कर्नाटक जात सर्वेक्षणात 165 कोटींचा घोटाळा : भूपेंद्र यादव

- भाजपचा आरोप; काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये ‘ओबीसी’विरोध

    17-Jun-2025
Total Views |

165 crore scam in Karnataka caste survey
 
नवी दिल्ली: “कर्नाटक सरकारने जात सर्वेक्षणासाठी 165 रुपये खर्च केले आहेत. मात्र, आता नव्याने जात सर्वेक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या सर्वेक्षणासाठी खर्च झालेल्या 165 कोटी रुपयांचे काय,” असा सवाल केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव यांनी सोमवार, दि. 16 जून रोजी भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
 
“सामाजिक न्यायाचा दावा करणार्‍या काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये ‘ओबीसी’विरोध भरलेला आहे. त्यामुळे राजीव गांधी यांनी ‘मंडल’ आयोगास संसदेत विरोध केला होता. त्याचप्रमाणे ‘मंडल’ आयोगाच्या अहवालास लागू होण्यासाठी देशात जनता पक्षाचे सरकार सत्तेत यावे लागले होते. ओबीसी समुदायास कमकुवत करण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण राहिले असून आतादेखील राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष तेच धोरण पुढे रेटत आहे,” असा आरोप केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केला.
 
लांगूलचालन हेच काँग्रेसचे धोरण
 
“कर्नाटकमध्ये जात सर्वेक्षणासाठी काँग्रेसने 165 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, तो अहवालच रद्द करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या जनतेच्या 165 कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने सर्वेक्षणात लिंगायत आणि वोक्कालिंग या प्रमुख समुदायांची लोकसंख्या कमी दाखविली आहे; तर मुस्लिमांची लोकसंख्या अधिक दाखवली आहे. त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या सर्वच जातींना ओबीसी आरक्षणात आणण्यात आले आहे. त्यामुळे सामाजिक न्याय नव्हे; तर लांगूलचालन हेच काँग्रेसचे धोरण आहे,” अशी टीका केंद्रीय मंत्री यादव यांनी केली आहे.