पूल, इमारती कोसळणे, गर्दीचे नियोजन नीट न झाल्याने होणारी चेंगराचेंगरी अशासारख्या अनेक दुर्घटना होऊन प्रचंड जीवित व वित्त हानी होत आहे व हे प्रमाण वाढतच चालले आहे.
निसर्गाच्या कोपामुळे व मनुष्याच्या चुकीमुळे होणार्या दुर्घटना, ज्यांची आता तंत्रज्ञानाच्या वापराने आगाऊ सूचना मिळू शकते यावर त्वरित कारवाई न करण्याने होणार्या व इतर अनेक कारणामुळे होणार्या बहुतेक दुर्घटना या मनुष्यनिर्मित असतात असे आढळून येते. आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात या मानवनिर्मितदुर्घटनांची त्या झाल्यानंतर त्यांची चौकशी होऊन, दोषारोप सिद्ध होऊनही त्यावर पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अशा घटना सतत होतच राहातात, हे निदर्शनास येत आहे. नितीन गडकरी, रस्ते विकासमंत्री यांनीही रस्त्यांवरच्या विशेषतः शीघ्रगती महामार्गांवरील अपघातांची संख्या घटवण्यात आपण अयशस्वी ठरल्याची कबुली दिली आहे.
या दुर्घटनांची कारणे मुख्यत्वाने पुढीलप्रमाणे आहेत. कितीही कायदे नियम केले व त्यांची अंमलबजावणी केली तरी जोपर्यंत ही कारणे काही प्रमाणात तरी कमी करण्यासाठी एक देशव्यापी कठोर उपाययोजना केल्याशिवाय या सतत होणार्या दुर्घटनांना आळा बसेल, असे वाटत नाही.
या दुर्घटना व त्यातून होणारी जीवित व वित्तहानी यांची मुख्य कारणे पुढीलप्रमाणे :
जनता, सरकारी कर्मचारी, धोरण आखणारे सत्ताधारी व विरोधी राजकारणी अशा सर्व लोकांत असलेले स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेबद्दलचे अज्ञान व अनास्था.
रक्तात भिनलेली बेशिस्त व बेपर्वाई, निष्काळजीपणा,बेजबाबदारपणा, हलगर्जीपणा, ढिसाळ नियोजन व कायदे नियम मोडण्याकडे असलेला कल हे दुर्गुण.
’चलता है’, ’कुछ नही होगा’, ’जब होगा तब देखा जायेगा’ ही वृत्ती अनेक दुर्घटनांना कारणीभूत होते हे वास्तव आहे.
तसेच, कष्ट न करता, घाम न गाळता फुकटमिळणार्या वस्तूंची लूट करण्याचा स्वभाव अनेक दुर्घटनांना कारणीभूत होतो हेही दिसून आले आहे. याची उदाहरणे सांगायची झाली, तर अपघाताने तेलाची गळती होणार्या टँकरमधून तेल भरण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे तेलाला आग लागून अनेकजण मृत्युमुखी पडणे, अन्न किंवा वस्तूदान करण्याच्या मेळाव्यात गर्दीत चेंगराचेंगरी होऊन अनेक माणसे मरणे, बेशिस्त गर्दीत अफवा पसरवल्याने भगदड माजून मुले महिलांचा मृत्यू होणे हेही प्रकार झाले आहेत. ’बाय वन गेट वन फ्री’ या सेलमध्ये गर्दी होऊन अनेक महिला जखमी झाल्याची उदाहरणे आहेत.
सरकारी पातळीवरचा भ्रष्टाचार व लाचखोरी. त्यामुळे होणारी निकृष्ट दर्जाची बांधकामे.
प्रशिक्षित, सक्षम व पात्रता असणार्या, कायदे नियम जाणणार्या सरकारी निरीक्षकांची उणीव.
सरकारी निरीक्षकांना व कर्मचार्यांना त्यांच्या कामासाठी आवश्यक असणारी पण उपलब्ध न होणारी आधुनिक साधने.
क्षमता व पात्रता नसलेले पण इतर कारणांनी उच्च पदावर बसलेले सरकारी अधिकारी.
मतांसाठी लांगूलचालन व जातीपातीचे, आरक्षणाचे गलिच्छ राजकारण करणारे राजकारणी.
कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे व साधनांच्या अभावामुळेप्रत्यक्ष तपासणी न करता पाकिट खोके घेऊन कारखान्यातील बॉयलर, इमारतीतील लिफ्ट्स, इत्यादी यंत्रांचे फिटनेस प्रमाणपत्र देण्याची प्रथा.
ड्रायव्हिंग टेस्ट न घेता ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची अर्थपूर्ण प्रथा.
घरातली आधुनिक विजेची व इलेक्ट्रॉनिक उपकरणे त्यांच्या वापरासंबंधीची नीट माहिती न घेता केला जाणारा वापर, या अत्याधुनिक उपकरणांची उत्तम दर्जाचे सुटे भाग वापरून प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून दुरूस्ती देखभाल न करता थोडे पैसे वाचवण्याकरिता कोणाकडूनही केली जाणारी दुरूस्ती व देखभाल.
रहिवासी व कार्यालयीन आधुनिक उत्तुंग इमारतीतीललिफ्ट, अग्निरोधक व अग्निशमन यंत्रणा वापरण्याची माहिती नसणे, त्यांची योग्य अशी नियमित दुरूस्ती, देखभाल व चाचणी न घेणे, सरकारी यंत्रणेकडून फिटनेस सर्टिफिकेट न घेणे, आणीबाणीप्रसंगी या गोष्टींच्या वापरासाठी असलेले नियम व पद्धती माहीत नसणे व मदतीसाठी फोन नंबर हाताशी नसणे. कोणत्याही गोष्टी सातत्याने न करण्याची मानसिकता.
दुर्घटना टाळणे हे फक्त सुरक्षा यंत्रणेचे काम नसून सर्वांनी सुरक्षा नियम व उपकरणे यांची वापरण्या संबंधीची माहिती घेऊन, मधून मधून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेऊन सराव न करणे.
वेगाने प्रवास करण्यासाठी बांधलेल्या रस्त्यावर वेग मर्यादेचे नियम मोडून बेफाम वेगाने गाडी चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वाहन दुरूस्ती देखभाली अभावी वेगात जाण्यासाठी सक्षम नसणे, चालकाला दृष्टिदोष, रक्तदाब, ताणतणाव, अशा व्याधी असणे, मद्यपान करून वाहन चालवणे, पुरेशी विश्रांती न मिळाल्याने पहाटे डुलकी लागून गाडीवरचा ताबा सुटणे या गोष्टी रस्त्यावरील अपघातांसाठी कारणीभूत होतात हे माहीत असले तरी बेपर्वाईने वाहन चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालणे.
या कारणांवर जर जनतेचे प्रबोधन केले, तर त्याचा फायदा दुर्घटना टाळण्यासाठी होऊ शकतो. आपल्याकडे पूर्वापारपासून विजयादशमीला यंत्रे, शस्त्रे, उपकरणे यांची दुरूस्ती, साफसफाई व तेलपाणी करून त्यांनी वर्षभर उत्तम सेवा द्यावी, आणीबाणी प्रसंगी वापरताना त्यांनी धोका देऊ नये म्हणून त्यांची यथासांग पूजा केली जात असे. आज घरात व कार्यालयात फक्त फुले वाहून हे कार्य उरकले जाते.
कारखान्यांत ४ मार्च या राष्ट्रीय सुरक्षा दिनाच्या निमित्ताने पूजा, सुरक्षेची शपथ व प्रात्यक्षिके केली जातात. देशभरात ४ मार्चपासून १० मार्चपर्यंत सुरक्षा सप्ताह पाळला जातो. हे सर्व होत असले तरी, आगी, रस्त्यांवरचे अपघात, गर्दीतली चेंगराचेंगरी या दुर्घटना कमी न होता दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत व त्यामुळे होणारी जीवितहानी, वित्तहानी व उत्पादनांचे नुकसान हेही वाढत चालले आहे.
रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना करण्यात येत असतात. पण त्या उपाययोजना कार्यरत ठेवण्यासाठी नियोजनाचा व सातत्याचा अभाव असणे हे आपल्या आरंभशूरतेचे लक्षण नेहमीच दिसून आले आहे. आतातरी युद्ध पातळीवर खाली दिलेल्या गोष्टी अमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. वाहन चालक व वाहकांना सुरक्षेचे नियम पाळण्याचे प्रशिक्षण देणे व त्यांची नियमित उजळणी करणे. वाहनात प्रथोमपचार साहित्याची पेटी ठेवणे व त्यातील साहित्याची ‘एक्सपायरी डेट’ तपासून, नवे साहित्य ठेवणे, हे काम वाहन चालक व बसेसचे वाहक यांना देऊन त्याची सरकारी यंत्रणेद्वारे नियमित तपासणी करणे आवश्यक आहे.
वाहन चालक व वाहक यांना प्रथमोपचारांचे प्रशिक्षण व त्याची मधूनमधून उजळणी करणे गरजेचे सर्व जनतेसाठीही आणीबाणीप्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे नियम व प्रथमोचार यांचे प्रशिक्षण व प्रमाणपत्र आवश्यक करावे व हे प्रमाणपत्र प्रवासात जवळ बाळगणे अनिवार्य करावे. हे प्रमाणपत्र जवळ न बाळगल्यास पारदर्शीपणाने व प्रामाणिकपणे दंड वसूल करावा.
भारतीय संस्कृतीत सुरक्षित, सुखी आनंदी व स्वस्थ जीवनासाठी अनेक धार्मिक संस्कार विधिपूर्वक करण्याची परंपरा आहे. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हे संस्कार परिस्थितीनुसार बदलून, पण मूळ स्वरूप कायम ठेवून ‘डिजिटल’ मोडमध्ये ऑनलाईन करता येतील.
आजच्या ‘डिजिटल’ ऑनलाईनच्या जमान्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना सुरक्षेचे कायदे व नियम, आगी, रस्त्यांवरील अपघात, घरातील, सार्वजनिक ठिकाणचे अपघात टाळण्यासाठी करण्याची उपाययोजना व दुर्घटनेनंतर करावयाचे मदतकार्य याविषयीचे ऑनलाईन संस्कार वर्ग घेऊन व ते सक्तीचे करून, त्यांचे प्रमाणपत्र देण्याची देशव्यापी मोहीम आखल्यास दुर्घटनांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
‘डिजिटल’ तंत्रज्ञान व सुरक्षेविषयीचे तज्ज्ञ यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन ही देशव्यापी सुरक्षा मोहीम आखून तिची अंलबजावणी करण्यात पुढाकार घेणे देशहिताचे आहे. हे प्रशिक्षण व सराव याचा मुख्य फायदा असा होतो की प्रशिक्षित व्यक्ती केवळ नजरेने दुर्घटनेची, अपघाताची शक्यता ओळखू शकते व इतरांना सावध करू शकते. दुर्घटना घडल्यास, अधिकृत मदत येईपर्यंत उत्स्फूर्तपणे बचाव कार्य, प्रथमोपचार व जखमींना मदत करू शकते हा अनुभव आहे.
याचे एक उदाहरण म्हणून बर्याच वर्षांपूर्वीच्या एका आगीच्या घटनेचे व काही जपानी पर्यटकांनी आपले सामान घेऊन सुरक्षितपणे आपली आगीतून सुटका केली त्याचे देता येईल. दिल्लीच्या उत्तुंग अशोक या सरकारी पंच तारांकित बहुमजली हॉटेलच्या वरच्या मजल्यावर लागलेल्या भीषण आगीत अनेक लोकांचे धुरामुळे घुसमटून व उंचावरून खाली उड्या मारल्यामुळे प्राण गेले होते. पण त्याच आगीतूनही वरच्या मजल्यावर आधीच्या दिवशी प्रवेश घेतलेल्या काही जपानी प्रवाश्यानी, ज्यांनी प्रवेश घेतानाच जिन्यावरून सुरक्षित बाहेर पडण्याची वाट शोधून ठेवली होती, त्यांनी आपले कपडे व वस्तू घेऊन, तोंडाला ओले फडके रुमाल बांधून, बाथरूमचे नळ चालू ठेवून, मुख्य स्विच बंद करून, आगीच्या-भूकंपाच्या प्रसंगी लिफ्ट बंद केले जाते हे माहीत असल्याने व त्यांनी प्रशिक्षण घेऊन नियमित सराव केला असल्याने, सराईतपणे जिन्याने आपल्या सामानासकट सुरक्षितपणे खाली जमिनीवर येऊन आपले प्राण वाचवले.
याउलट आग विझवण्याचे प्रशिक्षण नसलेल्या सुरक्षा कर्मचार्याने अग्निशमन गॅसचे सिलिंडर आगीत फेकल्याने त्याचा स्फोट होऊन तो सुरक्षा कर्मचारी जखमी झाल्याचे उदाहरण आहे. घर, कार्यालये, कारखाने इत्यादी ठिकाणची दुर्घटना टाळण्यासाठीची उपाययोजना करताना, किंवा अपघात व इतर दुर्घटना घडल्यास, त्वरित मदत मिळण्यासाठी पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका व मदतकार्य करणार्या सरकारी यंत्रणांचे फोन नंबर सहज मिळण्यासारखे जवळ ठेवलेले असणे हे तर सगळ्यात महत्त्वाचे आहे. ’नजर हटी दुर्घटना घटी’ या रस्त्यांवरील सूचनांबरोबर ’प्रशिक्षण, सराव व सावधानता’ ही दुर्घटना, अपघात टाळण्यासाठीची त्रिसूत्री आहे, अशी जाहिरात करून प्रबोधन करणे गरजेचे.
चला तर आपण दुर्घटनांचे निमंत्रक न होता प्रतिबंधक होऊया. चला तर मग ’दुर्घटना मुक्त भारत’ निर्माण करण्याची शपथ घेऊया!
ज्ञानचंद्र वाघ