धन्य व्हावे रामनामे...

    08-Sep-2022   
Total Views |
 
ramdas
 
 
  
 
समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते. रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो.  
 
आतापर्यंत सर्वोत्तमाच्या दासाची विविध लक्षणे सांगून झाली. तसेच या भक्ताचे व्यवहारातील वागणे कसे दयाळू अंतःकरणाचे, सर्वांवर माया, प्रेम करणारे असते, यावरही स्वामींनी आपले विचार मांडले. लोक कसेही वागले, तरी या भक्ताचे वागणे स्नेहपूर्ण असते. तो कसलीही तक्रार करत नाही. अध्यात्मातील ध्येय त्याला प्राप्त झाल्याने तो नित्यतृप्त, समाधानी संतुष्ट असतो. अधिक काही मिळवण्याची लालसा त्याच्या ठिकाणी नसल्याने ‘आता उरले उपकार पुरता’ अशा वृत्तीने तो लोकसमुदायात वावरत असतो. भगवंताचे अनुसंधान सांभाळून तो चारचौघांसारखे जीवन जगतो, तथापि अंतरात पूर्णपणे समाधान असल्याने ते त्याच्या चेहर्‍यावर दिसते. आपल्याला प्राप्त समाधानाचे रहस्य त्या संबंधीच्या ज्ञानाचे दान करीत प्रपंच विकारात बुडालेल्या बद्ध जीवांना तो आत्मोद्धाराचा मार्ग दाखवतो. आपल्या सर्व संतांच्या कार्याची दिशा याच स्वरूपाची असते. त्यामुळे या निरीच्छ संतांचा प्रभाव जनमानसावर वर्षानुवर्षे टिकून राहतो. संतांचे हे निःस्पृह साम्राज्य अबाधित राहाते. आजकाल सर्वसामान्य माणसांत लोकप्रियतेची चर्चा असते, ती राजकीय पुढार्‍यांची, नेत्यांची आणि झगमगत्या सिनेसृष्टीत वावरणार्‍या देखण्या नटनट्यांची, पण त्यांची लोकप्रियता फार मर्यादित काळापुरती असते. लोक त्यांना विसरतात किंवा त्यांचे वैयक्तिक चारित्र्य असमाधानकारक आढळले, तर त्यांच्या विरोधात जाऊन त्यांचा तिरस्कार करू लागतात, पण, निःस्पृह संतांचे तसे नसते. त्यांचे जनप्रियत्व ओसरत नाही, या संतांच्या विचारांच्या प्रभावाने सामान्य माणसेही भगवंताची भक्ती करू लागतात आणि जीवनात सुखसंतोष मिळवू लागतात. तथापि ती निष्काम भक्ती करीत असताना साधकाने कसे वागावे, हे आता स्वामी पुढील श्लोकातून सांगत आहेत.
 
जगीं होइजे धन्य या रामनामें।
क्रिया भक्ती उपासना नित्यनेमें।
उदासीनता तत्त्वता सार आहे।
सदा सर्वदा मोकळी कृति राहे ॥५७॥
 
संत महात्मा असलेला हा सर्वोत्तमाचा दास धन्य होय, असे त्या भक्ताचे गुणविशेष सांगून समर्थ म्हणाले तेव्हा आपणही अशी धन्यता मिळवावी, असे प्रत्येकाला वाटू लागते. आध्यात्मिक साधना करणार्‍या साधकाला असे ध्येय समोर ठेवावे लागते.
सर्वोत्तम दासाचे ध्येय समोर असल्याशिवाय साधकाच्या अंत:करणात सुधारणा घडवून आणणे शक्य होत नाही. या साधकभक्ताच्या अंगी कोणते गुण असावेत व ते त्याने कसे प्राप्त करावे, यावर आता स्वामी चर्चा करीत आहेत. स्वामींनी या श्लोकाच्या पहिल्याच ओळीत सांगून टाकले की, तुम्हाला ही धन्यता मिळवायची आहे, तर रामनामाशिवाय दुसरे साधन नाही. रामनामाच्या अभ्यासाने साधकाला आपले ध्येय गाठता येईल. सर्व संत नामसाधना करायला सांगतात. समर्थांचे आराध्यदैवत राम असल्याने ‘जगीं होईजे धन्य या रामनामे’ असे स्वामी म्हणाले. स्वामींच्या मते, राम हाच अंतरात्मा असून तो परब्रह्म आहे. रामनामाचा जप करीत असताना रामाच्या अंगी असलेल्या अनेक गुणांंची आठवण येते.
रामचरित्राचा अभ्यास करताना लक्षात येते की, रामाच्या ठिकाणी अनेक उत्तमोत्तम गुण एकवटले आहेत. त्या रामाला आपला आदर्श मानून त्याच्या गुणांची उजळणी आपल्या मनात होत राहिली, तर त्या गुणांचा स्पर्श आपल्या अंत:करणाला होतो. उपास्य दैवताचे थोडेतरी गुण उपासकात उतरतात, असा नियम आहे. म्हणून रामनामाने आध्यात्मिक क्रिया-उपासना या भक्तिभावाने व नियमितपणे करणे आवश्यक आहे. येथे नियमितपणाला महत्त्व आहे. तसे पाहिले, तर व्यवहारातसुद्धा एखादी गोष्ट मिळवायची, तर त्यासाठी नियमितपणे प्रयत्न करावे लागतात. तब्येत चांगली राखायची, तर फक्त एक दिवस व्यायाम करून चालत नाही. सतत नियमितपणे व्यायाम केला, तरच त्याचे फळ मिळते. गाणे शिकायचे, तर सातत्याने त्याचा सराव करावा लागतो. कुठलीही गोष्ट सातत्याने म्हणजे नियमितपणे केल्याशिवाय ती साध्य होत नाही. धरसोड वृत्तीने किंवा आळसाने त्यात खंड पडला, तर प्रपंचातील साधी गोष्टही मिळवता येत नाही. मग, अध्यात्मातील सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्व प्राप्त करायचे, तर त्यासाठी नित्यनेम हवाच म्हणून आध्यात्मिक क्रिया, भक्ती, उपासना या ‘नित्यनेमें’ कराव्यात, असे स्वामी सांगतात. तथापि उपासनेच्या क्रिया यांत्रिक पद्धतीने सतत केल्या, तर त्यातून काहीही लाभ होणार नाही. या क्रिया भक्तिभावाने प्रेमाने केल्या पाहिजेत, असे स्वामी सांगतात. भक्तिप्रेमाने भगवंताला शरण जावे, त्यात जीवाचे कल्याण आहे, असे लोकांना वाटत नाही. लोकांना विषयोपभोगाचा अहंकाराचा ओढा असल्याने सांसारिक गोष्टी विनासायाय मिळवण्यात त्यांना गोडी असते. भगवंताच्या भक्तिप्रेमात त्यांना रस नसतो.
 
अशा लोकांच्या दृष्टीने कामनिक व्रते म्हणजेच इच्छापूर्ण करणारी व्रते. आपला स्वार्थ पुरवणारी, अहंकार वाढवणारी व्रते लोकांना आवडतात. अशी व्रते आचरणार्‍या माणसांशी मैत्री करायला लोकांना आवडते. समर्थ यापूर्वीच्या एका श्लोकात म्हणाले की, ‘तये संगतीची जनीं कोण गोडी। जये संगतीने मती राम सोडी॥’ अमुक व्रत केले की, त्याचे अमूक फळ मिळते. या कल्पनेने लेक भारावून जातात आणि खर्‍या भक्तिमुखापासून वंचित होतात. स्वामींनी दासबोधात जे निरीक्षण नोंदवले आहे, ते अगदी योग्य आहे. समर्थ म्हणतात,
 
 
शास्त्रांचा बाजार भरला।
देवांचा गल्बला जाला।
लोक कामनेच्या व्रताला। झोंबोन पडती॥
 
या कामनापूर्तीच्या व्रताचरणात विधी-उपचारांना प्रमुख स्थान असल्याचे तेथे भगवंताच्या भक्तीचा अभाव असतो. त्यातील विधी तांत्रिक स्वरूपाचे असतात, पण लोकांना मात्र त्यांचे खूप आकर्षण असते. परंतु, समर्थांनी प्रस्तुत श्लोकात सर्व क्रिया-उपासना भक्तिभावाने करायला सांगितले आहे. नित्यनैमितिक पूजाअर्चा केल्याने मनाला चांगले वळण लागते. त्यातूनच भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव टिकून राहण्यास मदत होते. जीवनात शिस्तीला महत्त्व आहे. लष्करातील जवानांचे शिस्तबद्ध संचलन पाहिले की, आपल्या मनाला उभारी येते. त्यातून देशभक्ती जागी होते. तसाच परिणाम नित्यनेमाने केलेल्या शिस्तबद्ध उपासनेतून होतो. त्याने ईश्वरभक्ती जागी होते. भक्तिभावाने समाधान वाटते आणि जीवनात पवित्रता येते. हे सारे आनंदाने करायचे, तर त्यासाठी अनासक्ती, विरक्ती पाहिजे. समर्थ यालाच ‘उदासीनता’ असे म्हणतात. म्हणून समर्थांच्या मते उदासीनता हे तत्त्वत: सर्व भक्तिक्रियाचे, उपासनेचे सार आहे. आपली वृत्ती, मानसिकता स्वार्थ, अहंकार, मायापाश यांनी बांधली गेलेली असते. तिला त्यापासून मुक्त केल्याशिवाय आपल्याला भक्तिक्रियांचा, रामनामाचा निखळ आनंद व समाधान घेता येत नाही, यासाठी या श्लोकाच्या शेवटच्या ओळीत समर्थ, नेहमी मोकळेपणाने राहण्याचा सल्ला देतात. ‘सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे’ यातून समर्थांना हेच सांगायचे आहे की, सर्व अध्यात्मसुखाचा आपण मोकळेपणाने, मोकळ्या वृत्तीचे आस्वाद घेतला पाहिजे, तरच सुखसंतोषाची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचेल.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..