हुंडाबळी कधी थांबणार?

    31-May-2025   
Total Views |

हुंडाबळी कधी थांबणार?


प्रगत पुरोगामी महाराष्ट्रात आजही वैष्णवीला हुंडाबळी जावे लागले. अत्यंत दुःखद आणि संतापजनक घटनेसंदर्भात समाजमन काय म्हणते, या सगळ्याचा मागोवा या लेखात घेतला आहे. सगळ्याचा सारांश आहे, वैष्णवीला न्याय मिळायलाच हवा, तसेच यापुढे कोणतही मुलगी हुंडाबळी जाऊ नये, हीच अपेक्षा...


बाबा! मैं कभी दुःख में रोऊँ इस घाट

तो उस घाट नदी में स्नान करते तुम

सुनकर आ सको मेरा करुण विलाप

जिससे खाया नहीं जाए,

मेरे भूखे रहने पर उसी से ब्याहना मुझे


प्रत्येक मुलीच्या अंतरीचे हे गुज. वैष्णवीही त्याला अपवाद नव्हतीच. आईबाबांना कर्जाच्या खाईत लोटून हुंडा देऊन पती खरेदी करावा, असे कोणत्याही लेकीला आणि वैष्णवी कस्पटेलाही वाटले नसणारच. वयात आल्यावर मुलीचे मन जेव्हा वारा बांधून भिरभिरते, त्यावेळी तिच्या स्वप्नात राजकुमाराची चाहूल येतेच. तिची इच्छा काय असते, तर तिचा साथीदार तिच्यावर मनापासून प्रेम करणारा, तिची काळजी घेणारा असावा. पैशाने किंमत शून्य असेल, पण भावनेच्या जगात मूल्य असतील, अशा छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करणारा तो असावा. वैष्णवीच्या मनातही हेच असणार. अनेकदा म्हटले जाते की, मुलींना आणि तिच्या घरच्यांना श्रीमंत पती आणि सासर हवे असते. पण, आपल्या मुलीला सगळी सुखे प्राप्त व्हावी, अशी प्रत्येक आईबाबांची इच्छा असते. पती श्रीमंत आहे आणि सासर मुलीला छळत असेल, तर कोणते आईबाप त्या घरात मुलीला देतील? शक्यता कमीच.

त्यानुसार वैष्णवी हगवणेच्या दुर्दैवी आणि संतापजनक आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तिच्या शवविच्छेदन अहवालानुसार, स्पष्ट झाले की, मृत्यूपूर्वी अनेक दिवस तिच्यावर शारीरिक अत्याचार झाले. तिचा छळ हुंड्यासाठी केला जात होता म्हणे. तसेच तिच्या आईबाबांनी तिच्या लग्नात ५१ तोळे सोने आणि फॉरच्युनर गाडी दिली होती. लग्नसमारंभासाठी लाखो रुपयेे खर्च केले होते. पुढेही मानपानाच्या स्वरुपात भरपूर काही दिले होते. हे सगळे का केले असेल, तर वैष्णवीच्या बाबांचे म्हणणे की, वैष्णवीचे आधी दोनदा लग्न जुळता जुळता तुटले होते. त्यामुळे हे जुळणारे लग्न तुटू नये, म्हणून त्यांनी हगवणे कुटुंबांच्या मागण्या मान्य केल्या. वैष्णवीच्या आईबाबांची हुंडा देण्यामागची हतबलता समजूच शकतोे. आजही एखाद्या घरचे लग्नसमारंभ म्हणजे त्या घरची सांपत्तिक आणि सामाजिक स्थिती दर्शवण्याचे साधन मानले जाते. या पार्श्वभूमीवर वैष्णवी हिच्या माहेरच्यांनी हगवणे कुटुंबाला हुंडा का दिला असेल, हे स्पष्ट होते. हुंडा देणे-घेणे दोन्ही गुन्हाच आहे. तरीसुद्धा, हे घडत आहे.

छळ होत असताना वैष्णवी तेथून बाहेर का पडली नाही, का सहन करत बसली, असे प्रश्न विचारले जात आहेत. पण, समाजात काय चित्र आहे? ‘लाडो जिस घर मे तेरी डोली गई, उस घर से तेरी अर्थी निकले’ हे वाक्य काही सिनेमातलेच नाही. एकदा का सासरी गेलीस की तू पुन्हा कायमची माहेरी येऊ नकोस, हे मुलींच्या मनात आजही ठसवले जाते. कारण, उभे आयुष्य मुलगी एकटी कशी काढेल, समाज काय म्हणेल, असे दडपण प्रत्येक आईबाबांवर असते. त्यामुळे लेकीचेे कसेही लग्न टिकावे, असे तिच्या आईबाबांना वाटते. त्यामुळेच वैष्णवीच्या बाबतीतही तिचे आईबाबा तिच्या सासरच्यांच्या सगळ्या अवाजवी मागण्या पूर्ण करत राहिले असावेत बहुतेक.

आता तर काय, वैष्णवीच्या मृत्यूपश्चात तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. भयंकर! स्त्री जिवंत असतानाही तिला जर पराजित करता येत नसेल, तर तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करायची, हे तर सर्रास होते. पण, आता एका लेकीच्या मृत्यूनंतरही तिच्या चारित्र्यावर आक्षेप घेतला जातो. चारित्र्याची व्याख्या तरी काय? चारित्र्यहनन करून स्त्रीला किती काळ बदनाम व्हावे लागणार आहे, तिला किती काळ गुन्हेगाराच्या पिंजर्‍यात उभे केले जाणार आहे, देव जाणे.

विषयांतर झाले असे वाटले, तरी मुद्दा हाच आहे की, जरी वैष्णवी कुणासोबत बोललीही असेल, तर त्यावरून तिचा क्रूर छळ होणे, इतका की तिने आत्महत्या करावी, हे सर्वथा अमानवी आहे. बिचारी वैष्णवी! विवाह संस्था महत्त्वाची आहेच, पण दुर्दैवाने त्या विवाहानंतर आयुष्याचा नरक झाला असताना, त्यातून सुटकेचा विचारही न करण्याच्या कोणत्या भयाण जगात वैष्णवी जगत होती! मृत्यूशिवाय पर्याय नाही, अशी विवशता तिला का यावी? आपली सुटका नाही आणि कुणीच या नरकातून बाहेर काढू शकणार नाही, ही जी भयंकर हतबलता तिच्या मनात निर्माण झाली, त्या हतबलतेचा, त्या तिच्या मानसिकतेचा विचार केला की वाटते, तिच्या मृत्यूला कारणीभूत होणार्‍यांना तत्काळ आणि कडक शिक्षा व्हायला हवी.

अर्थात, न्यायव्यवस्था वैष्णवीला न्याय देईलच, पण समाजव्यवस्था कधी कामाला लागेल? जर विवाहाचे बंध लेकीचे श्वास हिरावून घेत असतील, तर तुझे माहेरचे दार आणि मन तुझ्यासाठी उघडे आहे, हा विश्वास प्रत्येक माहेरच्यांनी मुलीला दिलाच पाहिजे. भारतात हुंडाविरोधी कायदा आहे. त्या कायद्याचे ज्ञान प्रत्येेकीला असायलाच हवे. मात्र, या कायद्याचा चुकीचा वापर करू नकोस, हे भान तिला द्यायला हवे. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर मुली, महिलांना आपल्या जिवाची किंमत कळायलाच हवी. नालायक, नीच लोकांच्या क्रूर कृत्याची शिक्षा त्यांनी स्वतःला देऊ नये; तर अशा लोकांना त्यांच्या अपराधाची शिक्षा देण्यास त्यांनी सिद्ध व्हायला हवे. मुलीच्या जन्मानंतर ‘मुलगी झाली हो’ म्हणत तिच्या भविष्याची तरतूद करताना तिच्या आईबाबांनी आणि समाजानेही तिच्याबरोबर तिच्या सुरक्षिततेचे, तिच्या आत्मतेजाचे वातावरण तिला द्यायलाच हवे. तिला आत्मविश्वास द्यायलाच हवा की,

तूच ग तुझी खरी कहाणी

ये गं ये ये बाई

गाऊ आकाशाची अ आ इ ई...

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.