नवी दिल्ली: दहशतवादी कारवायांना अर्थसाहाय्य केल्याच्या आरोपाखाली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या मुस्लीम कट्टरतावादी संघटनेच्या देशभरातील विविध ठिकाणांवर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) छापेमारी केली. यामध्ये 106 मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून महाराष्ट्रातही 20 जणांना अटक करण्यात आली आहे.
दहशतवादी कारवायांना अर्थसाहाय्याच्या प्रकरणात ‘एनआयए’च्या नेतृत्वाखाली 11 राज्यांमध्ये ‘पीएफआय’च्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
छाप्यांमध्ये ‘पीएफआय’च्या 106 कथित कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘एनआयए’, ‘ईडी’ आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने टाकलेल्या छाप्यांमध्ये केरळमधून 22, कर्नाटकातून 20, महाराष्ट्रात 20, आंध्र प्रदेशातून पाच, आसाममधून नऊ, दिल्लीतून तीन, मध्य प्रदेशातून चार, पुद्दुचेरीतून तीन, राजस्थानमधून दोन, तामिळनाडूतून दहा आणि उत्तर प्रदेशातून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ’पीएफआय’चा अध्यक्ष ओमा सलाम, नसरुद्दीन एलमाराम, पी. कोया यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच विविध राज्यांच्या प्रमुखांनाही अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, दहशतवाद्यांना अर्थपुरवठा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि प्रतिबंधित संघटनांमध्ये सामील होण्यासाठी तरुणांची भरती केल्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. गुप्तचर खात्याने दिलेल्या इशार्यानुसार सध्या ’पीएफआय’ने पुण्यास आपले केंद्रस्थान बनविले आहे. पुण्यातून देशभरातील अनेक प्रशिक्षण कार्यक्रम संचालित केले जात आहेत. त्याचप्रमाणे जालना आणि संभाजीनगर येथे ‘एसडीपीआय’ची सदस्यत्व मोहीमदेखील ‘पीएफआय’ संचालित करत असल्याचे यंत्रणांनी सांगितले आहे.
दरम्यान, छापे घालताना अनेक मुस्लीम तरुणांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ‘एनआयए गो बॅक’च्या घोषणा देऊन अराजकता माजविण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ताब्यात घेतले.
छापेमारीत सापडली घातक शस्त्रास्त्रे
छापेमारीमध्ये कराटे प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. चाकू, लोखंडी रॉड, विळा वापरून जीवे मारण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. यामध्ये प्रामुख्याने मुस्लीम तरुणांना अन्य धर्मीयांविरोधात भडकविण्याचे काम चालत असल्याचेही छापेमारीमध्ये दिसून आले आहे.
‘पीएफआय’च्या राज्यप्रमुखांच्या मुसक्या आवळल्या
छाप्यांनंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी अनेक राज्यांतील ’पीएफआय’च्या प्रमुखांना अटक करण्यात आली आहे. ‘पीएफआय’चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष परवेझ अहमद यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय केरळ आणि मध्य प्रदेशातील ’पीएफआय’ प्रमुखांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश ’पीएफआय’चा प्रमुख अब्दुल करीम, मोहम्मद खालिद आणि जावेद नामक इसमास अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतला कारवाईचा आढावा
‘एनआयए’ने ’पीएफआय’विरोधात केलेल्या छापेमारीचा केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी दुपारी आढावा घेतला. केंद्रीय मंत्री शाह यांच्या निवासस्थानी त्याविषयीची उच्चस्तरीय बैठक पार पडली. बैठकीस राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल, ’एनआयए’ महासंचालक, केंद्रीय गृहसचिव आणि संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अशी पार पडली कारवाई
‘पीएफआय’विरोधातील कारवाई ही आतापर्यंतची सर्वांत मोठी छापेमारी म्हटले जात आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री 1 वाजल्यानंतर या कारवाईस प्रारंभ झाला. यामध्ये ‘एनआयए’चे 200 कर्मचारी सहभागी झाले होते. त्यात चार ‘आयजी’, एक ‘एडीजी’ आणि 16 ‘एसपी’ दर्जाचे अधिकारी सहभागी होते. यामध्ये राज्य पोलीस आणि ‘सीएपीएफ’ यांनाही सहभागी करण्यात आले होते. त्यांचे एक हजार कर्मचारी या मोहिमेचा भाग होते. कारवाईचे कमांड सेंटर गृहमंत्रालयात होते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे त्याकडे बारकाई लक्ष होते. ‘पीएफआय’चे सुमारे 200 हून अधिक सदस्य रडारवर होते. छापेमारीमध्ये ’एनआयए’ने 150 हून अधिक मोबाईल फोन, 50 हून अधिक लॅपटॉप आणि ’व्हिजन डॉक्युमेंट’, नावनोंदणी फॉर्म, बँक तपशील अशा कागदपत्रांचा समावेश आहे.