सहजीवनाचे अमर गाणे!

    30-Jun-2022
Total Views |
 lagna2
 
 
 
 
अमोऽहमस्मि सा त्वं सा त्वमस्यमोऽहम्।
सामाहमस्मि ऋक्त्वं द्यौरहं पृथिवी त्वम्।
तावेव विवहावहै सह रेतो दधावहै।
प्रजां प्रजनयावहै पुत्रान् विन्दावहै बहुन्।
ते सन्तु जरदष्टय:सं
प्रियौ रोचिष्णु सुमनस्यमानौ।
पश्येम शरदः शतं
जीवेम शरदः शतं श्रृणुयाम शरदः शतम्॥
(पारस्कर गृह्यसूत्र-1.6.3)
 
अन्वयार्थ 
हे वधू! (अहम्) ज्याप्रमाणे मी (अम:) ज्ञानसंपन्न असलेला, ज्ञानयुक्त होऊन तुला स्वीकारणारा (अस्मि) आहे, तशीच (सा) ती (त्वम्) तूदेखील ज्ञानयुक्त होऊनच मला स्वीकारणारी (असि) आहेस. जसे (अहम्) मी पूर्ण प्रेमाने तुला (अम:) ग्रहण करतो, (सा) तसेच ती माझ्याद्वारे ग्रहण केली गेलेली (त्वम् ) तू मला सुद्धा ग्रहण करणारी आहेस. मी (साम) सामवेदासमान प्रशंसनीय (अस्मि) आहे, हे वधू! (ऋक्) ऋग्वेदाप्रमाणे प्रशंसनीय आहे. (त्वम्) तू (पृथिवी) पृथ्वीसमान गर्भादी गृहस्थाश्रमाच्या व्यवहारांना धारण करणारी आहेस आणि मी (द्यौ:) जलवर्षाव करणार्‍या सूर्यासमान आहे. असे आपण (तौ एव) दोघे ही प्रसन्नतेने (विवहावहै) विवाह करीत आहोत. (सह) सोबत मिळूनच (रेत:) वीर्यशक्तीला (दधावहै) धारण करू या, गर्भाधान करूया! (प्रजां प्रजनयावहै) उत्तम प्रजेला, संततीला जन्माला घालू या ! (बहुन् पुत्रान्) चांगल्या प्रकारच्या पुत्रांना (विन्दावहै) मिळवू या! (ते) ती सर्व मुले (जरदष्टय:) जरावस्थेपर्यंत जीवनयुक्त (सन्तु) राहोत. (सम्प्रियौ) तसेच एक दुसर्‍यांशी प्रसन्नतापूर्वक व (रोचिष्णू ) आपसांमध्ये रुचिपूर्ण, आवड निर्माण करीत (सुमनस्यमानौ) चांगल्या प्रकारे विचार करीत (शतम्) 100 (शरद:) शरद ऋतू म्हणजेच शत वर्षांपर्यंत एक दुसर्‍यांशी प्रेमदृष्टीने (पश्येम) पाहत राहोत. (शतम्) 100 (शरद:) शरद ऋतू अर्थात 100 वर्षांपर्यंत आनंदाने (जीवेम) जगत राहोत, (शतम् ) 100 (शरद:) शरद ऋतू 100 वर्षांपर्यंत प्रिय वचने (श्रृणुयाम) ऐकत राहू.
 
विवेचन
दाम्पत्य जीवन म्हणजे पती व पत्नीचे एक दुसर्‍यांशी आनंदाचे कायम समर्पण. जगणे आणि मरणे हेसुद्धा केवळ परस्परांकरिताच. पाणिग्रहण करणारे नवदाम्पत्य आता दोन हातांचे चार हात झालेत. वराने वधूचा हात धरत तिला उभे केले. वधूनेदेखील सहर्षपणे ते मान्य केले व उभी राहत तिनेही वराला प्रतिसाद दिला. हे दोघेही हाती हात पकडत अग्निकुंडाला एक प्रदक्षिणा घालतात. तसेच पुन्हा पूर्वस्थानी येऊन सर्वांना अभिवादन करीत पारस्परिक परिचय देऊ लागतात. ही परिचय देण्याची जबाबदारी मात्र वरावर आहे. वर हा वधूला उद्देशून आपला परिचय देऊ लागतो व काही भावपूर्ण असे काव्यात्मक विचार व्यक्त करू लागतो.
वेद ही परमेश्वराचे आद्यकाव्य आहे. त्यात कुठेही कमतरता नाही की एखादी त्रुटी. सदरील काव्यरुप मंत्रात उपमा अलंकाराने वर हा पती-पत्नीविषयक नाते विशद करीत आहे. यात प्रामुख्याने तीन गोष्टी आढळतात. यातील पहिली गोष्ट म्हणजे, एक दुसर्‍याची जाणीपूर्वक पसंती. दुसरी गोष्ट म्हणजे दोघांचे एक दुसर्‍यांशी नाते, तर तिसरी म्हणजे विवाहाचा उद्देश.
 
 
 
विवाहात पती-पत्नीची सहमती फार महत्त्वाची असते. वर-वधू हे दोघेही एक दुसर्‍यांच्या संमतीनेच सर्वांना साक्षी मानून विवाहित होत आहेत. म्हणूनच वर म्हणतो, “आपण दोघेही एक दुसर्‍या स्वीकारत आहोत, ते पूर्णपणे विचारपूर्वक, संमतीपूर्वक व जाणीवपूर्वक आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता, कोणीही आपल्यावर जबरदस्ती केली नाही.” याकरिताच वर म्हणतो-
अम अहम् अस्मि (तथैव) सा त्वम् असि! ’अम:’
शब्दाचा अर्थ गती, आश्रय, प्रेम किंवा बळ होय. ’गम्’ या धातूपासूनच ’गति’ शब्द तयार होतो. गतीचे साधारण ‘ज्ञानं गमनं प्राप्ति:’ हे अर्थ होतात. तेव्हा ‘अम:’ या शब्दाचा विशाल अर्थ इथे जोडला जाऊ शकतो. वधूला वर म्हणतो, “मी गतिवान, ज्ञानयुक्त, आश्रयस्थान आहे, तशीच तूदेखील माझ्याकरिता गतिशील, ज्ञानवती व प्रेमयुक्त आहेस. आपणा दोघांमध्ये उत्तम प्रकारचे ज्ञान आहे.
 
 
एक दुसर्‍यांना आपण प्रेमाने व आनंदानेच समजून घेत आहोत.” पुढे वर पुन्हा म्हणतो, ‘अहम् अम:, सा त्वम् असि।’ इथे ‘अम:’चा अर्थ प्रेम असा होतो. म्हणूनच वर म्हणतो, “मी पूर्ण प्रेमाने तुला स्वीकारतो आहे, तशीच तूदेखील मला प्रेमानेच स्वीकारत आहेस. एक दुसर्‍यांच्या प्रत्यक्ष परिचयासोबतच समोर उपस्थित मंडळींनादेखील हे दाखवून द्यावयाचे आहे की आम्ही आपणा सर्वांच्या साक्षीने एक दुसर्‍यांना आनंदाने स्वीकारत आहोत.”
पारंपरिक सहमतीनंतर पती-पत्नीचे नाते हे अतिशय अजोड व अभेद्य स्वरूपाचे हवे. नेमके हेच विशद करताना वेदमंत्रात पुढील दोन वाक्यातून जो भाव व्यक्त झाला आहे, तो उपमा अलंकाराने. वर म्हणतो-
’अहं साम अस्मि, त्वं ऋक्!’
हे देवी, मी सामवेदासारखा प्रशंसनीय आहे, तर तू ऋग्वेदासारखी स्तुत्य व अतिशय कौतुकास पात्र आहेस. इथे वराने स्वत:ला सामवेदाची, तर वधूला ऋग्वेदाची उपमा दिली आहे. सामवेद हा उपासनाविषयक तिसरा वेद! सामन् म्हणजे गायन. ऋग्वेदीय मंत्र जेव्हा विशेष गायन पद्धतीने गायिले जातात, तेव्हा त्यास ‘साम’ असे म्हणतात. भारतीय संगीतविद्येचा उगम याच वेदापासून होतो. ऋचांचा समूह म्हणजेच ऋग्वेद! सर्व प्रकारचे ज्ञान-विज्ञान याच प्राचीन आद्य वेदात दडले आहे. म्हणूनच ऋग्वेदाची चहुकडे स्तुती होते. पत्नीचा ज्ञानयुक्त व्यवहार असला की पती हा आनंदाने जीवनाचे गाणे गाऊ लागतो.
 
दुसरी उपमा आली आहे. ती म्हणजे,
द्यौ अहम् अस्मि, पृथिवी त्वम् (असि)।
द्यौ म्हणजेच द्युलोक किंवा चमकणारे अंतराळातील विश्व. यात सर्वश्रेष्ठ आहे, तो सूर्य. म्हणजेच इथे ’द्यौ’ शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो. वर म्हणतो, “मी सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि नेहमी जलवर्षाव करणारा आहे.” तर हे वधू ! तू पृथ्वीप्रमाणे सृजन करणारी आहेस. सूर्याच्या माध्यमाने जेव्हा पृथ्वीवर पावसाची वृष्टी होते, तेव्हा पृथ्वी ही फलिभूत होते. विविध प्रकारचे धान्य उत्पन्न करू लागते. सर्व सृष्टी हिरवीगार होऊ लागते. पृथ्वीच्याच माध्यमाने समग्र जीवसृष्टी उदयास येऊ लागते. म्हणूनच स्त्री ही पृथ्वीस्वरूपा आहे.
 
पुढे त्यासाठीच विवाह हा मूलभूत उद्देश कथन केला आहे. वर-वधू म्हणत आहेत, ”आम्ही दोघे विवाहबद्ध होत आहोत आणि वीर्यशक्तीला धारण करीत आहोत.” म्हणजेच एक प्रकारचे गर्भाधान होय. आम्हा दोघांच्या रज-वीर्याच्या माध्यमाने दिव्य संतती जन्माला येवोत, हाच उद्देश! सूर्य व पृथ्वीप्रमाणे आम्ही एकत्र येऊन सार्‍या विश्वाचे सृजन करीत आहोत. समाज व राष्ट्राकरिता चांगली प्रजा जन्माला घालीत आहोत. आमच्या माध्यमाने राम-कृष्णसदृश आदर्श संतती या राष्ट्राला लाभो, हाच आमच्या विवाहाचा उद्देश आहे. हे पुत्र किंवा पुत्री म्हणजेच खर्‍या अर्थाने त्या-त्या राष्ट्राची अमूल्य संपदा. आम्हा दोघांना मिळून आदर्श, गुणवान, चरित्रवान, विद्यावान अशी प्रजा (संतती) निर्माण करावयाची आहे.
 
 
संस्कारहीन व गुणहीन संतती काय कामाची? ती तर या भूमीला भारच ठरते. अशांमुळे आम्हा दोघांचे गार्हस्थ्यदेखील निरर्थक मानले जाते. आम्हा दोघांच्या माध्यमाने नीतिमान व राष्ट्रहितकारी संतती लाभणार आहे, आमची ही संतती आम्हाकरिता उत्तम प्रकारचे जीवन धारण करणारी ठरो. तसेच एक दुसर्‍याशी प्रसन्नतेने, आनंदाने व्यवहार करीत, उत्तम प्रकारचा विचार करीत 100 वर्षांपर्यंत चांगले तेच पाहणे, उत्तम तेच ऐकणे, उदात्त तेच जगणे आणि आदर्श तेच वागणे, हे या संततीतून निदर्शनास यावयास हवे. नवदाम्पत्याच्या गृहस्थाश्रमाचे हे जीवनगाणे सफल ठरो, हीच कामना!
 
9420330178