एकलव्य असाही...

    05-Nov-2023   
Total Views |
Article on Dr Aviraj Taide
 
संगीताची आवड असल्याने त्याचाच ध्यास घेऊन घाटंजी ते यवतमाळ, यवतमाळ ते पुणे आणि पुणे ते नाशिक असा प्रवास केलेल्या डॉ. अविराज तायडे यांच्याविषयी..

आपण खेळत असतो, शिक्षण, नोकरी, पैसे आणि आयुष्याचा अर्थ अशी कसलीच तमा नसते. आपली बरीचशी कामं आपली आईच करत असते. काम करताना गाणी म्हणत असते, ओव्या, आरत्या, भजन या संगीतमय वातावरणात आपण कसलाही विचार न करता उनाडत असतो, तो काळ. मात्र आईचा तो आवाज, त्यातली लय, त्यातला ताल आणि आवाजातले आरोह अवरोह मात्र आपण कानात अगदी टिपकागदात आर्द्रता शोषून घ्यावी तसे शोषून घेतो. ते थोडंसं उमजू लागलेलं बालपण. आपल्याला स्वतःची अशी ओळख नसते, पण आपल्याला कसं व्हायला आवडेल हे कळून अगदी तसंच अनुकरण करण्याची ही वेळ. माहूरच्या तालेवार घराण्यातलं आईचं माहेर म्हणून देवीचं संगीत घरात, माजघरातर, सतत आईच्या गळ्यात. बस्स. एवढीच काय ती संगीताची तोंडओळख आणि घरातून मिळालेला संगीताचा वारसा.

यवतमाळजवळ घाटंजीच्या एका मुख्याध्यापकांच्या घरी जन्मलेला हा मुलगा. घरात शिक्षणाचं मोठं प्रस्थ. वडिलांचा विषय विज्ञान, तेव्हा मुलांनीही तोच विषय घ्यावा हा अट्टाहास. अशातच मुख्याध्यापकांचा मुलगा दोन वेळा परीक्षेत नापास होतो. घरात मोठी बैठक जमते. वडील उद्वेगाने म्हणतात, ”तुझ्या जागी मी असतो, तर केव्हाच घर सोडून निघून गेलो असतो. माझी वाट मी शोधली असती.” मुलगा जिद्दी आणि खर्‍या अर्थाने साधक. पुण्याची वाट धरतो आणि अनाथ विद्यार्थीगृहात आश्रय मिळवतो. यवतमाळला असताना केव्हा एकदा ऐकलेलं भीमसेनजींचं गाणं आणि त्यावर भारावून जाऊन त्यांचा घेतलेला त्यांच्याच हाताने लिहिलेला पत्ता त्याच्याकडे असतो. भीमसेनजींच्या हस्ताक्षरात लिहिलेलं हे पत्त्याचं पत्र या मुलाच्या भविष्याचं तिकीट असतं. प्रवास मात्र अगदी खडतर.. आज तोच सांगतेय.

नापास झाल्याने घर सोडून पुण्याची वाट धरलेल्या छोट्या मुलापासून ते मुंबईतील एक नामवंत विद्यापीठ, एसएनडीटी कॉलेजचे डीन असा प्रवास असलेल्या डॉ. अविराज तायडेंची ही गोष्ट. घाटंजीची शाळेत सातवी आठवीत असताना पीटीसाठी एक शिक्षक आले, त्या शिक्षकांना बासरी वाजवायचा नाद होता. हे शिक्षक म्हणजे त्यांचे संगीतातले पहिले गुरू देवराव भालेराव. दुसरीकडे एकलव्यासारखी संगीत आराधना सुरूच होती. भीमसेनजींचं गाणं ऐकायचं आणि त्याची नक्कल करायची. पुढे परीक्षेत दुसर्‍यांदा नापास झाल्यावर तिसर्‍या परीक्षेसाठी अर्ज केला. वडिलांनी अगदी खडे बोल सुनावले तेव्हा घर सोडून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. भीमसेनजींच्या घराजवळ असलेल्या एका अनाथ विद्यार्थी आश्रमात प्रवेश मिळवल्यानंतर ते भीमसेनजींच्या हस्ताक्षरातील जपून ठेवलेलं पत्र अस्तनीतल्या ऐवजासारखं बाहेर काढलं.

पहिल्यावेळी भीमसेनजींनी घरात घेतलं, चहा पाजला, चौकशी केली आणि त्यानंतर गोड शब्दात बोळवण केली. ’दोन दिवसांनी संध्याकाळी ये.. चार दिवसांनी दुपारी ये.. पाच दिवसांनी सकाळी १० वाजता ये’ असे निरोपावर निरोप देऊन कुंपणाच्या बाहेरच ठेवले. असं साधारण २० ते २५ वेळा गुरूच्या घरापर्यंत वार्‍या केल्यानंतर २६व्या वेळी त्यांनी घरात बोलावलं. ’आता आलाच आहेस, तर काहीतरी गाऊन दाखव. गुरूंची आज्ञा. ’वृंदावनी सारंग’ रागातली ’जाऊ मे तेरे बलिहारी’ अविराज यांनी गायली. संगीताचं प्राथमिक शिक्षणसुद्धा नसलेल्या एका पोरसवदा तरुणाने भीमसेनजींची केलेली नक्कल, भीमसेनजींच्या समोर बसून गाऊन दाखवली! तुम्हीच माझं शिष्यत्व पत्करा असं म्हणत अडून बसलेले हे पोर पाहून भीमसेनजींनी त्याच्या हातात एक पत्र दिलं आणि एका पत्त्यावर ते घेऊन जायला सांगितलं तो पत्ता होता एसपी कॉलेजच्या मागे राहणार्‍या पंडित रामभाऊ माटे यांचा. अविराज यांचे हे संगीतातले दुसरे गुरू. संगीत शिक्षण रामभाऊंच्या घरी सुरू होतं तेव्हा साधना भीमसेनजींच्या घरी.

साधना म्हणजे काय? तर ते कसे बसतात, कसे बोलतात, काय सराव करतात, त्यांना मध्येच काय आठवतं? कोणता स्वर घेतात, तानपुरा घ्यायला सांगतात, त्यांचा मूड लागेल तसे आळवत राहतात. हे सर्व पाहणं. आपल्याला काय साध्य करायचे आहे हे एकदा कळले की, त्यासाठी करावी लागणारी साधना ती ही. या काळात ते कला विभागात एसपी महाविद्यालयात मास्टर्स करत होते, माटे गुरूंकडे शिकत होते, भीमसेनजींकडे बसत होते, रोजचा रियाज होताच. वडिलांना समजले आपला मुलगा भीमसेनजींकडे शिकतो तेव्हा त्यांना आनंद झाला ते पुण्यात येऊन भेटले. तीनही विद्यालयात शिक्षण साधना आणि उर्वरित वेळात मनं, चिंतन, ऐकणं आणि सराव असे संगीतमय दिवस झाले होते. ‘एम.ए’झाल्यावर पंडित भीमसेनजींच्या गायकीवर त्यांनी ‘पीएच.डी’ केली. तबला न शिकता त्यांना वाजवता येई. हे एक आश्चर्यच. जणू ताल त्यांच्या बोटांच्या टीपेवरच वास्तव्याला होते हे सर्व करताना ज्ञान प्रबोधिनीमध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर नाशिक येथे एसएनडीटी महाविद्यालयात ‘हेड ऑफ द डिपार्टमेंट’ म्हणूनच ऑर्डर आली. तेथे डॉ. प्रभा अत्रे यांनी वरिष्ठ पदासाठीच त्यांची शिफारस केली. त्यानंतर दोन वर्षे मुंबईत पुन्हा नाशिक येथे डीन पदावर रुजू.

सलग १८ वर्षे भारताबाहेर संगीताचे कार्यक्रम ते करतात. पुण्यातून बाहेर पडल्यावर त्यांना अजून एक गुरू लाभला. सी. आर. व्यास. आज ते स्वतःही ज्ञानदानाचे कार्य करतात. सेन्सॉर बोर्डवरसुद्धा त्यांची नेमणूक झालेली आहे. संगीताचा आणि गुरूची निवड करून त्यांचाच ध्यास घेतलेल्या या संगीतातील एकलव्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून खूप शुभेच्छा!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.