...आणि सुशील भाट ‘सीए’ झाला!

    06-Feb-2023   
Total Views |
Sushil Bhat


आयुष्यात दुःखच असेल, समस्याच असतील. मात्र, या सगळ्यांवर मात करत पुढे जाणारच, हा निश्चय केलेला भाट समाजातील पहिला ‘सीए’ झालेला युवक-सुशील भाट. त्याच्या जीवनाची ही कहाणी...

आज घरकामाला का आली नाहीस? असे म्हणून ती महिला मीराबाईंना वाट्टेल ते बोलू लागली. आपली तब्येत ठीक नाही, असे मीराबाई क्षीण आवाजात कसेबसे सांगत होत्या. मात्र, ती बाई मनाला येईल त्या शब्दात मीराबाईंचा अपमान करत होती. हे सगळे मीराबाईंचा दहा वर्षांचा मुलगा सुशील ऐकत होता. १८-१८ तास कष्ट करत अत्यंत गरिबीमध्ये आई घर सांभाळायची. आईचा अपमान सुशीलच्या जिव्हारी लागला. आपण गरिबीतून बाहेर यायचे, काहीतरी बनायचे असे त्यांनी ठरवले. आज तेच चोपडा, जळगावचेसुशील ‘सीए’ आहेत. अर्थात, ‘सीए’ होणे अशक्य नाही. मात्र, ज्या परिस्थितीतून, ज्या पार्श्वभूमीतून सुशील यांनी ‘सीए’ व्हायचे स्वप्न पूर्ण केले, तो एक प्रेरणादायी प्रवास आहे.

भाट समाजातले रघुवीर आणि मीराबाई हे दाम्पत्य. रघुवीर एका हाताने दिव्यांग, मणक्यांची शस्त्रक्रिया झालेले. ते बाजारातफळांची हातगाडी लावायचे. मीराबाई घरकाम करायच्या. या दोघांचा कष्टाचा दिवस सुरू व्हायचा तो रात्री केव्हा तरी मावळायचा. घरात हातभार लावावा म्हणून सुशील आठवीला असताना संध्याकाळी एका हॉस्पिटलमध्ये ‘रिसेपशनिस्ट’ म्हणून काम करू लागले. मित्रांची पुस्तकं उरलेल्या वह्यांतील कोरी पाने, असे सगळे साहित्य वापरून सुशील दहावीला पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांना इंजिनिअर बनायचे होते. पण, त्यावेळी अनेकांनी सुशील यांच्या वडिलांना सांगितले, ”मुलाला अजिबात विज्ञान शाखेत टाकू नकोस.

खर्च परवडणार आहे का तुला? कॉमर्समध्ये टाक, बारावीनंतर कुठेतरी नोकरीला चिटकेल” त्यामुळे मग सुशील वाणिज्य शाखेत रूजू झाले. बारावीला ते पूर्ण गावातून दुसरे आले. मात्र, रघुवीर यांचे म्हणणे, ”बस झाले शिक्षण, माझ्या याने काम होत नाही.” ते खरेही होते. कष्टामुळे ते थकून गेले होते. अशावेळी मीराबाई पुढे आल्या. पतीला म्हणाल्या, ”मी अजून दोन घरची धुणीभांडी जास्त करते. पण पोराला शिकू द्या.सुशील शिक्षणासाठी जळगावला आले. तिथे ‘सीपीटी’ची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाले. मात्र, दुसर्‍या वर्षी ‘आयपीसीसी’ची परीक्षा अनुत्तीर्ण झाले. दुसर्‍या प्रयत्नामध्ये सुशील उत्तीर्ण झाले. ‘पुढच्या प्रशिक्षणासाठी तू मुंबईला जा,’ असे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितले. २०१५च्या आसपासते मुंबईला आले. सुशील मुंबईत गावच्या भाजप नगरसेवकांच्या ओळखीने आमदार निवासात राहू लागले.

पाच ठिकाणी मुलाखत दिली आणि सगळीकडेच निवड झाली. पण, आमदार निवासात किती दिवस राहणार? मुंबईत खिशाला परवडणारे भाड्याचे घर मिळालेच नाही. शेवटी एक दिवस त्यांनी ठरवले. मुंबई आपल्यासाठी नाहीच. ते चर्चगेट स्टेशनला आले. तिथून आईला फोन करून सांगितले की, मुंबई आपल्यासाठी नाही. मी परत येतो. मीराबाई म्हणाल्या, “तू दोन दिवस थांब, मी कुठून तरी पैसे जमवते.” सुशील विचार करत स्टेशनवरच बसले. रात्री स्टेशनवर गस्त घालणार्‍या ‘सीआरएफ’च्या जवानांनी त्यांना पाहिले. त्यांनी चौकशी केली. सुशीलची कहाणी ऐकून त्यांना दया आली. एकाने सुशील यांना एक संपर्क क्रमांक दिला. तो तुला तुझ्या आवाक्यातले घर मिळवून देईल, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी ते त्या माणसाला भेटले.

अनेक लोक मिळून राहत असलेली ती खोली होती. त्यामध्ये सुशील यांना एक लॉकर आणि एक बेड राहायला मिळाला. याच काळात कोरोना आला. परीक्षा पुढे गेल्या. सुशील पुन्हा गावी आले. दुर्दैव पाठ सोडायला तयार नव्हते. सुशील यांना ‘हर्निया’चा त्रास सुरू झाला. त्यावर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी जास्त वेळ बसायलाही मनाई केली. झोपून राहा तरच बरा होशील, असे सांगितले. त्यामुळे मग ते झोपूनच अभ्यास करत. परीक्षेचा दिवस आला आणि शस्त्रक्रियेमध्ये टाके मारले होते. ते सुजले. त्यातून रक्त बाहेर येऊ लागले. डॉक्टर म्हणाले, ‘तुला पूर्णपणे बेड रेस्ट हवी.’ पण, सुशीलसाठी एक एक दिवस महत्त्वाचा होता. अक्षरशः वेदनेने तळमळत त्यांनी परीक्षा दिली. त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी भरती झाले. त्यातून बरे झाले आणि आईसोबत मामाकडे जात असतानाच त्यांचा अपघात झाला.

उपचारासाठी पैसे कुठे होते. रुग्णालयामध्ये असतानाच त्यांनी ऑनलाईन मुलाखत दिली आणि त्यांना नोकरीही मिळाली. पुढे निकाल लागला मात्र दहा मार्काने ते अनुत्तीर्ण झाले. हा सुशीलसाठी मोठा घाला होता.|आपण शिक्षण सोडावे काय करावे? लोक बोलतात तेच खरे का? असा विचार त्या २२ वर्षांच्या युवकाच्या मनात येऊ लागला. मात्र, पुन्हा आईने धीर दिला. नोकरी करता करता ते परीक्षेची तयारी करू लागले . परीक्षा तोंडावर आली असतानाच कळले की, आईच्या अंगावर सिलींग फॅन कोसळला आणि वडील अत्यवस्थ आहेत. ते घरी आले. आईबाबा आणि छोट्या भावाला धीर देत त्यांनी घरूनच काम करायला सुरुवात केली. परीक्षाही दिली.

काही महिन्यात निकाल लागणार होता. भाट समाजाचा गरीब कुटुंबातला सुशील कधी ‘सीए’ बनेल का, असा प्रश्न अनेकांना पडलेला. सुशीलला मात्र यावेळी खात्री होती की तो पास होईल. पण, निकालाला काही दिवस असतानाच रघुवीर यांचा मृत्यू झाला. घरची संपूर्ण जबाबदारी खर्‍या अर्थाने सुशील यांच्यावर पडली. मुंबईत नोकरी तर सुरू होतीच. २०१९ साल होते ते... शेवटी एकदाचा निकाल लागला. सुशील ‘सीए’ झाले. सुशीलसारख्या करोडो लोकांच्या आयुष्यात संधी आणि यश अभावानेच येते. या पार्श्वभूमीवर सुशील यांचे ‘सीए’ होणे कोणेएकेकाळी वैभवशाली असलेल्या मात्र आता स्वअस्तित्वासाठी एकत्रित आलेल्या भाट समाजासाठी खरोखरच अभिमानास्पद आहे!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.