विमानाने झेप घेताच २ मिनिटांत काळाचा घाला - अहमदाबादहुन लंडनच्या दिशेने जाणारे विमान कोसळले

Total Views |

अहमदाबाद,
अहमदाबादहून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअरइंडियाचे फ्लाइट नंबर एआय-१७१ हे विमान उड्डाणानंतर अवघ्या २ मिनिटांत तांत्रिक बिघाडामुळे निवासी भागात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अहमदाबादहून लंडनला निघालेल्या २४२ प्रवासी होते. यात २४१ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एक प्रवासी जखमी अवस्थेत मिळाला आहे. या २४२ प्रवाशांमध्ये आणि क्रू मेंबर्स, १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या संपूर्ण दुर्घटनेबाबत जगभरातुन शोक व्यक्त करण्यात येत आहे. अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे अपघातस्थळी सापडलेले बहुतेक मृतदेह इतके जळाले होते की त्यांची ओळख पटवणे खूप कठीण आहे. डीएनए चाचणीनंतरच त्यांची ओळख पटवणे शक्य होईल.

दरम्यान या दुर्घटनेबाबत एअर इंडियाने अधिकृतपणे दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे AI171अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघाले. या बोईंग ७८७-८ विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक होते. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे.

या विमान अपघाताबाबत डीजीसीएने एक निवेदन जारी केले आहे. डीजीसीएने म्हटले आहे की, १२ जून रोजी, बी७८७ विमान कोसळले. विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर करत होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसीचे ८२०० तासांचा अनुभव असलेले होते. तर सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. एटीसीच्या मते, विमानाने अहमदाबादहून दुपारी १:३९ वाजता धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. धावपट्टी २३ वरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर निघताना दिसत होता.

अपघातापूर्वी, वैमानिकाने MAYDAY ला फोन केला होता. एटीसीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना प्रतिसाद मिळाला नाही.

सरकारी निवासी डॉक्टरांच्या होस्टेलवर कोसळले विमान

हे विमान ज्या इमारतीवर कोसळले त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे निवासी डॉक्टर राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी इमारतीत ५० ते ६० डॉक्टर उपस्थित होते, त्यापैकी १५ हून अधिक जखमी झाले आहेत. बहुतेक डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते. स्फोटाचा आघात इतका तीव्र होता की, आत उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या शरीराचेही तुकडे झाले. ज्या डॉक्टर्स हॉस्टेलवर एअर इंडियाचे विमान आदळले. येथे विमानाचा पुढचा भाग पूर्णपणे जळाला होता तर हॉस्टेलच्या आवारात विमानाच्या शेवटच्या टोकाचे अवशेष पडलेले होते.

११अ सीटवर एक व्यक्ती जिवंत आढळली

अहमदाबाद विमान अपघातात फक्त एक व्यक्ती जिवंत आणि सीटवर बसलेली आढळली. एएनआयशी बोलताना अहमदाबादचे पोलिस आयुक्त जीएस मलिक म्हणाले की, ११अ सीटवर पोलिसांना एक व्यक्ती जिवंत आढळली. ती व्यक्ती रुग्णालयात आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. अहमदाबादमधील असरवा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमधील बेडवर ४० वर्षीय विश्वास कुमार रमेश हे या प्राणघातक अपघातातून बचावले. ब्रिटिश नागरिक असलेले विश्वास हे काही दिवसांसाठी आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले होते. ते आणि त्याचा भाऊ अजय कुमार रमेश (४५) सोबत युकेला परत जात होते. विश्वास यांच्याकडे त्याचा बोर्डिंग पास होता. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले, “मी उठलो तेव्हा माझ्याभोवती सर्वत्र मृतदेह होते. मी घाबरलो. मी उभा राहिलो आणि पळत सुटलो. माझ्याभोवती विमानाचे तुकडे होते. कोणीतरी मला धरले आणि रुग्णवाहिकेत बसवले आणि रुग्णालयात आणले.” विश्वास २० वर्षांपासून लंडनमध्ये राहत राहतात. तसेच त्याची पत्नी आणि मूलही लंडनमध्ये राहतात.

बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए चाचणीची व्यवस्था

गुजरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी माहिती दिली की, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमधील विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी निवासस्थाने आणि इतर निवासी क्षेत्रे विमान कोसळलेल्या भागात आहेत. त्या भागातील रहिवासी देखील जखमी झाले आहेत. सुमारे ५० जखमींना अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. त्यांच्यावर सर्वोत्तम उपचार केले जात आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे पण स्थिर आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजमध्ये डीएनए चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांच्या कुटुंबियांना आणि जवळच्यांना, विशेषतः त्यांच्या पालकांना आणि मुलांना विनंती आहे की,त्यांनी त्यांचे नमुने त्या ठिकाणी सादर करावेत जेणेकरून मृतदेहांची ओळख लवकरात लवकर पटवून देता येईल.

दुर्घटना शब्दांत व्यक्त न होणारी : नरेंद्र मोदी, पंतप्रधान

अहमदाबादमधील अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे जी शब्दांत सांगता येत नाही. या दुःखद घटनेत, माझ्या संवेदना या घटनेने प्रभावित झालेल्या प्रत्येकासोबत आहेत. बाधितांना मदत करण्यासाठी काम करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात आहोत.

आपत्ती प्रतिसाद यंत्रणांना जलद पाचारण : अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री

अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. आपत्ती प्रतिसाद दलांना तातडीने अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गृहमंत्री हर्ष संघवी आणि अहमदाबादचे पोलिस आयुक्त यांच्याशी सातत्याने संवाद सुरु आहे.

संपूर्ण देश पीडितांच्या कुटुंबासोबत : द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती

अहमदाबादमधील दुर्दैवी विमान अपघाताबद्दल ऐकून अत्यंत दुःख होत आहे. ही एक अत्यंत हृदयद्रावक आपत्तीची घटना आहे. माझ्या भावना आणि प्रार्थना पीडितांसोबत आहेत. या अवर्णनीय दुःखद प्रसंगी संपूर्ण राष्ट्र त्यांच्यासोबत आहे.

जगभरातून संवेदना

अहमदाबादमधील विमान अपघातानंतर जर्मनी, चीन, रशिया, फ्रान्सने या दुर्घटनेबाबत संवेदना व्यक्त केली.



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.