‘ड्रॅग क्वीन’ आणि येशूची दया

    06-Oct-2023   
Total Views |
Philippines 'Jesus' drag queen arrested for obscenity

पुरा लुका वेगाला काल-परवाच फिलिपाईन्स पोलिसांनी अटक केली. गेले अनेक दिवस पुरा लुका वेगाच्या विरोधात जगभरातले कट्टर ख्रिस्तीधर्मीय आकाशपाताळ एक करीत होते. त्याने ख्रिस्ती धर्माच्या श्रद्धेचा अपमान केला आणि अत्यंत अश्लाघ्य, अश्लील आणि कोणत्याही प्रकारची माफी मिळणार नाही, असा गुन्हा केला, असे फिलिपाईन्सच्या तमाम ख्रिस्ती पादरी लोकांचे मत. त्यामुळे फिलिपाईन्सच्या ८४ टक्के रोमन कॅथलिक लोकांपैकी बहुसंख्य लोकांचेही मत. फिलिपाईन्सच्या १७ शहरांमध्ये पुरा लुका वेगाला बंदी घालण्यात आली.

पुरा लुका वेगाने ख्रिस्ती धर्मातली ‘अवर फादर’ ही येशू प्रार्थना म्हटली. ही प्रार्थना करताना पुरा लुका वेगाने ‘ब्लॅक नाजरेन’ या येशूच्या एका मूर्तीसारखी वेशभूषा केली. ख्रिस्ती देशांमध्ये येशूची प्रार्थना केल्यावर वेगाला अटक का झाली? पुरा लुका वेगाच्या अटकेची कारणे पाहिली, तर समता, समानता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य याबाबत फिलिपाईन्सचाच ख्रिस्ती समाज किती धर्मांध आणि कट्टर आहे, हे जाणवते.

पुरा लुका वेगा हा ‘ड्रॅग क्वीन’ आहे. पाश्चात्य ख्रिस्ती संस्कृतीमध्ये ‘ड्रॅग क्वीन’ला एक लिंगात्मक इतिहास आहे. ‘ड्रॅग क्वीन’ हे मुख्यतः पुरूष असतात. ते स्त्रियांसारखा पोषाख परिधान करतात आणि तसे हावभाव करतात. हे सगळेच तृतीयपंथी, किन्नर नसतात. पण, तिथल्या समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसाच असतो, तर पुरूष स्त्रियांसारखे वेशभूषा, केशभूषा आणि वर्तन करून मोठमोठ्या सामाजिक उत्सवांमध्ये लोकांचे मनोरंजन करतात. पुरा लुका वेगा हासुद्धा असाच एक पुरूष. ज्याने त्याच्या नैसर्गिक आवडीनुसार, स्त्रियांसारखे जगणे स्वीकारले. अनेक उत्सवांमध्ये आणि कार्यक्रमामध्ये चांगली ‘ड्रॅग क्वीन’ म्हणून त्याने नाव कमावलेले. या पार्श्वभूमीवर फिलिपाईन्समध्ये तृतीयपंथीयांना माणूस म्हणून जगण्यासाठीचे ठोस कायदे नाहीत.

कारण, ख्रिस्ती मान्यतेनुसार, अ‍ॅडम आणि ईव्ह अर्थात स्त्री आणि पुरूष हे दोघेच अस्तित्वात आले. त्यामुळे तृतीयपंथीवर इथे प्रश्नचिन्ह. इथे घटस्फोट आणि गर्भपातालाही कायदेशीर मान्यता नाही. यासंदर्भात कोणताही सुविधाजनक कायदाच नाही. कारण, त्यांच्या धर्मग्रंथात याबाबत तसे आदेश नाहीत, तर थोडक्यात पुरा लुका वेगा या ‘ड्रॅग क्वीन’चे काम काय, तर कोणत्याही मनोरंजनात्मक कार्यक्रमामध्ये लोकांचे मनोरंजन करायचे. काही दिवसांपूर्वी पुरा लुका वेगाने ‘ब्लॅक नाजरेन’ येशूच्या मूर्तीसारखी वेशभूषा, केशभूषा करीत ’अमा नमिन’ ही प्रार्थना गायली. येशूच्या ‘ब्लॅक नाजरेन’ मूर्तीबाबत इथे कथा सांगितली जाते (आणि त्यावर जगभरातल्या ख्रिस्ती समाजाचा विश्वास आहे) १६०६ साली मेक्सिकोहून काही पादरी फिलिपाईन्समध्ये ख्रिस्ती धर्मप्रसारासाठी आले. येताना त्यांनी येशूची क्रूस वाहून नेणारी मूर्ती आणली.

पण, मध्येच जहाजाला आग लागली. मात्र, येशूची कृपा अशी की मूर्ती जळाली नाही, तर केवळ काळी पडली; तसेच येशूची मूर्ती आणणारे लोकही वाचले. आता यात वैज्ञानिक दृष्टीने पाहिले तर चटकन जाणवते की, यात सत्य आणि तथ्य काय आहे? पण, जगभरचे ख्रिस्ती यावर विश्वास ठेवतात. फिलिपाईन्समध्ये दरवर्षी दि. ९ जानेवारीला ‘ब्लॅक नाजरेन’ येशूच्या प्रीत्यर्थ मोठा उत्सव असतो. ‘ब्लॅक नाजरेन’ मूर्तीची मोठी यात्रा काढली जाते. मूर्तीला स्पर्श केला की, सगळे आजार बरे होतात. इतकेच काय एखाद्या कपड्याच्या छोट्या तुकड्यानेही मूर्तीला स्पर्श केला आणि मृत्यूशय्येवर पडलेल्या रुग्णाला त्या कपड्याला स्पर्श झाला, तर रुग्ण बरा होतो, असेही इथल्या ख्रिस्ती जनतेचे म्हणणे. असे जगभरातल्या चर्चचे बडे-बडे धर्मगुरूही हे मान्य करतात. त्यामुळे लाखो लोक त्या यात्रेत ‘ब्लॅक नाजरेन’च्या मूर्तीला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. चेंगराचेंगरी होऊन दरवर्षी अनेक लोक मृत्युमुखी पडतात. आता ही श्रद्धा की अंधश्रद्धा, यावर कुणीही काहीही बोलत नाही, हा भाग वेगळा.

पुरूष असून स्त्रीसारखे जगणार्‍या ‘ड्रॅग क्वीन’ पुरा लुका वेगाने ‘ब्लॅक नाजरेन’ येशूसारखे केशभूषा, वेशभूषा करून प्रार्थना म्हटली म्हणून त्याला अटक करण्याची मागणी करणार्‍या, त्या ख्रिस्ती धर्मसंस्था आणि तो समाज. भारतात तुरूंग म्हणून नका, देहविक्री करणार्‍यांची वस्ती म्हणू नका, तिथे येशूची दया, करुणा वाटणार्‍या या संस्था, ही लोकं. त्यांची दया, करुणा पुरा लुका वेगा आणि त्याच्यासारख्या असंख्य ‘ड्रॅग क्वीन’बाबत कुठे गेली? त्यांना विचारायचे आहे की, पुरा लुका वेगा याला माणूस म्हणून जगण्याचा आणि श्रद्धा जपण्याचा हक्क आहे की नाही?

९५९४९६९६३८

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.