आकर्षण व्हिक्टोरियाचे, आकर्षण गुलामगिरीचे...

Total Views |
व्हिक्टोरिया


शेवटी ब्रिटिश पंतप्रधान बेंजामिन डिझरायली याने १८७६ मध्ये ‘रॉयल टायटल अ‍ॅक्ट’ असा कायदाच पास केला आणि त्यानुसार दि. १ जानेवारी, १८७७ रोजी राणी व्हिक्टोरियाने ‘भारत सम्राज्ञी’ असा किताब अधिकृतपणे धारण केला.



दि. १६ एप्रिल, १८५६ या दिवशी भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे मार्गावर धावली. आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आजचं मशीद बंदर स्थानक यांच्या दरम्यानच्या भूभागावर तेव्हा एक स्थानक होतं, त्याचं नाव होत बोरीबंदर. ते खरं आद्य स्थानक. पहिली गाडी तिथून सुटली. मग भायखळा स्थानकावर त्या गाडीत मुंबईतले सगळे मान्यवर लोक चढले नि गाडी ठाण्याला गेली.

पुढे १८७८ साली रेल्वे कंपनीने (ग्रेट इंडियन पेनिन्सूला’ उर्फ ‘जीआयपी रेल्वे कंपनी’) बोरीबंदर स्थानकाच्या आणखी दक्षिणेकडे एक अतिभव्य टर्मिनस उभारायला सुरुवात केली. नऊ वर्षांनी म्हणजे १८८७ साली ते काम पूर्ण होऊन गाड्या तिथून सुटू लागल्या. मग बोरीबंदर स्थानक रद्द करण्यात आलं. १८८७ साली ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया हिच्या राज्यारोहणाला ५० वर्षे पूर्ण होत होती. म्हणून नव्या टर्मिनसचं नावही ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ अस ठेवण्यात आलं. १९९६ साली ते बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ करण्यात आलं.


१८८७ सालीचं मुंबईत भायखळ्याला ‘इंजिनिअरिंग कॉलेज’ निघालं. व्हिक्टोरिया राणीच्या ‘गोल्डन ज्युबिली’चं निमित्त करुन त्याचंही नाव ‘व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नोलॉजिकल इन्स्टिट्यूट’ (व्हीजेटीआय) असं ठेवण्यात आलं. बरोबर १०० वर्षांपूर्वी म्हणजे १९२३ साली ‘व्हीजेटीआय’ भायखळ्याहून आजच्या जागी म्हणजे माटुंग्याला स्थलांतरित करण्यात आलं. मूळ जागी ‘जीआयपी’ रेल्वेचं रुग्णालय सुरू करण्यात आलं. आज आपण ज्याला ’भायखळा सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल’ म्हणून ओळखतो, त्याची इमारत हॉस्पिटलची न वाटता कारखान्याची वाटते. त्याचं कारण हेच होय. १९९७ साली ‘व्हीजेटीआय’मधल्या ‘व्हिक्टोरिया ज्युबली’ या शब्दांना डच्चू देऊन तिथे ‘वीरमाता जिजाबाई’ हे शब्द आणले गेले. त्यामुळे संस्थेचे ‘व्हीजेटीआय’ हे नावही कायम राहिलं आणि इंग्रजी सम्राज्ञीचं नाव तर पुसलं गेलं.

१८३५ साली कंपनी सरकारने ‘अ‍ॅग्रो हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया’ या संस्थेला शिवडीमध्ये एक जागा दिली. सोसायटीने तिथे एक वनस्पती उद्यान निर्माण करावं, अशी कल्पना होती. पण, ते काम रखडलं नि अखेर कब्रस्तान झालं. मग पुन्हा १८६१ साली सोसायटीने जोर धरला आणि मुंबई प्रांतिक सरकारकडून भायखळा स्थानकाच्या पूर्वेला जागा मिळवली. वर्षभरात सोसायटीने तिथे एक वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय उभारलं. १८६२ मध्ये मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर बार्टल फ्रिअर याची पत्नी लेडी फ्रिअर हिच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन आणि नामकरण झालं ‘व्हिक्टोरिया गार्डन.’ त्याच वर्षी म्हणजे, १८६२ साली ‘व्हिक्टोरिया गार्डन’ परिसरात एक वस्तुसंग्रहालय उभारायला सुरुवात झाली. १८७२ साली त्या वस्तुसंग्रहालयाचं उद्घाटन होऊन त्याला नाव देण्यात आलं, ’व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड प्रिन्स अल्बर्ट म्युझिअम.’ १९७५ साली ही दोन्ही नावं अनुक्रमे ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान’ आणि ‘डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय’ अशी बदलण्यात आली.

१८७२ साली मुंबईच्या फोर्ट भागात एस्पल्नेड रोडच्या सुरुवातीला व्हिक्टोरिया राणीचा सिंहासनारूढ पुतळा बसवण्यात आला. बसलेल्या स्थितीत हा पुतळा आठ फूट दोन इंच एवढा उंच होता. पांढर्‍या शुभ्र संगमरवरी दगडात बनवलेला हा पुतळा गॉथिक शिल्पकलेचा एक अप्रतिम नमुना होता. १९६५ साली हा पुतळा जिजामाता उद्यानात हलवण्यात आला. आज नेमक्या त्याच जागेवर ‘ओव्हरसीज कम्युनिकेशन सेंटर’ किंवा ‘टाट कम्युनिकेशन’ची उत्तुंग इमारत उभी आहे.

व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्याच्या या कथानकाला एक उपकथानक आहे. ते भलतंच रोचक आहे. १६ ऑक्टोबर, १८९६च्या रात्री या पुतळ्यावर कोणीतरी डांबर ओतलं आणि गळ्यात खेटरांची माळ घातली. मुंबई सरकारने जंगजंग पछाडूनही कसलाही माग मिळाला नाही. त्याच महिन्यात मुंबईच्या मांडवी भागात प्लेगची साथ उद्भवली. बघता-बघता ती महामारी संपूर्ण देशभर फैलावली. प्लेग आटोक्यात आणण्यासाठी पुण्यात नेमणूक झालेल्या चार्ल्स वॉल्टर रॅण्ड या ‘आयसीएस’ अधिकार्‍याने अनन्वित अत्याचार केले. त्यामुळे दि. २२ जून, १८९७च्या रात्री त्याला ठार मारण्यात आले. तो व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरक महोत्सवी समारंभासाठी गव्हर्नरच्या बंगल्यावर गेला होता. तिथून परतताना दामोदर आणि बाळकृष्ण या चापेकर बंधूंनी त्याला उडवलं.
 
पुढे दामोदरपंत चापेकरांनी आपल्या कबुलीजबाबात रॅण्डच्या वधासोबतच ’मुंबईतल्या व्हिक्टोरिया राणीच्या पुतळ्यावर डांबर ओतणारे ते आम्हीच,’ असा जबाब दिला. पण, म्हणजे सरकार ते शोधून काढू शकले नाही. रॅण्ड पुण्यातल्या ज्या गव्हर्नरच्या बंगल्यावर गेला होता, तो बंगला म्हणजेच आजचं पुणे विद्यापीठ.सन १६७० मध्ये शिवरायांनी मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी असलेलं सुरत शहर दुसर्‍यांदा लुटलं. मुघल बादशहा मराठ्यांपासून आपलं संरक्षण करू शकत नाही, तेव्हा इथून चंबूगबाळं आवरलेलं बरं, असा सूज्ञ विचार करुन इंग्रजांनी आपलं मुख्यालय सुरतहून हळूहळू मुंबईला हलवलं. हे काम १७३५ मध्ये पूर्णत्वाला गेलं.

इंग्रजांनी सुरतेहून लवजी नसरवानजी वाडिया या जहाजबांधणी तज्ज्ञाला मुंबईत आणलं. लवजीने जहाजं तर बांधलीच, पण १७५४ ते १७६५ या काळात तीन उत्तम गोद्या बांधल्या. हा सगळा भाग आज दक्षिण मुंबईत ‘नेव्हल डॉकयार्ड’ या नावाने ओळखला जातो.परंतु, मूळ मुंबई बेटाचं जे पारंपरिक ऐतिहासिक बंदर होतं, ते म्हणजे माजगाव. १८७३ साली ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना झाली. ‘पोर्ट ट्रस्ट’ने माजगावमध्ये १८७५ साली ‘प्रिन्सेस डॉक’ आणि १८८५ साली ‘व्हिक्टोरिया डॉक’ अशा दोन गोद्या बांधल्या.

मोटरकारचा शोध १९व्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत लागला. तेथून युरोपात आणि मग भारतात मोटरगाड्या २०व्या शतकाच्या सुरुवातीस आल्या, तोपर्यंत बैलगाड्या, धमन्या, रेकले, धकडे, बग्गी, टांगा इत्यादी वाहनं प्रचलित होती. ती बैल, घोडे, खेचरं, क्वचित उंट आणि हत्ती या जनावरांद्वारे खेचली जात असत. खुद्द ब्रिटनमध्ये ’हॅनसम’ नावाची घोडागाडी प्रचलित आणि लोकप्रिय होती. अनेक हुशार लोक या घोडागाड्या अधिक हलक्या, अधिक मजबूत आणि टिकावू सोईस्कर, आकर्षक कशा करता येतील, अशा प्रयत्नांत असत. असंच एक नवीन मॉडेल १८७० साली इंग्लंडमध्ये अवतीर्ण झालं, ते एकदम लोकप्रिय झालं. लगेच त्याला नाव मिळालं, ‘व्हिक्टोरिया फैटन.’ लंडनमधून हे मॉडेल लगेच मुंबईत आलं आणि कमालीचं लोकप्रिय झालं.

१८६० साली इंग्रज सरकारने मलबार हिलपासून आजच्या मंत्रालयापर्यंत समुद्र मागे हटवून सपाट जमीन निर्माण करण्यास सुरुवात केली. हे काम थांबत-थबकत थेट १९२९ पर्यंत सुरू होतं. या प्रकल्पाला सरकारने नाव दिलं होतं, ‘बॅकबे रेक्लमेशन.’ मुंबईच्या पूर्वेचा समुद्र हा ‘फ्रंट बे’ म्हणून, पश्चिमेचा समुद्र हा ‘बॅक बे.’ या भराव घालून तयार केलेल्या जमिनीवर चर्नी रोडपासून कुलाब्यापर्यंत रेल्वे स्थानकं उभी राहत गेली. पुढे अनेक श्रीमंत वसाहती उभ्या राहिल्या अणि त्या परिसराला ‘मरिन ड्राईव्ह’ म्हणू लागले, पण रात्री विजेच्या दिव्यांनी गळ्यातल्या रत्नहारासारख्या लखलखणारा तो समुद्रकिनारा पाहून कुणा अनामिक इंग्रजाने त्याला ’व्हिक्टोरिया राणीच्या गळ्यातला रत्नहार’ अशी उपमा देऊन टाकली. तेव्हापासून त्याला ‘क्वीन्स नेकलेस’ असं अनधिकृत पण लोकप्रिय नावं पडलेलं आहे.

आत्तापर्यंतच्या वृत्तांतात पुन्हा पुन्हा उल्लेख आलेली ही व्हिटोरिया राणी सन १९३७ साली ब्रिटनच्या सिंहासनावर आरूढ झाली. तिच्या कारकिर्दीत ब्रिटनची राजकीय सत्ता सतत वाढतच गेली. सन १८५७ मध्ये भारतात ‘ईस्ट इंडिया’ कंपनी विरुद्ध प्रचंड क्रांतियुद्ध पेटलं. खरंतर या वेळी भारत इंग्रजांच्या हातातून जवळपास गेलाच होता, पण देव आणि आणि दैव इंग्रजांना अनुकूल ठरलं. इंग्रजांनी क्रांती चिरडून टाकली आणि कंपनी सरकारचा मुखवटा बाजूला सारून भारताची सत्ता रीतसर ब्रिटिश पार्लमेंटने हातात घेतली. दि. १ नोव्हेंबर, १८५८ या दिवशी भारताचा तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड रिपन याने अलाहाबाद (आता प्रयागराज) या ठिकाणी एक भव्य दरबार भरवून ‘राणीचा जाहीरनामा-क्विन्स प्रोक्लमेशन’ वाचून दाखवला. जाहीरनाम्यात म्हटलं होतं की, “ ‘ईस्ट इंडिया’ कंपनीची जुलमी सत्ता संपुष्टात येत असून आता राणी व्हिक्टोरियाचं उदार, न्यायी राज्य सुरू होत आहे.”

आता खरं म्हणजे ब्रिटिश साम्राज्य अमेरिका खंडातल्या कॅनडापासून अख्ख्या ऑस्ट्रेलिया खंडापर्यंत पृथ्वीच्या पाचही खंडांमध्ये पसरलं होतं. क्रिमियन युद्घामुळे फ्रान्स हा ब्रिटनचा एकेकाळचा हाडवैरी आता त्याचा मित्र बनला होता. ब्रिटन खरोखरच जगातली महासत्ता, महाशक्ती बनला होता. वैभवाच्या, सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर होता.पण, व्हिक्टोरियाचं एवढ्यावर समाधान होत नव्हतं. तिला अधिकृतपणे ‘एम्परेस् ऑफ इंडिया’ हा किताब धारण करायचा होता. यात एक व्यक्तिगत मुद्दाही होता. व्हिक्टोरियाच्या पाच मुलींपैकी एक मुलगी व्हिकी ही प्रशियाचा युवराज विल्हेल्म याला दिलेली होती. विल्हेल्म प्रशियाचा सम्राट बनला की, ही व्हिकी आपोआपच सम्राज्ञी बनणार होती. मग मुलगी जर अधिकृतपणे सम्राज्ञी, तर मी नुसतीच राणी का म्हणून?

शेवटी ब्रिटिश पंतप्रधान बेंजामिन डिझरायली याने १८७६ मध्ये ‘रॉयल टायटल अ‍ॅक्ट’ असा कायदाच पास केला आणि त्यानुसार दि. १ जानेवारी, १८७७ रोजी राणी व्हिक्टोरियाने ‘भारत सम्राज्ञी’ असा किताब अधिकृतपणे धारण केला. यावेळी भारतातल्या इंग्रज सरकारची राजधानी कलकत्ताच (आता कोलकाता) होती. पण, भारतीय जनमानसात राजधानी म्हटलं की, दिल्ली शहर हेच नाव ठसलेलं होतं. म्हणून भारताचा तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिटन याने दिल्लीत एक भव्य दरबार भरवला. त्यात भारतातले सर्व इंग्रज उच्चाधिकारी, सुमारे ६० प्रमुख संस्थानिक यांच्यासह एकूण ७० हजार लोक उपस्थित होते.

त्यांच्यासमोर लॉर्ड लिटनने व्हिक्टोरियाच्या सम्राज्ञी पदाचा डामडौल मिरवला. या सम्राज्ञीपदामुळे भारतीय संस्थानिक जे आतापर्यंत व्हिक्टोरियाच्या समकक्ष राज्यकर्ते होते, ते आता राजनैतिकदृष्ट्या तिचे मांडलिक राजे ठरले.आणि सामान्य माणसांचं काय? मुंबई आणि मद्रास इलाख्यांमध्ये १८७६ पासून भीषण दुष्काळ पडलेला होता. १८७६ ते १८७८ अशी दोन वर्षर्ं टिकलेल्या या दुष्काळात या दोन इलाख्यांमधली मिळून ५० ते ९० लाख माणसं मेली. एवढं ‘सगळं होऊनही आज आमच्या कथित सुशिक्षित मराठी माणसाला ‘मरिन ड्राईव्ह’ला ‘राणीचा रन्नहार’ म्हणायलाच आवडतं.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.