भारतात येणाऱ्या आफ्रिकन चित्त्यांची वैद्यकीय तपासणी पूर्ण!
16-Aug-2022
Total Views | 175
76
मुंबई: मध्यप्रदेशच्या पालपूर कुनो राष्ट्रीय उद्यानात येऊ घातलेल्या चित्त्यांची पहिली आरोग्य चाचणी करण्यात आली आहे. भारतात येणाऱ्या संभाव्य उमेदवारांची आरोग्य चाचणी करण्यात आली. 'चिता कन्झर्वेशन फंड'च्या तज्ज्ञांकडून ही तपासणी करण्यात आली. नामिबियातील विंडहोक येथे भारताचे उच्चायुक्त प्रशांत अग्रवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी दि. १५ ऑगस्ट रोजी ही चाचणी करण्यात आली.
भारतात 'आफ्रिकन चित्ता' आणण्यासाठी या वर्षी जून महिन्यात भारत आणि नामिबिया यांनी सामंजस्य करार केला. . केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि उपपंतप्रधान आणि नामिबियाचे परराष्ट्र मंत्री नेतुम्बो नंदी-नदैतवाह यांनी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी केली होती. या सामंजस्य करारात वन्यजीव संरक्षण आणि जैवविविधतेच्या शाश्वत वापरावर भर देण्यात आला आहे. आशियाई चित्ता भारतातून १९५२मध्ये नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तब्बल ७० वर्षांनी भारतात आफ्रिकन चित्ता आणण्याची योजना करण्यात आली आहे. १९४७मध्ये, भारतात आशयाई चित्ताच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले होते, परंतु छत्तीसगडच्या सुरगुजा राज्यातील महाराजा रामानुज प्रताप सिंग देव यांनी उरलेल्या तीन चित्त्यांना ठार मारल्याची नोंद आहे. सध्या आशियाई चित्ते फक्त इराणमध्येच अस्तित्वात आहेत. सावनाह प्रदेश परिसंस्थेत प्रमुख प्रजाती म्हणून चित्ता ही प्रजाती परत आणून व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसेच कालांतराने पर्यटनातून स्थानिक समुदायाची उपजीविका मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केला आहे.