पानिपतचा नवा भालेराव

Total Views |

Neeraj Chopra
 
 
अवघा १९ वर्षांचा नीरज ‘नायब सुभेदार’ म्हणून भारतीय लष्कराच्या ‘राजपुताना रायफल्स’ या पलटणीत दाखल झाला. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर त्याला पदोन्नती मिळून आता तो सुभेदार झाला आहे.
 
 
सुभेदार नीरज चोप्रा या २४ वर्षांच्या तरुणाने कमाल केली. २८९ फूट लांबीवर भाला फेकत त्याने २८७ फुटांचा स्वत:चाच ऑलिम्पिक विक्रम मोडला. ऑलिम्पिक स्पर्धा खरं म्हणजे २०२० साली व्हायला हव्या. पण, ‘कोविड’मुळे त्या २०२१च्या ऑगस्टमध्ये टोकियो शहरात पार पडल्या, हे आपल्याला माहीतच आहे. दि. ७ ऑगस्ट, २०२१ या दिवशी भारताच्या नीरज चोप्रा या अ‍ॅथलिटने भालाफेक किंवा जॅव्हेलिन थ्रो या क्रीडाप्रकारात ८७.५८ मीटर्स किंवा २८७ फूट चार इंच एवढ्या अंतरावर भालाफेक करीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. नुकत्याच ‘वर्ल्ड अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशीप’ स्पर्धा अमेरिकेतल्या ओरेगॉन राज्यात यूजिन या ठिकाणी पार पडल्या. तिथे दि. २३ जुलै रोजी ८८.१३ मीटर्स किंवा २८९ फूट एक इंच एवढ्या लांबीवर भालाफेक करून नीरजने स्वत:चाच ऑलिम्पिक विक्रम मोडला. इथेच हेदेखील नमूद करायला हवं की, नीरजला रजत पदक मिळालं.
 
 
ग्रेनडा देशाच्या पीटर अँडरसनने ९०.५४ मीटर्स मीटर्स किंवा २९७ फूट एवढ्या लांबीवर भाला फेकून नीरजला दुसर्‍या स्थानावर ढकललं आणि टोकियो ऑलिम्पिकमधील विक्रमी अंतरही मागे टाकलं. सर्वोच्च जागतिक विक्रम ९८.४८ मीटर्स किंवा ३२३ फूट एक इंच एवढा आहे. झेक प्रजासत्ताक या देशाचा खेळाडू जान झेलेझ्नी याने १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये ३२३ फूट एक इंचावर भाला फेकला होता. हा विक्रम अजूनही अबाधित आहे. नीरज चोप्राने इंटरनेट या माध्यमाचा सुयोग्य वापर करीत जान झेलेझ्नीच्या असंख्य व्हिडिओ क्लिप्स पाहिल्या, अभ्यासल्या आणि आपला खेळ अधिकाधिक उंचावत नेला.
 
 
नीरज चोप्रा हा हरिणाया राज्यातल्या पानिपत जिल्ह्यातल्या खांडरा गावचा रहिवासी. वडील साधे शेतकरी. कुटुंबाला खेळ, क्रीडा स्पर्धा वगैरेंची कसलीही परंपरा नाही. शिवाय लहानपणी तो चांगलाच गल्लेलठ्ठ होता. वडिलांनी त्याला जिममध्ये घातलं. पानिपत शहरातल्या शिवाजी स्टेडियमध्ये खेळाडू भालाफेक करताना पाहून त्याला अचानक भालाफेक या खेळात रस वाटू लागला. फक्त १३ वर्षांच्या या जाडगेल्या पोराने पहिल्यांदाच हातात भाला धरला, पेलला आणि भिरकावला. तो ४० मीटर्स किंवा १३१ फूट दोन इंच एवढ्या अंतरावर जाऊन पडला. तिथे उपस्थित असलेला स्थानिक वरिष्ठ भालाफेकपटू जयवीर चौधरी थक्कच झाला. आहे, पोरामध्ये पाणी आहे! याला नीट शिक्षण द्यायला हवं. मग प्रथम पानिपतमध्ये जयवीर चौधरी आणि मग जालंदर व चंडिगडमध्ये आणखी वरिष्ठ प्रशिक्षकांच्या नजरेखाली नीरज भराभर शिकत गेला.
 
 
२०१६ साली गुवाहाटीमध्ये झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये नीरजने भलतीच चमक दाखवली. ती पाहून खूश झालेल्या वरिष्ठ भारतीय सेनापतींनी त्याला भारतीय सैन्यात ‘ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर’ किंवा ‘जेसीओ’ म्हणून नोकरी दिली. अवघा १९ वर्षांचा नीरज ‘नायब सुभेदार’ म्हणून भारतीय लष्कराच्या ‘राजपुताना रायफल्स’ या पलटणीत दाखल झाला. गेल्या वर्षीच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर त्याला पदोन्नती मिळून आता तो सुभेदार झाला आहे. ही भरती अर्थातच ‘स्पार्ट्स कोटा’मधून आहे म्हणूनच नीरज अजून अर्ध कपाळ झाकणारी झुलपं बाळगून आहे; अन्यथा भरती झाल्यावर पहिल्यांदा चकाचक ‘सोल्जर कट’ मारला गेला असता. असो. ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन’ किंवा ‘आयएएफ’ या शिखर संस्थेच्या नियमांनुसार कोणत्याही प्रतिष्ठित स्पर्धेत वापरला जाणारा भाला हा लाकडी असतो आणि त्याचं टोक लोखंडी असतं. त्याचं वजन ८०० ग्रॅम हवं आणि लांबी २६० सेंमी किंवा १०२ इंच म्हणजे साडेआठ फूट हवी.
 
 
प्रिय वाचक, काही महिन्यांपूर्वी आपण ‘विश्वसंचार’ सदरातून आपल्या भारताच्या तामिळनाडू राज्यातली तलवारबाजी किंवा फेन्सिंग क्रीडापटू भवानीदेवी हिच्याबद्दल आणि एकंदरीतच तलावारबाजीबद्दल माहिती घेतली होती. तलवारबाजी ही आम्हा भारतीयांची परंपरागत युद्धकला. तलवार असा शब्द ऐकताच सर्वात आधी आम्हाला छत्रपती शिवराय आणि त्यांची भवानी तलवार आठवते. पण, इंग्रजांनी शस्त्रबंदीचा कायदा आणून आमच्या हातातली तलवारच काढून घेतली. तलवारबाजीच्या हिंदूंच्या आणि मुसलमानांच्यासुद्धा अनेक परंपरा (आधुनिक भाषेत स्कूलस) होत्या. त्या विस्मृतीत गेल्या आणि पाश्चिमात्य नियमांनुसार चालणारा ‘फेन्सिंग’ हा क्रीडा प्रकार फक्त राहिला. भाला या शस्त्राचीही अगदी तीच गत झाली आहे, वास्तविक भाला हे मराठी शिलेदारांचं तलवारी इतकंच आवडतं शस्त्र. शत्रूची आघाडीची फळी फोडण्यासाठी हातात भाले घेतलेले घोडेस्वार प्रथम हल्ला चढवीत. हे फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच होतं असं नव्हे, मध्ययुगीन युरोपातही हीच पद्धत होती. त्यांनी तर घोडदळाचे दोन भाग केले होते. पहिला ‘हेवी कॅव्हलरी.’ यात घोडा आणि स्वार दोघेही अंगावर पोलादी चिलखत आणि शिरस्त्राणं चढवून हातात लांब लांब भाले पेलत शत्रूवर तुटून पडत. त्या चिलखतांमुळे आणि लोखंडी भाल्यांमुळे त्यांची गती थोडीशी मंद असते म्हणून ‘हेवी कॅव्हलरी.’
 
 
दुसरा प्रकार ‘लाईट कॅव्हलरी.’ अतिशय चपळ असे घोडेस्वार हातातले बांबूचे हलके भाले पेलत अत्यंत गतीने शत्रूवर तुटून पडत त्यांच्या गतीमुळे त्यांना म्हणायचं ‘लाईट कॅव्हलरी.’ मराठ्यांना बांबूचे हलके भालेच फार आवडायचे. साधारण सहा ते नऊ फूट लांबीचे भाले पेलत मराठी शिलेदार शत्रूवर तुटून पडले की, घुसत, फाडत, कापत, आरपार निघून जात. नुसत्या भाल्याने असंख्य शत्रूंना ठार मारणार्‍या वीराला पदवी दिली जायची ‘भालेराव’. महाराष्ट्रात बांबू किंवा कळकाची बेेटं विपुल. किमान सहा ते नऊ फूट लांबीचा बांबू तोडायचा. पोकळ बांबूपेक्षा भरीव बांबू अगदी उत्तम. पालापाचोळा पेटवून तो बांबू चांगला भाजायचा. असा बांबू अगदी मऊ होतो. त्याचवेळी त्याच्यात कुठे वाकडेपणा असेल, तर तो सरळ करुन घ्यायचा. मग त्याच्या वरच्या बाजूला एक खोबण करून तिच्यात तेल भरायचं अणि तो मंद आगीवर उभा शेकत ठेवायचा. असा भाजून, तेल पाजून तो बांबू पक्का तयार झाला की, त्यात वरच्या बाजूला पोलादाचं तीक्ष्ण टोक किंवा फाळ बसवायचा. टोक बसवलं तर त्याला म्हणायचं ‘शूल’ आणि फाळ बसवला तर तो झाला ‘भाला.’ बरचा किंवा बरची, सांग, विटा हे भाल्याचे आणखी काही प्रकार.विटा म्हणजे भाल्याच्या बांबूच्या मध्यावर एक दोरी बांधायची. त्या दोरीची अर्धी गुंडाळी भाल्यावर आणि अर्धी गुंडाळी स्वाराच्या मनगटावर. म्हणजे दोरीच्या साहाय्याने भाला अधिक लांब फेकायचा आणि समोरच्याला जायबंदी करून तो पुन्हा आपल्याकडे ओढून घ्यायचा. छत्रपती थोरले शाहू महाराज जेव्हा कुठेही बाहेर जात असत, तेव्हा त्यांच्या अवतीभवती निष्णात विटेकरी चालत असत, असा उल्लेख आढळतो.
 
 
मराठ्यांप्रमाणे राजपूत, जाट, बुंदेले,शीख हे लोकही उत्तम भालाईत होते. इंग्रजांच्या ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने जेव्हा स्वतःचं सैन्य उभं करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी मुद्दाम भालाईत घोडेस्वारांचीही पथकं उभी केली. प्रथम ‘बेंगॉल आर्मी’ मग ‘मद्रास आर्मी’ आणि नंतर ‘बॉम्बे आर्मी’ या कंपनीच्या सैन्यातल्या भालाईत घोडेस्वार पथकांना म्हणायचे ‘लान्सर्स’. भाला म्हणजे जॅव्हेलिन, स्पिअर, किंवा लान्स. केेवळ भारतातच नव्हे, तर युरोपातल्या फे्ंरच, प्राशियन, स्पॅनिश अशा प्रदीर्घ लष्करी परंपरा असलेल्या सैन्यांमध्येही ‘लान्सर्स’ म्हणजे भालाईत घोडेस्वार असायचेच. पण, सतत प्रगत होणार्‍या तोफा आणि बंदुकांना तलवारी-भाले अशा सगळ्याच हत्यारांची हळूहळू हकालपट्टी केली. १७व्या शतकात युरोपीय सैनिकांनी एक नवचं तंत्र बसवलं. त्यांनी बंदुकीच्या पुढे भाल्यासारखं एक धारधार पात बसवलं. त्याला म्हणायचं ‘बायोनेट’ (खास भारतीय उच्चार - बागनेट) बंदुकीच्या गोळ्या संपल्या किंवा शत्रू फारच जवळ आला, तर सैनिक या बायोनेटच्या भाल्याप्रमाणे वापर करू शकत असे.
 
 
परंतु, १९१४ सालच्या पहिल्या महायद्धात रणांगणावर मशीनगन आली आणि धनुष्यबाण, ढाली-तलवारी, भाला-बरची, घोडा ही सगळी युद्धोपयोगी साधनं निरूपयोगी ठरली. त्यांची गरज उत्सव-समारंभात मिरवण्यापुरती राहिली. आजही अमेरिका सोडून जगभराच्या सर्व सेनादलांमध्ये ‘लान्सर्स’ पथक आहेत. फक्त ते घोडा आणि भाला यांच्याऐवजी रणगाडा आणि स्टेन गन वापरतात. भालाफेक हा आता फक्त क्रीडा प्रकार म्हणून उरला आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव. संस्कृत व समाजशास्त्र विषय घेऊन बी.ए.