बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणेच तेजस्वी अहिल्याचीही लहानपपणापासून तशीच जडणघडण झाली. घोडेस्वारी, तलवारबाजी, हिशोब ठेवणे अशी भविष्यातील ‘महाराणी’ म्हणून आवश्यक गुणकौशल्ये बाल अहिल्याने खुबीने आत्मसात केली. जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने बालअहिल्येच्या अशाच काही गुणवैशिष्ट्यांची कानोसा घेणारा हा लेख...
इतिहास घडतो तो अनेक कारणांनी. इतिहास म्हणजे राष्ट्राचा सर्वांगीण इतिहास. चांगला इतिहास घडवणारी माणसे अलौकिक असतात. भारतवर्षात इतिहासाचार्य राजवाड्यांनीदेखील लहान-मोठी माणसे मिळून इतिहास घडवला. इतिहासाला भौतिक व आध्यात्मिक अशी दोन अंगे असतात. राज्यसत्ता, द्रव्य, सैन्य, शस्त्रास्त्रे यांतून भौतिक इतिहास घडतो आणि धर्म, तत्त्वज्ञान, विचार, वाङ्मय, सांस्कृतिक नेतृत्व यांतून आध्यात्मिक विकास इतिहास घडत असतो.
इतिहासाचे प्राध्यापक कुंभोजकर लिहितात, इतिहास समजून घेणे, हा सहभाग स्वीकारण्याचा एक मार्ग असू शकतो. संघर्ष आणि लढायांनी रसाळलेली रोमहर्षक वर्णने सांगणारा मनोरंजक विषय म्हणजे इतिहास, हा समज मागे पडून आपण समाज म्हणून कसे घडत गेलो, याचा शास्त्रोक्त संवेदनशील अभ्यास म्हणजे इतिहास, हे आता उमगायला हवे.
अहिल्याबाई होळकरांवर लिहायचे, अभ्यासायचे, त्यांचे कार्य जाणून घ्यायचे महत्त्वाचे कारण म्हणजे, गेली शतकानुशतके आपला समाज कसा घडत गेला आणि या थोर समाजाच्या जडणघडणीत या महान योगिनीचा सिंहाचा वाटा आहे. तिने सर्व राज्यांच्या सीमा ओलांडून अगणित समाजकार्ये केली, जी जागोजागी आजही पाहावयास मिळतात. यामुळेच तर हिंदू संस्कृती आजही जिवंत आहे, वाढत आहे. पण, ही इतिहास घडवणारी माणसे मुळात घडली कशी, हे जवळून पाहण्याची, अनुभवण्याची आणि अध्ययनाची गरज असते.
एक लहानशी बीड परगण्यातील चौंडी गावातील मुलगी इंदोरचे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या दृष्टीस पडते काय आणि मंदिरात दिवाबत्ती करणारी अहिल्या बघताच मल्हाररावांना ‘हीच माझी सून’ अशी खूण पटते काय! तिची ती थेट नजर, हत्ती, घोडे, राहुट्या यांना न घाबरता बघणे, तेथेच मुळी तिच्या निर्भयपणाची साक्ष मल्हारराव होळकर यांना पटते. माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्या, ते सुभेदार होळकरांची सून अहिल्या, ते पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर हा प्रवास कसा झाला, हे जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे आपण थोड्या भूतकाळातल्या एक-दोन घटना लक्षात घेऊ की, स्त्री ही पूर्वीपासून सक्षम होती. फक्त एक-दोन उदाहरणे इथे देईन.
विश्पला : खेळ राजाची पत्नी
युद्धकलेतही त्याकाळी स्त्रिया निपुण होत्या, याची अनेक उदाहरणे आहेत. विश्पला खेळ राजाची पत्नी. लहानसे राज्य पण धनसंपन्न. राजाने पाण्याचे व्यवस्थापन नीट केले नाही. शेजारचे सर्व राजे पाणी आपल्या राज्यात वळवून नेत. प्रजा त्रस्त झाली. विश्पलाने अगस्ती ऋषींना सांगितले, जर यंदाही पिकले नाही, तर आधीच धान्यकोठारे रिकामी आहेत, रयतेचे हाल होतील. मग अगस्ती ऋषींनी राजांना संदेश दिला, पण तो राजांनी हलयात घेतला. अगस्ती ऋषीपण सैन्य बाळगून होते, पण आपण सैन्य पाठवणे योग्य होणार नाही, असे त्यांना वाटले. मग विश्पलानेच सैन्याची कमान आपल्या हातात घेतली व इतर राजांना हरवले. तिने स्त्रीसेनाही तयार केली. युद्धात विश्पलाने एक पाय गमावला. लोखंडी पाय बसवून ती पुन्हा जोमाने लढली.
बद्रीमतीचे लढाईत दोन हात कापले गेले ते पुन्हा बसवून ती युद्धाला सामोरी गेली.
ऐतरेय ब्राह्मणात इंद्राणीला ‘सैन्याची देवता’ म्हणून संबोधण्यात आले आहे.
जुहू ही बृहस्पतीची पत्नी. तिने आपल्या बुद्धिमत्तेने ऋषिजनांत आपले स्थान निर्माण केले. आज ऋग्वेदातील अनेक संग्रहित ॠचा या जुहूने रचलेल्या आहेत.
स्त्री ही वेदअभ्यासाची अधिकारी होती. मंत्र रचणारी, वेदरचिता मानली जायची, अशा २५-३० ऋषिकांचा ऋग्वेदात उल्लेख आहे. त्यांची नावे अगस्त-स्वसा, अदिती, अपाला, इंद्रायणी, इंद्रस्नुषा, उर्वशी, कुशिका, रात्री, गोधा, घोषा, कक्षीवती, जुहू, प्रजापत्या, यमी, रोमशा, लोकमुद्रा, सूर्या, सावित्री काय आणि किती नावे सांगू! हे एवढ्याचसाठी सांगितले की, आपली परंपरा ही महान आहे आणि आज आपण इतिहास शिकतो, ते याचसाठी की पुढच्या पिढीने त्यातून बोध घ्यावा व महान कार्य करावे.
अहिल्याबाईंच्या मागच्या-पुढच्या काळात मराठीशाहीतही अनेक कर्तृत्ववान आणि चौकस स्त्रिया राजकारणात होत्या. राजारामांच्या पत्नी ताराबाई आणि नानासाहेब पेशवे यांच्या पत्नी गोपिकाबाई ही त्यांतील ठळक नावे. या स्त्रिया पती-पुत्राला गादीवर बसवण्यासाठी किंवा त्यांच्या लोभासाठी अटीतटीने संघर्षात उतरल्या, डावपेच खेळल्या. येथेच अहिल्याबाईंचे वेगळे वैशिष्ट्य लक्षात येते की, निस्वार्थपणे राज्याची, प्रजेची सेवा करण्यात त्यांनी आयुष्य घालवले.असा हा महान इतिहास. मग देवी अहिल्या कशी घडत गेली, याची झलक तिने आठ वर्षांची असतानाच बाजीराव पेशवे व मल्हारराव होळकर यांना दिली आहे.
एकदा बाजीराव पेशवे मल्हारराव होळकरांबरोबर लढाईहून परतत होते. सैन्याचा तळ पूर्वीचे अहमदनगर (आताचे अहिल्यानगर) येथील चौंडी गावात होता. मैत्रिणींबरोबर नदीकाठच्या वाळूत शिवलिंग तयार करत अहिल्या बसली होती. तोच सैन्यातील एक घोडा उधळला. मैत्रिणी ओरडल्या, "अहिल्या पळ, घोडा उधळलाय.” मैत्रिणी पळाल्यासुद्धा. पण, अहिल्या? तिने आपले सर्व शरीर त्या पिंडीवर झाकले. भरदाव सुटलेला घोडा अहिल्येच्या बाजूने निघून गेला. त्याचवेळी मल्हारराव आणि बाजीराव धापा टाकत तिथे पोहोचले. तिला संतापाने खसखन उभे करून बाजीरावांनी ओरडून विचारले, "पोरी, इथे का थांबलीस? उधळता घोडा तुला तुडवून गेला असता.” त्यावर मुळीच न घाबरता, आपले तेजस्वी डोळे बाजीरावांच्या डोळ्यांना भिडवत ती म्हणाली, "जे आपण घडवावे, ते जिवापाड प्रसंगी जीव सांडूनही रक्षावे, असंच सगळी वडीलधारी माणसं सांगतात. मी तेच केले. मी घडविलेल्या पिंडीचे रक्षण केले. माझे काही चुकले का?” ते तेजस्वी आणि मधुर शब्द ऐकून बाजीराव पेशवे थक्क झाले. मल्हारराव आनंदाने बघत राहिले. बाजीराव मल्हाररावांकडे वळत उत्स्फूर्तपणे म्हणाले, "मल्हारबा, या पोरीस तुमची सून करून घ्या. तिला राज्याच्या लायक करा. ही राज्य नावारुपास आणेल. हिला सून करून घ्या आणि राज्यकारभाराच्या अनेक पदरांचे शिक्षण द्या.”
लग्नानंतर लगेचच तिचे शिक्षणही सुरू झाले. तिच्यासाठी गुरू नेमस्त केले गेले. असा उल्लेख आहे की, दूध गटागटा प्यावे, त्याप्रमाणे ती ज्ञान पिऊन टाकीत होती. गणित, वाचन, भूगोल यांचेही शिक्षण तिला दिले जाई. सात-आठ वर्षांतच ती केवळ एका नजरेने हिशोबातली चूक काढू लागली. घोडेस्वारी करून जिल्हे, तालुके, वाटाक्षेत्रे यांची सर्व माहिती ती घेत होती. अशी ही अहिल्या ‘मल्हार विद्यापीठा’त तयार होऊ लागली. त्या काळातील प्रथा मोडून मल्हाररावांनी आपला मुलगा खंडेराव यांच्या बरोबरीने अहिल्याबाईस युद्धनीती, घोडेस्वारी, तलवार चालवणे, दानपट्टा आदी बाबींचे शिक्षण दिले. अनेक युद्धमोहिमांवर सासू गौतमाबाईंबरोबर अहिल्याबाईही असत. कडक शिस्तीचे जे शिक्षण अहिल्याबाईंना मिळाले, त्यानुसार त्या वागत गेल्या.
अनेकदा म्हटले जाते, बाळाचे पाय पळण्यात दिसतात. याप्रमाणेच, देवी अहिल्येने हे अनेक प्रसंगांमधून दाखवून दिले आहे. हेच गमक आहे, आपल्या भारतीय संस्कृतीचे. आपल्याला ही जी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे, ती अनेक पुराण, ग्रंथ, साहित्य यांमार्फत आपल्यापुढे पोहोचते आणि त्याचे अनुकरण करून पुढील पिढी घडते, समृद्ध होते. स्त्री ही दोन्ही कुलांचा उद्धार करते म्हणतात, ते हेच आहे. नवीन पिढीने अशी चरित्रे वाचून आपल्याला किती समृद्ध वारसा लाभलेला आहे, हे जाणून घेतले पाहिजे.
सुनिता पेंढारकर
९८६०९७०७१५