१ली १८ वर्षाखालील मुले व मुलींची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा - हरिद्वार २०२५ - महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी

    29-Jun-2025
Total Views |

मुंबई - महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी "१ल्या १८वर्षाखालील मुले व मुलींच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रेमनगर आश्रम, राणीपूर जवळ, हरिद्वार, उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या मुलींच्या इ गटात महाराष्ट्राने झारखंडवर ५०-१६ अशी सहज मात करीत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. आक्रमक सुरुवात करीत महाराष्ट्राने पूर्वार्धात ३५-१० अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्र्चित केला. उत्तरार्धात त्याच जोशात खेळ करीत गुणांचे अर्धशतक गाठले. बिदिशा सोनार, सेरेना म्हसकर यांचा चढायांचा झंझावात थोपविणे झारखंडला जमले नाही. प्रतीक्षा गुरव हिचा बचाव उत्कृष्ट होता. यांच्या खेळामुळे महाराष्ट्राला हा विजय सोपा गेला. या इ गटात महाराष्ट्रसह झारखंड व छत्तीसगड हे संघ आहेत. या गटात जेतेपद मिळवायचे असेल तर महाराष्ट्राला छत्तीसगडला पराभूत करावे लागेल.

मुलांच्या सामन्यात महाराष्ट्राने इ गटात केरळचा ५४-२४ असा दारुण पराभव केला. बचाव व आक्रमणावर समांतर भर देत मुलांनी विश्रांतीलाच २१-०८ अशी आघाडी घेतली होती. नंतर देखील आपला खेळात सातत्य राखत गुणांचे अर्धशतक पार करीत सामना एकतर्फी केला. स्वराज मुळे, अथर्व सोनवणे यांच्या तुफानी चढाया त्यांना जीवन जाधव, प्रसाद दिघोळे यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सहज शक्य झाला. केरळच्या संघाला उत्तरार्धात थोडा फार सूर सापडला. पण तो पर्यंत वेळ निघून गेली होती. या गटात माराष्ट्रासह दिल्ली व केरळ हे अन्य संघ आहे. या गटाचे जेतेपद मिळविण्याकरिता महाराष्ट्राला दिल्लीचे आव्हान पेलावे लागेल.