नवी दिल्ली : भारतात डिजीटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये देशभरात १ हजार कोटींहून अधिक युपीआय व्यवहारांची नोंद झाली आहे. भारतात आता प्रत्येक व्यक्ती भीम, गुगल पे अथवा अन्य युपीआयचा वापर करून डिजीटल व्यवहार करतो.
अगदी १ रुपयापासून ते लाखो रुपयांपर्यतचे व्यवहार युपीआयद्वारे एका क्लीकवर केले जात आहेत. देशातील डिजीटल व्यवहारांचे संचालन पाहणाऱ्या एनपीसीआयने जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण १ हजार ४१४ कोटी व्यवहारांद्वारे १७.१६ लाख कोटी रुपयाचे हस्तांतरण केले आहे. व्यवहारांच्या बाबतीत युपीआयच्या वापरामध्ये वार्षिक ५५ टक्के आणि व्यवहाराच्या रकमेच्या बाबतीत ४२ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२३ मध्ये सलग तिसऱ्या महिन्यात युपीआय व्यवहारांनी १ हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात १ हजार ५६ व्यवहारांद्वारे १५.८० लाख कोटी तर ऑगस्टमध्ये १ हजार ५८ व्यवहारांद्वारे १५.७६ लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत.