‘अंधार’ दूर सारावा...

    30-Jul-2022   
Total Views |

Andhare
 
 
 
 
सुषमा अंधारे या वाचाळ, बहुबुद्धिहीनांत बडबड करणार्‍या महिलेने शिवसेना पक्षात नुकताच प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी तिचे स्वागत असे केले की, जणू ही बाई म्हणजे खूप मोठी सामाजिक कार्यकर्ता आणि विचारवंतच! पण, यानिमित्ताने का होईना, सामाजिक क्षेत्रात कार्य करताना सुषमा अंधारेने पाडलेला अवैचारिक आणि सामाजिक विद्वेषाचा अंधार समाजासमोर यायलाच हवा. तिच्या एकंदर अवैचारिक आणि अतार्किक व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला हा मागोवा...
 
 
आपल्या देशाला क्रांती-प्रतिक्रांतीचा मोठा इतिहास आहे. नव्हे, आपली संस्कृती या निरंतर क्रांती-प्रतिक्रांतीचा समन्वयच आहे. क्रांती-प्रतिक्रांती म्हणजे काय, यावर जगभरात असंख्य दाखले देता येतील. पण, चांद्यापासून बांद्यापर्यंत भरकटलेल्या शिवसैनिकांना नवी उमेद देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी आणि शिवसेनेला सगळ्यात जास्त गरज आहे म्हणून सेनेत दाखल झाले, असे म्हणणार्‍या सुषमा अंधारेच्या मते, प्रतिक्रांती म्हणजे काय माहिती आहे का? तर ती म्हणते, ”यांनी बाराखडी शिकवली. ‘क’ रे कपाचा, ‘ख’ रे अन् मग ‘ग’ कसला तर गणपतीचा. पुढे ‘भ’ कसला तर भटजीचा आणि मग सगळ्या बाराखडीनंतर ‘य’ कसला तर यज्ञाचा. बघा कसं ‘स्लो पॉयझन’ दिलं गेलं.
 
 
एकाच धर्माचा उदो उदो केला गेला. ‘ग’ गणपतीचा म्हणायला विरोध नाही, पण ‘प’ पैगंबरांचा का नाही शिकवत आणि ‘य’ येशूचा का नाही बाराखडीमध्ये शिकवत?” सुष्मीच्या मते, हो तिला मी नेहमीच सुष्मीच म्हणते, कारण अहो-जाहो करण्याइतकी तिची बौद्धिक कुवत किंवा कर्तृत्व अजिबात नाही. एक वेळ बौद्धिक कुवत आणि कर्तृत्व नसते आणि ती सर्वसामान्य व्यक्ती असती, तरी या कृतिशील वाचकांच्या कृतिशील दैनिकांमध्ये तिच्याबद्दल लिहिताना मी ‘अहो-जाहो’ संबोधले असते. पण, सुष्मी म्हणजे, समाजाला दुभंगण्यासाठी आसुसलेलीअत्यंत विखारी वृत्ती आहे. देव, देश आणि धर्म यावर सातत्यपूर्ण घाणेरडे आणि खोटे बोलणे हेच हिचे भांडवल. गोरगरिबांच्या वस्त्यांमध्ये ठरवून जाऊन तिथे सामाजिक विद्वेष पसरवायचा, दोन समाजांत दुही माजवण्यासाठी खोटेनाटे संदर्भहीन बोलायचे, बस्स! हेच तिचे भाषण आणि तिची वैचारिकता! त्यामुळे कितीही सभ्य आणि संस्कारांचा विचार केला, तरीसुद्धा सुष्मीला ‘अहो-जाहो’ करणे नाही. तर सुष्मीच्या मते, बाराखडीची भाषा बदलली की, प्रतिक्रांती होते.
 
 
सुष्मी स्वत:ला ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणते. आपण भटके-विमुक्त समाजाचे काम करतो, असेही ती सांगते. पण, ती कधी तरी रा. स्व. संघाच्या माध्यमातून चालणार्‍या पालावरच्या शाळेत गेली का? लातूरजवळच्या यमगरवाडीमध्ये आज शोषित-वंचित समाजाची मुलं शिकतात. मुलांची बोलीभाषा वेगळी असते. पारंपरिक शिकवलेले चटकन समजत नाही. त्यामुळे मुलांना त्यांच्या बोलीभाषेतून उदारहणं दिली जातात. हा प्रयोग जवळजवळ सगळीकडेच होतो. पण, सुष्मीला हे सगळे माहिती असण्याचे कारणच नाही. कारण, जग समरसतेच्या माध्यमातून शांतीचा मार्ग शोधत असताना सुष्मी मात्र मध्ययुगातच आहे.
 
 
भूतकाळातील मागचे खरकटे उकरत बसताना तिला जात-पात-गाडगं-मडकं आणि झाडू हाच भूतकाळ माहिती आहे. त्यापलीकडे तिला या देशाचा, या महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास माहिती नाही. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात बालकांना त्यांच्या भाषेतून शिकवण्याचा प्रयत्न केला जातो, हे तिच्या गावीही नाही. बरं! तिला ‘प’ पैंगबराचा पाहिजे आणि ‘य’ येशूचा पाहिजे. का तर हा फारच मोठा ‘सेक्युलॅरिझम.’ हा तिचाच शब्द. हो! तिला पैगंबरांचा ‘प’ आणि येशूचा ‘य’ पाहिजे. मात्र, ‘क्ष’ क्षत्रियाचा नको.
 
 
 
तसेही हिंदू समाजाबद्दल तिला प्रचंड आकस आहे. ‘मी हिंदू म्हणून जन्मले, पण हिंदू म्हणून मरणार नाही,’ असे हिचे म्हणणे. स्वत:ला काय परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजते का काय माहिती नाही? पण, ही सुष्मी कशीही जगली किंवा मेली तर कुणालाही काही फरक पडेल का? हिंदू लोक कसे इतरांवर अन्याय करतात, अत्याचार करतात आणि ते कसे वाईट आहेत, हे सांगताना या बाईच्या तोंडावर कचर्‍याची घंटागाडी विराजमान होते. (माता सरस्वती नव्हे, कारण, तिच्या मते सरस्वती वगैरे सगळे थोतांड आहे.) एक पेग घेतल्यावर एखादा दारूडा काय इंग्रजी बोलेल तितक्या आत्मविश्वासाने ती हिंदू धर्मात नसलेल्या गोष्टींबाबत बरळते. बहुसंख्य समाजाच्या श्रद्धेची निंदा करते. मी संविधानाला मानत असल्यामुळे तिचे मत हे तिचे आहे, याबद्दल माझे काही म्हणणे नाही.
 
 
मात्र, स्वत:च्या श्रद्धा त्या श्रद्धा आणि दुसर्‍यांचे काय? दुसरी काय माणसं नाहीत? छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांचे श्रद्धाशील नाते आहे. महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशभरातील लोक नवरात्रोत्सव भक्तिभावाने साजरा करतात. आयाबाया अगदी पुरूष मंडळीही श्रद्धेने पूजा करतात. असे नाही की, या सगळ्यांना काही दु:ख नसते किंवा काही प्रश्न नसतात. पण, आस्तिकतेमुळे त्यांच्या मनात बळ येते, आत्मविश्वास येतो. लढण्याची जिद्द येते. यावर या सुष्मीचे काय म्हणणे तर ”नऊ-नऊ दिवस या बायका पायात चपल घालीत नाही. त्यांना म्हणाले, घाला की चप्पल; तर त्या म्हणतात, “आई बसलीये.” त्यांना म्हणाले, बसा की पलंगावर; तर त्या म्हणतात, “आई बसलीये.” त्यांना म्हणाले, बसा की गादीवर; त्या म्हणतात, “आई बसलीये.” आता यांची आई बसती, मग यांचा बाप बसतो का नाई बसत! ”
 
 
 
हे सगळे म्हणत असताना सुष्मीच्या चेहर्‍यावरचे आविर्भाव म्हणजे अक्षरश: किळस वाटावे असे. वाचकांनी सांगावे की, नवरात्रोत्सवामध्ये कोणत्या घरी लोक जबरदस्तीने किंवा भीतीपोटी उपवास करतात? ती एक श्रद्धा असते. पण, ती श्रद्धा सुष्मीला कळणार नाही. हो, पण नऊ दिवस उपवास करणार्‍या आयाबायांना तुच्छ लेखणारी सुष्मी मुसलमानांच्या ‘रोजा’ करण्यावर आणि ख्रिश्चनांच्या ४० दिवसांच्या उपवासावर किंवा धर्मपालन करणारे भंतेजी एका वेळचेच का जेवतात? याबद्दल काही बोलत नाही. का? आजपर्यंत सुष्मीला याबद्दल कुणीही प्रश्न विचारला नाही. कारण, हिंदू सहिष्णू आहेत. बोलते एक बाई अज्ञानामुळे, काही बाही बोलू दे बिचारीला, असाच विचार करतात. पण, हे किती दिवस चालणार? ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो.’
 
  
श्रद्धा तर श्रद्धा, हिंदू दैवतांबद्दलही हेच! प्रभू श्रीरामचंद्रांबाबत आणि श्रीकृष्णांबाबतचे विचार काय? तर एका भाषणात ती म्हणते, ”रामजी ओ रामजी, वनवासात शबरीची उष्टी बोरे खाल्ली. पण, तिथे कुणी भेटली का न्हाय? ‘हमने तुमको देखा तुमने हमको देखा’ असं झालं का नाय? शितानं असा प्रश्न विचारायचा नसतू. बायांनी असा प्रश्न विचारायचा नसतू. तो क्रिष्ण बायांचे कपडे पळवायचा, चोरून बघायचा.” सुष्मीला वाटले, आपण असे राम-कृष्णाबाबत बोललो की, थोर पुरोगामित्वाचा शिक्का बसतो.
 
 
आपण असे सीता-द्रौपदीबद्दल बोलले की झालो आपण स्त्रियांच्या कैवारी! खरेतर सीता काय, द्रौपदी काय किंवा तथागत गौतम बुद्धांनी महल सोडल्यावर त्यांची पत्नी यशोधरा काय, या सार्‍याजणींच्या दु:खाची आणि त्यांना सहन कराव्या लागणार्‍या प्रश्नांची दाहकता एकच आहे. पण, यशोधरेच्या दु:खाबद्दल सुष्मीने अवाक्षरही कधी काढलेले नाही. का? स्त्रियांच्या दु:खाबद्दलही गटतट का? मी हे लिहू शकते. कारण, स्त्री म्हणून मी या सगळ्याजणींच्या भावभावनांशी समरस आहे. मानवी मूल्यांवर या सगळ्याजणींचे जगणे आजही वस्तीपातळीवर जगणार्‍या महिलांमध्ये मी पाहिलेले आहे.
 
 
 
असो. तर महिलांबद्दल सुष्मी असेच असंवेदनशील बडबडते. मराठा आरक्षणाबद्दल बोलताना ती शालिनीताई पाटील यांच्याबद्दल बोलली. ती म्हणाली, ”शालिनीताई पाटील बोलली की, आमच्यात म्हणजे मागासवर्गीयांमध्ये गुण नसतात आणि ते इमानी नसतात.” आता मराठा आरक्षण आणि शालिनीताईंना विरोध किंवा समाज इमानी आहे, हे सांगताना सुष्मी काय म्हणाली, तर ”जेव्हा गाडी, घोडे, कार नव्हती तेव्हा आमची लोकं तुमच्या घरात २४ तास राबायची. तुमच्या (म्हणजे मराठ्यांच्या) लेकीसुनांना आणण्यासाठी पालखी करायचे. तेव्हा या पालखीचा मुक्काम चार-चार ठिकाणी असायचा.
 
 
आमची लोक इमानी नसतील तर मग... जाऊ दे मी बोलत नाही. तुम्ही ठरवा काय ते.” अर्थात, कुणाच्या वक्तव्याला किती गांभीर्याने घ्यावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मात्र, एका समाजाच्या लेकीसुनांबद्दल आणि एका समाजाच्या सभ्य पुरुषांबद्दल असे प्रश्न उपस्थित करून या दोन्ही समाजाचा अपमान करताना सुष्मीला काही वाटले नाही. हे सगळे बोलताना सुष्मीचा आविर्भाव तर विचारूच नका. तिच्या बोलण्यावर समोर बसलेले काही पुरूष आसुरी आनंदाने खदाखदा हसत होते. विकृतच ते!
 
  
...तरीही काही लोकांना हिचे भाषण आवडते आणि हिच्यात नेतृत्वगुण दिसतात. सुष्मीचे भाषण कसे? तर स्वर्गीय दादा कोंडके यांचा खर्जातला विनोदी आवाज, त्याला स्वर्गीय निळू फुलेंचा बेरकीपणा आणि आवाजासोबत ‘मोगँम्बो खुश हुआ’ असे गट गट हलणारे डोळे यासोबतच दोन्ही हात बोलताना कायम वर-खाली अश्लीलपणे हलवले की झाले सुष्मीचे भाषण! अभ्यासाचे विषय काय तर पंढरपूरचा विठ्ठल बुद्ध आहे का? द्रौपदी मुर्मू आणि नंदीबैल. प्रचंड क्रांतिकारक विधान काय तर उधोजी (म्हणजे सध्याचे सुष्मीचे मोठे साहेब) ”उधोजी उधोजी तलवार दाखवून काही होत नसतंऽऽऽऽऽऽ ( हा ‘तं’ प्रचंड लांबवलेला) तर तिथे सीमेवर ठाकरे, कुलकर्णी, जोशी नसतात, तिथे आम्ही असतो.”
 
 
म्हणजे देशाचे रक्षण करताना फक्त एकाच समाजाचे लोक असतात, असे हिचे म्हणणे. देशाच्या सैनिकांच्याही जातीपाती शोधणारी सुष्मी. खरं बोलली का? देशाच्या रक्षणासाठी सगळे भारतीय जातपात विसरून एकत्र येतात. हे तिला दिसत नाही. दिसले तरी समजून घेण्याची कुवत नाही. अशी ही स्वकेंद्री सुष्मी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत लगोलग उपनेता झाली. यावरही अनेक चर्चा झाल्या. पण, जरा मागोवा घेतला तर जाणवते की, सुष्मी अमोल मिटकरीला भाऊ मानते.
 
 
 
‘गणराज्य संघ’ ही सुष्मीची संघटना. तिने मागच्या निवडणुकीत शरद पवारांसाठी काम केले. निवडणुकीत काम केले म्हणजे काहीतरी नक्कीच पदरात पडेल, असे तिला वाटले. पण, तिला काहीच मिळाले नाही आणि अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या साक्षीने आमदारकी मिळवली. आता अमोल मिटकरी आणि सुष्मी या दोघांची कारकिर्द आणि कर्तृत्व अगदी जुळ्या भावंडांसारखे. त्यामुळे मिटकरीला आमदारकी दिल्यावर काही मिळणार नाही, हे चाणाक्ष सुष्मीला लक्षात आले. त्यानंतर सुष्मीला बौद्ध धम्माची दीक्षा देणारे आणि ती ज्यांना गुरू मानते, ते उपराकार लक्ष्मण माने हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले.
 
 
गुरूच पक्षात आले म्हटल्यावर आपल्याला यापुढेही काही मिळणार नाही, हे तिला कळले. त्यामुळेच शिवसेनेला मदत करायची आहे, शिवसेनेला आपली गरज आहे, असे म्हणत तिने शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हे सांगताना अल्लाताल्लाचा दाखला देत महाराष्ट्रातील मुस्लिमांचा संदेशही तिने उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवला की, म्हणे महाराष्ट्रातील तमाम मुस्लीम आता त्यांच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे ‘शिवशक्ती’ आणि ‘भीमशक्ती’ म्हणतानाच ‘मिमशक्ती’चे सर्वेसर्वा झाले, हे सुष्मीने येताक्षणीच जाहीर केले. अवघड आहे. असो. आपल्याला काय? सुष्मीसारख्या विचारांची दिवाळखोरी झालेल्या आणि समाजात तेढ माजवण्याचा छंद असलेल्या लोकांना राजकारणी डोक्यावर घेवोत. मात्र, समाज तर हुशार आहे. ‘अंधारा’ला दूर सारून ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ म्हणत ‘अत्त दीपो भव’ व्हायचे, हे समाजाला माहिती आहे. कळले का सुष्मे???
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.