मकर संक्रांती अशुभ नाही ! - दा. कृ. सोमण

यावर्षी मकर संक्रांती १५ जानेवारीला !

    10-Jan-2023
Total Views | 93

मकर संक्रांती

 
ठाणे : कोणतीही वाईट घटना घडली की, “संक्रांती ओढवली“ असे सर्रास म्हटले जाते. पण हे योग्य नाही, असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. धनू राशीतून मकर राशीत सूर्याने प्रवेश करणे तसेच या दिवसापासून दिनमान वाढत जाणे, हे वाईट कसे म्हणता येईल ? तिळगूळ देऊन गोड बोलायला शिकविणारा हा दिवस वाईट कसा असू शकेल ? संक्रांतीदेवीने जर या दिवशी दुष्ट राक्षसाला ठार मारले असेल तर ते वाईट कसे असू शकेल ? मकर संक्रांतीचा सण हा अशुभ नाही.तेव्हा,अफवा पसरवू नका. मकर संक्रांती कोणालाही वाईट नसते,असेही सोमण यांनी स्पष्ट केले.

 
यावर्षी शनिवार १४ जानेवारी रोजी रात्री ८:४४ वाजता सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करणार असल्याने मकर संक्रांती रविवार १५ जानेवारी रोजी आली आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. तसेच, त्यांनी मकर संक्रांती विषयक वैज्ञानिक माहितीही दिली.
 
 
दा. कृ.सोमण म्हणाले की,निरयन मकर संक्रांती दरवर्षी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही. सूर्याने एकदा मकर राशीत प्रवेश केल्यापासून पुन्हा मकर राशीत प्रवेश करीपर्यंत ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे निरयन मकर संक्रांतीचा दिवस हा पुढे पुढे जात असतो. सन २०० मध्ये निरयन मकर संक्रांती २२ डिसेंबरला आली होती. सन १८९९ मध्ये १३ जानेवारीला आली होती. १९७२ पर्यंत मकर संक्रांती १४ जानेवारीलाच येत होती. २०८५ पर्यंत मकर संक्रांती कधी १४ ला तर कधी १५ जानेवारीला येत राहील. सन २१०० पासून निरयन मकर संक्रांती १६ जानेवारीला येणार आहे. सन ३२४६ मध्ये निरयन मकर संक्रांती चक्क १ फेब्रुवारीला येणार आहे. त्यामुळे निरयन मकर संक्रांती नेहमी १४ जानेवारीलाच येते हे खरे नाही.सन २०२४, २०२७ मध्ये निरयन मकर संक्रांती १५ जानेवारीला तर सन २०२५, २०२६, २०२९, २०३० मध्ये १४ जानेवारीला येणार आहे.
 
संक्रांतीला काळे वस्त्र आणि तीळ


मकरसंक्रांतीला काळे वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे.काळा रंग हा अशुभ नाही.सौभाग्य लेणे मंगळसूत्राच्या मण्यांचा रंगही काळाच असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते.या दिवसापासून दिनमान वाढायला सुरुवात होते.काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो.दुसरे महत्त्वाचे वैज्ञानिक कारण म्हणजे सफेद रंग जसा उष्णता परावर्तित करतो,उष्णता शोषून घेत नाही.तसा वस्त्राचा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. मकर संक्रांत थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा आहे. थंडीच्या दिवसात तीळ हे शरीरास अत्यंत उपयोगी असतात.म्हणून तीळ-गूळ देण्याची प्रथा पडली आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळाचे महत्त्व अधिक आहे. आयुर्वेदामध्ये तीळ औषधी असल्याचे सांगण्यात आले असून अनेक आजारांवर औषध म्हणूनही तीळांचा वापर केला जातो.

 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121