राहुल गांधींची ‘भारत तोडो’ यात्रा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-May-2022   
Total Views |
 
 
rahul
 
 
 
पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन नरेंद्र मोदी यांना कालच आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांत त्यांचा प्रवास ‘लोकनेता ते विश्वनेता’ असा झाला आहे. त्याउलट राहुल गांधी हे २०१४ पासून पक्षास उल्लेखनीय म्हणावे, असे यश मिळवून देऊ शकलेले नाहीत. राहुल गांधी हे येत्या दि. २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा काढणार आहेत. मात्र, राहुल गांधी यांचे सध्याचे धोरण पाहता ती ‘भारत तोडो’ यात्रा ठरू नये, यातच देशाचे हित आहे.
 
 
 
सिद्धार्थ वर्मा : राज्यघटनेच्या ‘कलम १ ’ चासंदर्भ देत तुम्ही म्हणालात की, भारत हा राज्यांचा संघ आहे, पण जर तुम्ही संविधानाच्या पुढील पानावर नजर टाकली आणि प्रस्तावना बघितली, तर त्यामध्ये भारत हे एक ‘राष्ट्र’ असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. भारत ही जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. ‘राष्ट्र’ हा शब्द वेदांमध्येही आहे. चाणक्याने तक्षशिला येथे विद्यार्थ्यांना शिकवितानाही स्पष्ट केले होते की, ते वेगवेगळ्या जनपदांचे रहिवासी असू शकतात. परंतु, शेवटी ते एका ‘राष्ट्रा’चे आहेत; ते ‘राष्ट्र’ म्हणजे भारत.
 
 
राहुल गांधी : चाणक्याने आपल्या विद्यार्थ्यांना भारताची कल्पना सांगताना ’राष्ट्र’ हा शब्द वापरला होता का?
 
 
सिद्धार्थ वर्मा : होय, चाणक्याने ‘राष्ट्र’ हा शब्द वापरला आहे. भारताच्या वैशिष्ट्याचे वर्णन करण्यासाठी हा संस्कृत शब्द आहे.
 
 
राहुल गांधी : ‘राष्ट्र’ म्हणजे ’किंग्डम’ म्हणजेच साम्राज्य. ‘राष्ट्र’ ही पाश्चिमात्य संकल्पना आहे.
 
 
सिद्धार्थ वर्मा : जेव्हा मी ‘राष्ट्रा’बद्दल बोलतो, तेव्हा मी केवळ राजकीय संस्थेबद्दल बोलत नाही. हे प्रयोग जगभर झाले आहेत. सोव्हिएत युनियन असेल, युगोस्लाव्हिया असेल किंवा संयुक्त अरब अमिराती असेल. मात्र, जोपर्यंत राष्ट्राला सामाजिक-सांस्कृतिक, भावनिक जोड संस्कृती नसेल, तोपर्यंत ‘राष्ट्र’ निर्माण होऊ शकत नाही. संविधान ‘राष्ट्र’ घडवू शकत नाही. मात्र, ‘राष्ट्र’ संविधान बनवू शकते. एक राजकारणी म्हणून तुमची भारताविषयीची कल्पना केवळ सदोष आणि चुकीची नाही, तर विनाशकारीदेखील आहे. कारण, या कल्पनेद्वारे हजारो वर्षांचा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे आपणास वाटत नाही का?
 
 
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि भारतीय रेल्वे वाहतूक सेवेतील (इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिस-आयआरटीएस) सनदी अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांच्यामध्ये केंब्रिज विद्यापीठात नुकताच वरील संवाद घडला. निमित्त होते ते राहुल गांधी यांचा ब्रिटन दौरा आणि तेथे त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये व्यक्त केलेले आपले मत. वरील संवाद वाचल्यानंतर सनदी अधिकारी सिद्धार्थ वर्मा यांची ठाम मते आणि त्यास राहुल गांधी यांनी दिलेले गोंधळलेले प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाची सध्याची स्थिती विशद करण्यासाठी पुरेसे आहे. मात्र, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून परदेशात जाऊन सातत्याने भारतविरोधी विधाने का केली जातात, त्याचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे.
 
 
वसाहतवादी दृष्टीने भारताकडे पाहणार्‍या पाश्चात्त्य तज्ज्ञांच्या मते, भारत हा दि. १५ ऑगस्ट, १९४७ साली अस्तित्वात आलेला देश आहे. या देशास ‘राष्ट्र’ म्हणावे, असे काहीही नाही. कारण, येथे भिन्न भाषा, भिन्न जीवनपद्धती आहे. त्यामुळे भारत म्हणजे १९४७ साली तडजोडी करून आकारास आलेला देश असल्याचा त्यांचा समज असतो. त्यामुळे आजही भारताविषयी मते व्यक्त करताना फुटीरतावादास समोर ठेवूनच ही लोक मते व्यक्त करतात. त्याउलट, अगदी प्राचीन काळापासून भारत हे एक ‘राष्ट्र’ असल्याचे भारतीय राज्यशास्त्रज्ञांनी नमूद करून ठेवले आहे. ग्रीक आक्रमणाचा सामना करण्यासाठी चाणक्याने ‘राष्ट्र’ ही संकल्पना समोर ठेवूनच काम केले होते. मात्र, भारत हे ‘राष्ट्र’ नसल्याच्या मताचा पगडा काही देशी विद्वानांवरही आहेच. त्यामुळे त्यांना दर सहा ते आठ महिन्यांनी ‘दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत’ अशी मांडणी करण्याची हुक्की येत असते. ही मांडणी करताना देशात फुटीरतावादाची बीजे रोवली जात आहे, याची काळजी ही मंडळी करत नाहीत.
 
 
सध्या ही मांडणी पुढे नेण्याचे काम काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी करत असल्याचे दिसत आहे. सर्वप्रथम त्यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरील चर्चेत बोलताना भारत हे ‘राष्ट्र’ नसल्याचे सांगितले होते. याच भाषणामध्ये त्यांनी देशात ‘उत्तर विरुद्ध दक्षिण’ असा वाद कसा सुरू होईल, याचीही काळजी घेतली होती. त्यांच्या याच भाषणानंतर काँग्रेसच्या पुढील म्हणजे २०२४ पर्यंतच्या रणनीतीची चुणूक दिसून आली होती. कारण, या भाषणानंतर राहुल गांधी हे फुटीरतावादास खतपाणी घालत असल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आला होता.
 
 
राहुल गांधी यांचे आतापर्यंत अनेक ‘मेकओव्हर’ काँग्रेस पक्षाने केले आहेत. कधी त्यांची केशरचना बदलण्यात येते, कधी त्यांचा पोषाख बदलण्यात येतो, त्यांच्यात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची छबी कशी दिसेल, याची काळजी घेतली जाते. आताही ब्रिटन दौर्‍यामध्ये राहुल गांधी बंद गळ्याचा कोट घालून कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. राहुल गांधी हे आता वरिष्ठ नेते झाले आहेत, असे दाखविण्याचा प्रयत्न याद्वारे काँग्रेसने करून बघितला. मात्र, ‘आडातच नसेल, तर पोहर्‍यात कुठून येणार’ ही म्हण राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यांमधून त्यांनी सार्थ करून दाखविली.
 
 
‘आयडियाज फॉर इंडिया’ नावाच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भाजपवर टीका करण्याच्या नादात पुन्हा एकदा भारतविरोधी भूमिका मांडल्याचा आरोप भाजपने केला आहे. टीका करण्याच्या नादात राहुल गांधी एवढे वाहवत गेले की, त्यांनी भारताची तुलना पाकिस्तानसोबत केली. रशियाने युक्रेनमध्ये जशी स्थिती निर्माण केली आहे, तशीच स्थिती चीनने लडाखमध्ये निर्माण केल्याचा अतिशय बेजबाबदार दावाही राहुल गांधी यांनी केला, असे दावे करण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कसे अपयशी ठरत आहेत, हे दाखविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र, असे वक्तव्य करताना सध्या जागतिक स्तरावर भारताचे, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे आणि भारताच्या मुत्सद्देगिरीचे स्थान नेमके काय आहे, याचा त्यांना विसर पडला आणि त्यामुळे राहुल गांधी यांचे वक्तव्य अधिकच केविलवाणे वाटू लागले. कारण, कोरोनानंतरच्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत एक मजबूत राष्ट्र म्हणून पुढे आले आहे.
 
 
रशिया-युक्रेन संघर्षांमध्ये केवळ भारताचेच परराष्ट्र धोरण प्रभावी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या काळात भारताच्या मुत्सद्देगिरीचे प्रभावीपण संपूर्ण जगाने मान्य केले आहे. ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या राहुल गांधी यांच्या पणजोबांच्या स्वप्नाळू वृत्तीतून बाहेर येऊन लडाखमध्ये चीनच्या अरेरावीस ठेचून काढण्याचे काम भारताने केले आहे. कधी नव्हे, तर परदेशातील भारतीय समुदायाचा (इंडियन डायस्पोरा) प्रभाव निर्माण करण्यास यश आले आहे. बोलण्याच्या नादात ते एवढे वाहवत गेले की, भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकार्‍यांविषयी त्यांनी ते मग्रुर आणि अहंकारी झाल्याची अतिशय बेजबाबदार टीका केली. मात्र, परराष्ट्र सेवेतील अधिकार्‍यांना मग्रुरी नसून ते आत्मविश्वासाने काम करत असल्याचा सणसणीत टोला परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी त्यांना लगाविला.
 
राहुल गांधी यांची भारताविषयीची अशी नकारात्मक मते त्यांच्या पक्षाचे नेमके धोरण अधोरेखित करतात. एकीकडे जागतिक स्तरावर भारत केंद्रस्थानी येत असताना राहुल गांधी भारताविषयी नकारात्मक मते व्यक्त करून कोणाचा अजेंडा रेटत आहेत, असा प्रश्न पडतो. कारण, जागतिक स्तरावर भारताचे वर्चस्व वाढू नये, यासाठी एक ‘लॉबी’ काम करते. भारताविषयी सातत्याने नकारात्मक प्रचार करणे, हे त्यांचे काम असते. राहुल गांधीही अगदी त्याच भाषेत भारताविषयी बोलताना दिसतात. राहुल गांधी यांना ‘गंभीर राजकारणी’ म्हणून दाखविण्याचा प्रयत्न काँग्रेस दीर्घकाळपासून करत आहेत. मात्र, त्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. कारण, देशाविषयी नकारात्मकता भारतीय जनता कधीही स्वीकारत नाही.
 
राहुल गांधी हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय असल्याचे सांगितले जाते. मात्र, ते तसे आहे का; याचे उत्तर नकारात्मकच असल्याचे दिसते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेऊन नरेंद्र मोदी यांना कालच आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आठ वर्षांत त्यांचा प्रवास ‘लोकनेता ते विश्वनेता’ असा झाला आहे. त्याउलट राहुल गांधी हे २०१४ पासून पक्षास उल्लेखनीय म्हणावे, असे यश मिळवून देऊ शकलेले नाहीत. पक्षाला धोरण देण्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचे दिसून आलेले नाही. मागच्या आठवड्यात झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्येही पक्षापेक्षाही गांधी कुटुंबाविषयीच चिंतन करण्यात आले. आता राहुल गांधी हे येत्या 2 ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो’ यात्रा काढणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले आहे. मात्र, राहुल गांधी यांचे सध्याचे धोरण पाहता ती ‘भारत तोडो’ यात्रा ठरू नये.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@