सफाई कामगारांसाठी...

    20-Nov-2023   
Total Views |
Nagesh Kandare


धुळ्याचे नागेज कंडारे उच्चशिक्षित. मात्र, सफाई कर्मचारी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांनी सफाई कर्मचारी म्हणून काम केले, संघटना निर्माण केली. त्यांचा कार्यप्रवास इथे मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...

जातपंचायतीचा कारभार हा परंपरागत आहे, त्यात कायदे आहेत, तसेच नियमदेखील आहेत. जातपंचायतीच्या माध्यमातून समाजाचे भले व्हावे, असे कार्य घडावे“ असे नागेज कंडारे यांचे मत. त्यासाठी नागेज यांनी काम करायला सुरवात केली. समाजात चतुर्थ श्रेणी कामगार युवक जास्त आहेत. विवाहावेळी सासरच्यांकडून वर पक्षाला वस्तू, दागदागिने भेट द्यायची परंपरा आहे. आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक जण ही प्रथा पाळतो. नागेज यांनी मत मांडले की, हा खर्च करण्यापेक्षा लेक आणि जावयाच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, असे काहीतरी करावे. काहीच नाही तर पानटपरीचे दुकान, रिक्षा घेण्यासाठी मदत करावी, जेणेकरून जावयाचे उत्पन्नाचा स्रोत वाढेल आणि लेकीचा संसाराला गरिबीचे ग्रहण लागणार नाही. खर्चिक विवाह पद्धतीपासून वधू पक्षाची सुटका व्हावी, म्हणूनही त्यांनी प्रयत्न केले आणि पहिल्यांदा धुळ्यामध्ये तीन विवाह न्यायालयात नोंदणी करून संपन्न झाले. यामुळे समाजात काही लोकांनी वादळ उठवले की, नागेज परंपरा मोडत आहे. मात्र, समाजाला नागेज यांची तळमळ माहिती होती. त्यामुळेच समाजाने वाल्मिकी, मेहेतर समाज पंचायतचे राज्य महासचिव म्हणून त्यांना जबाबदारी दिली.
 
नागेज कंडारे हे ’अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी सफाई कामगार कर्मचारी संघटने’चे महाराष्ट्राचे अध्यक्ष. ही संघटना राज्यातील १३ शहरांमध्ये कार्यरत आहे. संघटनेचे साडे पाच हजार कर्मचारी सदस्य आहेत. महाराष्ट्रात शासकीय स्तरावर काम करणार्‍या सफाई कामगारांना शासकीय सुट्ट्या लागू नव्हत्या. तसा शासकीय आदेश (जीआर) १९७९ साली पारित झाला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नव्हती. नागेज यांनी मोठी बहीण डॉ. रेखा बहनवाल यांच्या मदतीने हा जीआर कार्यान्वित करण्यासंदर्भात काम सुरू केले. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घालून, या जीआरच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठीचे आदेश दिले. त्यामुळे २०१६ साली महाराष्ट्रातील सरकारी स्तरावर कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना सरकारमान्य सुट्ट्या मिळू लागल्या. इतर सफाई कामगारांना किमान वेेतनही मिळत नाही. त्यांना किमान वेतन मिळावे यासाठीही नागेज यांनी लढा उभारला. हा लढा सोपा नाही. कारण, खासगी कंत्राटदार त्यांच्या मर्जीने सफाई कर्मचार्‍यांना पगार देतात. नागेज यांनी अनेक कर्मचार्‍यांना किमान वेतन वाढूवन देण्याचे कार्य केले. सफाई कर्मचारी कितीही शिकले, तरी ते चतुर्थ श्रेणीचेच काम करणार, असे म्हटले जाते.

मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या पुढकाराने ‘लाड पागे समिती’ने हे गृहीतक उधळून लावले. सफाई कर्मचार्‍याने किंवा त्यांच्या पाल्याने उच्च शिक्षण घेतले, तर त्याला अनुकंपा तत्त्वावर वरच्या श्रेणीतही काम मिळू शकते. ’लाड पागे समिती’चा आधार घेत, नागेज यांनी आतापर्यंत २५० सफाई कर्मचार्‍यांच्या मुलांना तृतीय श्रेणीत नोकरीची संधी उपलब्ध करून दिली. नागेज स्वतः एक सफाई कर्मचारी होते. दहा वर्षे सफाई कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर, त्यांनी काही महिन्यांपूर्वीच स्वेच्छा निवृत्ती घेतली.आता कुणाला वाटेल की, नागेज यांनी निवृत्ती का घेतली, तर नागेज यांचे शिक्षण ’एमकॉम’, बीएड. त्यांनी तलाठीची परीक्षा दिली. त्यावेळी एका सफाई कर्मचारी नेत्याने त्यांना सांगितले की, ”चार लाख दिलेस; तर तुझी तलाठीची नेमणूक पक्की. तू पास झालास तरी पैसे दिल्याशिवाय काम होत नाहीत.” त्यामुळे मोहन आणि शामबाई यांनी निवृत्तीनंतर मिळालेले पैसे तसेच त्यात दागदागिने विकून पैसे टाकून चार लाख रुपयांचीं रक्कम जमवली आणि ती त्या नेत्याला दिली. या दरम्यान तो नागेज यांना म्हणाला की, ”माझी सफाई कामगार संघटना आहे, त्यामध्ये तोपर्यंत काम कर.” नागेज यांनी समाजबांधवांचे काम करायला मिळते, म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर नागेज यांना कळले की, त्या माणसाने पैसे स्वतःच्या छानछोकीसाठी उधळले होते.


नागेज आणि कुटुंबीयांची फसवणूक केली होती. महत्प्रयासाने नागेज यांनी ते पैसे त्या माणसाकडून परत मिळवले. मात्र, त्यांच्या मनात विचार आला की, आपल्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीची अशी फसवणूक होते, तर गरीब, अल्पशिक्षित समाजबांधवाची किती फसवणूक होत असेल. या विचाराने ते अस्वस्थ झाले. याच काळात ते एका मोठ्या खासगी कंपनीत उच्चपदावर रुजू झाले. उत्तम पगार, आयुष्यात स्थैर्य सारे काही होते. मात्र, आजूबाजूच्या समाजबांधवांची स्थिती जैसे थी होती. सफाई कर्मचारी बांधवांसाठी काम करणारी संघटना उभी करायची, तर संघटना स्थापन करणारे, स्वतः सफाई कर्मचारी असणे, हा नियम आहे. त्यामुळे मग नागेज यांनी चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि २०१० साली ’आदिवासी विभागा’मध्ये सफाई कामगार म्हणून काम करू लागले. चांगले साहेबाचे काम सोडून, झाडू हाती घेतला म्हणून तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. मात्र, नागेज ठाम होते. त्यांनी २०१३ साली सफाई कर्मचार्‍यांची संघटना स्थापन केली. आज हजारो सफाई कामगारांच्या न्याय व हक्कासाठी ते काम करतात. पण, यात कुठेही हिंसात्मक किंवा संविधानविरोधी किंवा शासनाच्या विरोधात जाऊन लोकांना भडकावून, ते काम करत नाहीत. ’समाजापासून तोडून नव्हे, तर जोडून सफाई कर्मचार्‍यांची प्रगती होणार’ हा विचार घेऊन नागेज यांचा कामाची घोडदौड सुरू आहे. ते म्हणतात की, “जातीवरून काम नव्हे, तर गुणवत्तेवरून काम हे समीकरण वास्तवात येत आहे, त्यासाठी आणखीन काम आयुष्यभर करणार.“ नागेज यांचे विचार हे सामाजिक समरसतेसाठीचा पाया आहे, हे मात्र नक्की!



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.