एषा सनत्नी सनम् एव जातैषा
पुराणी परि सर्वं बभूव।
महि देव्य् उषसो विभाती
सैकेनैकेन मिषता वि चष्टे॥
अन्वयार्थ
एषा (ही) सनत्नी (नेहमी पुढे नेणारी, सनातन नेत्री- नेता असलेली परमेश्वरी देवी (सनम् एव) नेहमीच (जाता) प्रकट झालेली आहे. (एषा पुराणी ) सर्वात जुन्या-सनातन अशा या देवीने (सर्वं) सर्वांना, अखिल ब्रह्मांडाला (परि बभूव) व्यापलेले आहे. (सा मही देवी) ती महान देवी (उषस: विभाती) उषांना प्रकाशित करीत (एकेन -एकेन मिषता) एकेका दृष्टीने, नजरेने (वि चष्टे) सर्वांना सर्व बाजूंनी पाहत आहे.
विवेचन
समग्र विश्वाचे सुव्यवस्थित व सम्यक् संचालन करणारा परमेश्वर आपल्या दिव्योत्तम गुणांनी व महत्कार्यांनी सर्वत्र विराजमान आहे. एकच तो ईश्वर! पण, आपल्या विविध कर्मांनी भक्तांद्वारे वेगवेगळ्या नावांनी संबोधला जातो. दिव्यगुणांनी परिपूर्ण असल्याने तो देव! दिवु क्रीडा, विजिगीषा, व्यवहार, द्युति, स्तुति, मोद, मद, स्वप्न, कांति, गतिषु या धातूंपासून हा देव शब्द तयार होतो. अशा या देव-परमेश्वरालाच ब्रह्मदेखील म्हणतात. ब्रह्म देव स्वरूपाने अलिंग्य आहे. म्हणजेच परमेश्वर हा पुल्लिंगात नाही. तो स्त्रीलिंगीही नाही. नपुंसकलिंगीदेखील नाही. त्याला तिन्ही लिंगांनी संबोधले जाते. पुल्लिंगात तो महान् देव = महादेव बनतो. स्त्रीलिंगात तो मही देवी= महादेवी होतो, तर नपुंसलिंगात तो महत् ब्रह्म=महाब्रह्म बनतो. अशा या देवाला आम्ही ‘पिता’ही म्हणतो आणि ‘माता’देखील! एका वैदिक प्रार्थनेत परमेश्वराला भक्त आराधना करीत म्हणतो आहे-
त्वं हि न: पिता वसो त्वं
माता शतक्रतो बभूविथ।
अधा ते सुम्नमीमहे ॥
(ऋग्.8.98.11, अथर्व.20.108.2)
हे ऐश्वर्यशाली, धनाच्या स्वामी देवा, तूच आमचा पिता=पालनकर्ता आहेस, तर असंख्य श्रेष्ठ कर्मांनी आम्हांवर कृपा करणार्या देवा, तूच आमची माता आहेस! म्हणूनच अगदी पवित्र मनाने आम्ही तुला वंदितो.
सदरील मंत्रात वर्णिलेली मही देवी ही अतिशय सनातन असून समग्र विश्वात व्यापलेली आहे. सनत्नी हे तिचे पहिले विशेषण. सनत् +नी म्हणजेच अनादी काळापासून नेहमीच सर्वांना घेऊन जाणारी. ही सनातन नेत्री म्हणजेच नेता आहे. समग्र ब्रह्मांडात निवास करणार्या सर्व प्रजाजनांना ही महान देवी नेहमीच पुढे घेऊन जाते. अगदी पूर्वीपासून सार्या जगात ही देवी विद्यमान आहे. प्रत्येक परमाणु आणि प्रत्येक अणू तसेच कणांकणांमध्ये ती दिव्यशक्ती भरून उरलेली आहे. अशा प्रकारची ही महान देवी या सृष्टीला पुढे गतिमान होण्यासाठी प्रेरणा देत आहे. सर्वत्र असूनदेखील ही दिसत नाही. मायेच्या पडद्याखाली लपलेली असूनदेखील ही या सबंध विश्वातील प्रत्येक कार्यातून प्रकट होतांना दिसत आहे. चर्मचक्षूंद्वारे न दिसणारी ही देवी अंत:चक्षूने मात्र जाणता व अनुभवता येते.
ती देवी असंख्य दिव्य गुणांनी परिपूर्ण आहे. ती सार्या जगाची आई जगदंबा, भवसागराला त्यापुढे नेणारी भवानी व आपल्या प्रचंड स्वरुपाने दुष्टांना संपवणारी चंडिका आहे. ही पुरातन शाश्वत व सनातन अशी आहे. या सनातन देवीने आपल्या अनंत शक्तीने सार्या जगाला व्यापलेले आहे. जिथे पाहावे, तिथे ती दृष्टीस पडते. अशी एकही जागा नाही की जिथे ही महान दिव्यशक्ती व्यापलेली नाही.
एषा अन्तर्अस्य सर्वस्यैषा
सर्वस्यास्य बाह्यतः।
ही महान देवी सर्वांच्या आतही आहे आणि बाहेरदेखील! याच सर्व्यापक अशा देवी भगवतीमुळे सारे जग अगदी सुव्यवस्थितरित्या संचालित होत आहे.
मंत्रात पुढे म्हटले आहे-
सा मही देवी उषस: विभाती एकेन एकेन मिषता विचष्टे!
ती दिव्य स्वरूपा महान अशी देवी सर्व प्रकारच्या उषांना प्रकाशित करीत आहे. तसेच ती आपल्या एकेका तेजस्वी दृष्टीने/नजरेने सर्वांना चहुदिशांनी पाहात आहे.
उषा म्हणजेच प्रारंभिक प्रकाशकिरणे, जी की, तेज किंवा प्रकाश निर्माण करण्यास तत्पर असतात. या समग्र सृष्टीत सूर्याचा प्रकाश, चंद्राचे चांदणे आणि इतर लोकलोकांतरातील ग्रह-नक्षत्रांची प्रकाशकिरणे या सर्व तेजस्वी बाबी! पण, या सर्व उषांना देखील प्रकाशित होण्यासाठी गरज असते, ती त्या महान तेजस्वी देवीची! तिच्याशिवाय हे सर्व कदापीही प्रकाशित होऊ शकणार नाहीत. म्हणून मही देवी ही सर्व उषांची ही परम उषा आहे.
जगातील चमकणारे सर्व पदार्थ प्रकाशित होणार्या महान देवीमुळेच चमकून दिसतात. अशी ही महादेवी सर्वांच्या प्रत्येक हालचालीला पाहते. तिच्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही. आम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केला, तरीही त्या सर्वांवर दृष्टी पडते, ती या मही देवीची. तिची दृष्टी दिव्य आहे. तसेच तिच्या नजरेत पवित्रता, शुद्धता व दिव्यशक्ती आहे. निर्विकार आणि बलसंचारक अशी तिची दृष्टी सहजच कोणावर पडली, तर तो निश्चितच धन्यवाद आणि सर्व दृष्टीने विकसित होणारच.
त्या देवीचे नेत्र सदैव उघडे आहेत. जगातील चांगला असो की वाईट, प्रत्येक प्राणी तिच्या दिव्यदृष्टीपासून दूर राहू शकणार नाही. ती महान देवी सर्वांच्या पुण्य व पापकर्मांना पाहतच असते. मानवाचे कर्तव्य आहे की अशा या महान तेजोमय दृष्टी असलेल्या जगदंबा महान देवीला साक्षीभूत मानून प्रत्येकाने शुभ कर्म करीत राहावे व आपले जीवन यशस्वी बनवावे.
आज आम्ही ठीकठिकाणी देवीच्या प्रतिमा व मूर्ती उभ्या करतो, पण वेदप्रतिपादित तिच्या विलक्षण शुद्ध स्वरूपाकडे दुर्लक्ष करीत आहोत. ती महान देवी आम्हां सर्वांना सतत पाहात असतांनाही आम्ही नानाविध वाईट कृत्यात सहभागी होतो.
मागचा पुढचा विचार न करता अनिष्ट कामे करण्यात तत्पर राहतो. पण, हे कदापि लक्षात घेत नाही की ती महान देवी आम्हा सर्वांच्या सभोवताली उभी आहे. जो या देवीच्या सत्यस्वरूपाला आपल्या अंतर्चक्षुंनी पाहतो, जाणतो व अनुभवतो, तो निश्चितच सर्व प्रकारच्या दुर्गुणांपासून व दुष्कृत्यापासून स्वतःला दूर ठेवतो.
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य