नाविक क्षेत्रातील समुद्रपट्टीवर विराजमान होणारी पहिली महिला कमांडर... प्रेरणा देवस्थळी !'
08-Dec-2023
Total Views | 80
लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली आयएनएस चेन्नई च्या कमांडिंग ऑफिसर म्हणून निवड झाल्याबद्दल, प्रवीण नायर यांनी नियुक्ती पत्र प्रदान केले. भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय नौदलाच्या त्या पहिल्या महिला अधिकारी असतील.
प्रत्येक माणसागणिक एक धर्म असतो.धर्म म्हणजे निस्पृहपणे पार पाडावयाची कर्तव्ये. पितृधर्म, मातृधर्म, पुत्र-पौत्री धर्म, आपद् धर्म... राष्ट्र धर्म वगैरे, वगैरे. हि सर्व धर्म कर्तव्ये महत्वाची आहेतच,पण प्रेरणाताईना यात राष्ट्र-धर्म महत्वाचा मानला व आपली दमदार पावले भारतीय नाविक दलाकडे वळवली.श्रेयसला प्राधान्य देऊन घेतलेले निर्णय स्वबळ वाढवतात, हे प्रेरणाताईनी सिद्ध केले.
प्रेरणाताईने संरक्षण क्षेत्रातील उत्तुंग करियरचा पहिला पाडाव जिंकला, असं बेशक म्हणावं, अशा मराठी महिला त्या किती? मोजदाद करायला हाताची बोटं खूप झाली. आणि यातलं एक बोट प्रेरणाताईंच्या नावाने दुमडावं लागेल.
प्रेरणाताईंची वैयक्तिक गुणवत्ता या पराक्रमास जितकी कारण ठरली, तितकीच माहेरच्या देवस्थळी व सासरच्या रबडे गुरुजीं सारख्या रत्नपारखी गुणी परिवारांनी या आगळ्या करीयरसाठी व भरघोस यशाचा मार्ग निष्कंटक करण्यासाठी प्रेरणाताईंना भरभरून आशीर्वाद व पाठींबा दिला, हे न सांगता उमगल्यागत आहे.
उद्या प्रेरणाताईंना कुणी विचारावं, नाविक दलाने तूम्हाला सन्मान दिला, तूम्ही काय दिलंत ? माझं मौल्यवान आयुष्य मी देते आहे, यापेक्षा वेगळं त्या काय म्हणणार? संरक्षण क्षेत्रातील करियर हे एक व्रत आहे. 'न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने' याच उच्च धारणेने प्रेरणाताई इकडे वळल्या... अपघाताने नव्हे, हे ओळखायला त्यांची जिद्द पुरे.
प्रेरणाताई, या क्षेत्रात अडथळे पार करीत,अप्रचलित पाण्यात प्रवास करण्यास सिद्ध आहेत. { sailing into unchartered waters } प्रेरणाताई यांनी वर्ष २००९ मध्ये भारतीय नाविक दलात प्रवेश केला. त्या सायकॉलॉजी विषयातल्या पोस्ट ग्रेजुएट आहेत. त्यांचा पूर्ण परिवार म्हणजे बंधू व पती भारतीय नाविक दलाच्या सेवेत आहेत. संरक्षण खात्याच्या उक्तीनुसार 'ऑल रोलस्... ऑल रॅन्क्स्' भविष्यात एक हजार महिलांची नियुक्ती करण्याचा मानस भारतीय नाविक दलाचा आहे.
करियरची सुरवात करण्यापूर्वी मनात जे मुक्कामाचे ठिकाण असते, त्याचा अगोदर अंदाज घ्यायला लागतो. प्रेरणा ताईनी यात कसूर केली नाही... आणि त्या मुक्कामाच्या पहिल्या पडावावर पोहोचल्या. नाविक दलाच्या 'ओशन ऑफ अपॉर्चुनिटीज्' द्वारा पुढील करियरमधील सर्व मैलाचे दगड त्या पार करोत,अशी शुभेच्छा व्यक्त करत हा ब्लॉग पूर्ण करतो.