आगरी समाजाच्या उत्क्रांतीसाठी प्रयत्नशील ‘संकल्प’

    17-Oct-2023   
Total Views |
Article on Sankalp Sanstha

स्वत: शिकून उच्च पदावर नोकरी करीत असताना समाजाच्या उत्कर्षासाठी निळजे गावातील महेंद्र वसंत पाटील यांनी ‘संकल्प’ संस्थेची स्थापना केली व या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. त्यांच्या ‘संकल्प’ संस्थेचा आढावा घेणारा हा लेख..

डोंबिवलीनजीक असलेल्या निळजे गावातील महेंद्र वसंत पाटील यांनी २००३ मध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिथूनच ‘संकल्प’ संस्थेचा प्रवास सुरू झाला. पण २००४ मध्ये खर्‍या अर्थाने संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिस्त, संस्कार, गुणवत्ता आणि कला-कौशल्य या चतु:सूत्रीवर संस्था कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून निळजे आणि परिसरातील ५० गावांतील विद्यार्थी व नागरिकांकरिता विविध उपक्रम राबविण्याचे काम गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. ‘संकल्प’ संस्थेने शैक्षणिक क्षेत्रातहीआपले पाऊल टाकले आहे. आजच्या घडीला संस्थेच्या सर्वोदयबालविकास मंदिर, सर्वोदय प्राथमिक मराठी शाळा, सर्वोदय विद्यालय, रविंद्रनाथ टागोर माँटेसरी, रविंद्रनाथ टागोर न्यू इंग्लीश स्कूल, सुमनताई वसंत पाटील कनिष्ठ महाविद्यालय, संकल्प व्यवासायिक प्रशिक्षण केंद्र इत्यादी संस्था जोमाने कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, गुणवत्ता आणि कला-कौशल्ये रुजविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व फुलावे यासाठी व्यायाम, योगादेखील दररोज शालेय तासिकांमध्ये करून घेतले जातात. याशिवाय देशभक्तीपर गीते, भगवद्गीता पठण, स्पर्धा परीक्षा विषयांची तयारी याद्वारे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होण्यासाठी भरीव प्रयत्न संस्था सातत्याने करीत असते. 

आषाढी एकादशीनिमित्त निळजे गावातविठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत दिंडी काढली जाते. २००४ पासून ही दिंडी काढली जात आहे. संस्थेतर्फे वर्षभर राबविण्यात येणार्‍या उपक्रमांमध्ये सार्वजनिक गणोशोत्सव, सार्वजनिक नवरात्रोत्सव, संकल्प क्रीडामहोत्सव व शिवजयंती उत्सव यांचा प्रामुख्याने समावेश असतो. दुदैवाने, स्थानिक समाजाचा कल हा जमिनीविकून ऐषोआराम करण्याकडे जास्त असतो. त्याला क्रियाशीलतेकडे नेण्याचा व त्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे काम संस्था करीत आहे. संस्थेतर्फे विविध खेळांचे सामने भरविले जातात. तरुणांना मैदानी खेळांकडे वळविण्यात ही संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. जुगार, व्यसनधीनता यातून युवकांना शिक्षणाकडे व स्वयंरोजगाराकडे नेण्याचे महत्त्वाचे काम संस्था करीत आहे. संस्थेतर्फे स्वामी विवेकानंद सार्धशती निमित्त जानेवारी २०१३ मध्ये स्वामी विवेकानंद भक्तीज्ञान सप्ताहाचे आयोजन करून स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार व प्रसार सुरू केला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच चांगल्या सोईसुविधा मिळाव्यात, यासाठी संस्थेने निर्माण केलेल्या दोन शैक्षणिक संकुलांमध्ये विविध सुविधांची निर्मिती केली आहे.

सर्वोदय विद्यालय संकुलामध्ये विद्यार्थ्यांकरिता संकल्प वाचनालयाद्वारे १२ हजार, ५०० हून अधिक पुस्तकांची सोय केलेली आहे. त्याचबरोबर विविध तांत्रिक प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यामध्ये जमीन सर्वेक्षण प्रशिक्षण, बांधकाम साहित्याच्या चाचणीसाठीची प्रयोगशाळा, फॅशन डिझायनिंग इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच, विद्यार्थ्यांमध्ये विविध खेळांची माहिती पोहोचावी आणि सराव व्हावा यासाठी विविध मैदानी खेळ तसेच बैठे खेळांच्या सुविधा निर्माण करून दिलेल्या आहेत आणि त्यासाठी आवश्यक विस्तृत मैदान व खेळांचे कक्षही देण्यात आलेलेआहेत. कराटे प्रशिक्षक, संगीत, हार्मोनियम,तबला प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक तसेच विविध कला कौशल्यांचे प्रशिक्षक नेमण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना भगवद्गीतेचे पठण योग्यरित्या करता यावे, याकरिता नियमित भगवद्गीता पठणाचे वर्ग सुरू केलेले आहेत. सर्वोदय विद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्रीकृष्ण मंदिराद्वारे विद्यार्थी, पालक व त्याद्वारे संपूर्ण समाजाला भगवद्गीता, उपनिषदे व वेदांच्या ज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.

संकल्प सर्वोदय संकुलामध्ये मिळालेल्या दगडी खदाणी वजा जमिनीमध्ये २००७ पासून २५ ते ३० फुटांचा भराव करून वृक्षारोपण केले जात आहे. संस्थेने २००७ पासून खदाणींच्या जमिनीमध्ये परिश्रमाने ५२८ विविध भारतीय वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धन केलेले आहे. तसेच, विविध संस्था व संघटनांना आवाहन करून २०२३ मध्ये सुमारे ५०० हून जास्त विविध भारतीय वृक्षांची लागवड केलेली आहे. सुरुवातीलाविद्यार्थी आणि शिक्षकांनी रांग लावूनखदाणींमधून पाणी घातले होते. स्थानिक समाजकंटकांकडून अनेकदा ही झाडे तोडण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही ही झाडे टिकून असून आता परिसराला जंगलाचे स्वरूप आले आहे. सामाजिक वनीकरणाचा हा एक यशस्वी प्रयोगच म्हणता येईल. स्थानिक होतकरू तरुणांना सहकार्य करून सदर संकुलामध्ये कुक्कुटपालन प्रशिक्षण केंद्र, मत्स्यपालन प्रशिक्षण केंद्र, सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र इत्यादीची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर संकुलामध्ये असलेल्या संकल्प गोशाळेचा सेंद्रिय खत प्रकल्पाकरिता व सेंद्रिय शेतीकरिता उपयोग होत आहे. संकल्प गोशाळेद्वारे देशी वंशाच्या गाईंचे जतन करण्यात येत आहे. संकल्प सर्वोदय संकुलामध्ये फॅब्रिकेशन वेल्डिंग व इलेक्ट्रिशियन इ. कौशल्यांचे ही प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर सर्वोदयशैक्षणिक संकुलामध्ये असलेल्या श्रीकालिका मंदिरात परिसरातील अनेक भाविक येत असतात. प्रत्येक अमावस्येला देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक येत असतात. देवीच्या कृपाछायेखाली ‘संकल्प’ संस्थेचा उत्कर्ष होताना दिसत आहे, असा विश्वास संस्थेचे संस्थापक संचालक महेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

संस्थेने आतापर्यंत केलेल्या कार्यापैकी कोरोनाकाळातील कार्य अधिक महत्त्वपूर्ण वाटते. संस्थेने कोरोनाकाळात ५०० हून अधिक कुटुंबांना महिन्याभराचे व दैनंदिन उपयोगाचे धान्य वाटप केले आहे. तसेच लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक होमिओपॅथी गोऴ्याचे वाटप केले आहे. संस्थेतर्फे वीटभट्टीवर काम करणार्‍या कामगार व मुलांसाठी दिवाळीनिमित्त कपडे व फराळाचे नियमित वाटप केले जाते. संस्थेच्या स्थापनेपासून संचालक महेंद्र वसंत पाटील हे कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात २००७ पासून सहाय्यक अभियंता या पदावर कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष म्हणून वसंत रामचंद्र पाटील (माजी ठाणो जिल्हा परिषद) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.