नेव्हरोनच्या गरजत्या तोफा आणि गरूडाची अस्मान भरारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 
 
mac

 
 
१९५७ साली मॅक्लिनची दुसरी कादंबरी आली-‘गन्स ऑफ नेव्हरोन.’ नेव्हरोन नावाच्या ग्रीक बेटावर जर्मनांनी दोन महाभयंकर तोफा तैनात केलेल्या असतात. काही धाडसी कमांडो जीवाची बाजी लावून त्या तोफा उडवून देतात. ही थरार कादंबरी वाचून लोक इतके वेडे झाले की, पहिल्या सहा महिन्यांत तिच्या चार लाख प्रती संपल्या.
 
आम्ही गुरूदत्तचा ‘प्यासा’ चित्रपट नक्कीच पाहिला असेल. नायक गुरूदत्त एक कवी असतो. अर्थातच बेकार आणि दरिद्री. आता अशा दरिद्री इसमाशी सुंदर नायिका माला सिन्हा कशी लग्न करेल? ती श्रीमंत खलनायक रेहमानशी लग्न लावून सुखी होते. आता हा खलनायक रेहमान व्यवसाय काय करतो? तर तो प्रकाशक असतो. कवी गुरूदत्तचा तो सतत पाणउतारा करतो. गुरूदत्त अपघातात मेला, आता त्याला मानधन द्यायला नको, असं समजून तो गुरूदत्तच्या कवितांचा संग्रह छापतो. तो भलताच लोकप्रिय होतो नि रेहमानच्या घरात पैशांच्या थप्प्या लागतात. आता यात माला सिन्हाचं काम काय? तर सुंदर दिसायचं आणि गुरूदत्तचा अपमान करीत रेहमानला साथ द्यायची. बाकी कविता, साहित्य वगैरेत तिला काही धोंडेदेखील गम्य नाही. नायक, कवी आणि खलनायक प्रकाशक दाखवून, कथाकार स्वत: गुरूदत्त आणि पटकथाकार अब्रार अल्वी या दोघांनी प्रकाशक लोकांची जाम फिरकी घेऊन टाकलीय. माझे ज्येष्ठ गुरूतुल्य स्नेही कै. विश्वास पाटील (‘नवी क्षितिजे’कार) नेहमी म्हणायचे, “प्रकाशकांच्या स्वत:च्या बिल्डिंगा, प्रेस, गाड्या असतात आणि लेखक चाळीत, भाड्याच्या घरात राहतात. ही मराठी साहित्यजगतातली वस्तुस्थिती आहे.”
असो. इंग्रजी साहित्यजगतात वेगळी स्थिती असावी. ते १९५४ साल होतं. आज ‘हार्परकोलिन्स’ या नावाने प्रख्यात असलेल्या प्रकाशनगृहाचा संपादक-मालक इयान चॅपमन याच्या बायकोने ब्रिटनमधल्या एका कथास्पर्धेत पहिली आलेली एक कथा वाचली. लेखक एक स्कॉटिश इसम होता. ‘ग्लासगो’ विद्यापीठातून १९५० साली ‘एम.ए’(ऑनर्स) पदवी मिळवणारा आणि इंग्रजीपेक्षा मातृभाषा स्कॉटिश-गॅलिकमधून लिहिणार्‍या त्या लेखकामध्ये त्या मालक पत्नीला काहीतरी ठिणगी आढळली. त्या माणसाने स्वत:बद्दल लिहिताना, आपण मुळात खलाशी आहोत आणि सध्या अगदी रस्त्यावर झाडू मारण्याचंसुद्धा काम करतो, असं म्हटलं होतं.
 
 
इयान चॅपमनच्या बायकोने त्या इसमाला पत्र लिहून भेटायला बोलावलं. मग त्याची आणि आपल्या नवर्‍याची गाठ घालून दिली. रेहमान-माला सिन्हा यांनी गुरूदत्तला आपल्या घरी घरगडी म्हणून ठेवलं. तसा फिल्मी आचरटपणा न करता, ते त्याला म्हणाले, “तुझी कल्पनाशक्ती आणि मांडणी चमकदार आहे. तू कथा न लिहिता कादंबरी लिही. मी ती प्रकाशनाला घेतली असं धरूनच चाल.”
तीन महिने उलटले. त्या नव्या लेखकाने एका कादंबरीचं बाड चॅपमनच्या हातात ठेवलं. नाव वाचूनच चॅपमन खुश झाला. ‘एच.एम.एस. युलिसिस’ आणि कादंबरी पूर्ण वाचल्यावर तर त्याच्या लक्षात आलं की, आपल्या बायकोने आपल्याला एक गुणवान आणि उत्तम व्यवसाय करणारा लेखक मिळवून दिलाय. १९५५ साली ती कादंबरी प्रसिद्ध झाली आणि सहा महिन्यांच्या आत एकट्या ब्रिटनमध्येच तिच्या अडीच लाख प्रती हातोहात संपल्या. मग पुढे ती अमेरिकेत प्रसिद्ध झाली आणि तिच्या दहा लाख प्रती कापरासारख्या उडाल्या. ‘एच.एम.एस. युलिसिस’ या कादंबरीच्या नावाप्रमाणे लेखकाचं नावही जगद्विख्यात झालं - अ‍ॅलेस्टर मॅक्लिन!
१९५५ ते १९८६ या कालखंडात २८ कादंबर्‍या, दोन चरित्रग्रंथ, एक लघुकथासंग्रह आणि एक प्रवास-पर्यटन परिचय ग्रंथ अशा साहित्याच्या १५ कोटी प्रती आणि पाच चित्रपटांच्या पटकथा असा प्रचंड साहित्यसंभार निर्माण करणारा अ‍ॅलेस्टर मॅक्लिन प्रारंभी एक साधा खलाशी होता.
 
 
ब्रिटनच्या स्कॉटलंड भागातल्या ग्लासगो या प्रसिद्ध शहराच्या शेटलस्टन या उपनगरातल्या एका चर्चमधल्या पाद्य्राचा अ‍ॅलेस्टर हा पोरगा. त्याचं बालपण आणि शिक्षण अत्यंत सामान्य होतं. युद्ध ही एक थारेपालटी घटना असते. ती एकाच वेळी अनेक व्यक्ती, संस्था यांचा विनाश करते आणि त्याचवेळी अनेक नव्या संधींना जन्म देते. १९३९ सालच्या सप्टेंबर महिन्यात दुसरं महायुद्ध सुरू झालं. १९४० साली ते रंगात आलं आणि १९४१ साली तर ते कळसाला पोहोेचलं. रोज हजारो माणसं मरत होती आणि लाखो-करोडोंची मालमत्ता नष्ट होत होती. पण, अ‍ॅलेस्टरसारख्या असंख्य बेकार तरुणांना ही संधी होती. १९ वर्षांचा अ‍ॅलेस्टर ब्रिटनच्या शाही नौदलात कनिष्ठ खलाशी म्हणून भरती झाला.
१९४३ साली त्याला प्रत्यक्ष युद्धाचा पहिला अनुभव मिळाला. जर्मनीने सोव्हिएत रशियाची सागरी कोंडी केली होती. मुख्यतः ब्रिटन आणि मग कॅनडा आणि अमेरिका यांच्या नौदलांनी अटलांटिक आणि आर्क्टिक महासागरातून सोव्हिएत रशियाच्या आर्कएंजल आणि मरमन्स्क या बंदरांना सतत पुरवठा चालू ठेवला. यात दारुगोळा, अन्नधान्य आणि इतर सर्वच जीवनावश्यक वस्तू होत्या. ब्रिटिश दर्यासारंगांनी या कामगिर्‍या पार पाडताना आपल्या शतकानुशतकांच्या दर्यावर्दी परंपरेला अगदी पणाला लावून काम केलं. या मोहिमांमध्ये फार माणसं कामी आली. कारण, सामना फक्त जर्मन युद्धनौका, जर्मन पाणबुड्या, जर्मन बॉम्बफेकी विमानं यांच्याशीच नव्हता, तर उत्तर अटलांटिक आणि आर्क्टिकमधल्या क्षणोक्षणी बदलणार्‍या अत्यंत लहरी, अत्यंत घातक अशा वादळी हवामानाशी होता. अ‍ॅलेस्टर मॅक्लिन या आर्क्टिक मोहिमेवर एक सामान्य खलाशी म्हणून गेला आणि प्रचंड अनुभव मिळवून, जगून-वाचून परत आला.
पुढे त्याने पॅसिफिकमधल्या जपान बरोबरच्या आरमारी युद्धाचाही प्रत्यक्ष अनुभव घेतला. जर्मनांपेक्षाही जपानी हे अधिक कजाखी लढवय्ये होते. अ‍ॅलेस्टरचा काफिला पॅसिफिकमध्ये असतानाच महायुद्ध संपलं. तोपर्यंतअ‍ॅलेस्टर कनिष्ठ खलाशापासून टॉरपेडो ऑपरेटर पदापर्यंत चढला होता. जपान्यांच्या तावडीतून सिंगापूर सोडवल्यावर तिथल्या युद्धकैद्यांची व्यवस्था करण्याचं काम त्याच्या दलाकडे काही काळ होतं. नंतर मात्र त्याला ब्रिटनमध्ये परत पाठवून बरखास्त करण्यात आलं.
अ‍ॅलेस्टरसारख्या शेकडो तरुणांची ही स्थिती झाली. युद्ध संपल्यामुळे त्यांच्या सेवेची आता आवश्यकता नव्हती. पण, युद्धाने ब्रिटनला पार डबघाईला आणलं होतं. पोटासाठी अ‍ॅलेस्टरने अक्षरशः पडेल ते काम केलं. त्यात सफाई कामगार म्हणून रस्त्यावर झाडूसुद्धा मारला. मात्र, हे करतानाच तो जिद्दीने शिकत राहिला आणि १९४५ ते १९५० या पाच वर्षांत त्याने ‘एम.ए’ (ऑनर्स) ही पदवी पदरात पाडून घेतली. मग तो वृत्तपत्रांसाठी छोटी टिपणं, वृत्तं लिहू लागला. ‘डेली मिरर’ आणि ‘इव्हिनिंग न्यूज’ ही वृत्तपत्रं त्याच्या छोट्या कथा छापू लागली. मग १९५४ साली इयान चॅपमनच्या बायकोने ‘डिलिअस’ ही त्याची ‘दर्यावर्दी’ जीवनावरची पारितोषिक प्राप्त कथा वाचली आणि पुढचा इतिहास घडला.
१९५५च्या प्रख्यात ‘एच.एम.एस.युलिसिस’मध्ये अ‍ॅलेस्टर मॅक्लिनने त्याचा आर्क्टिक मोहिमेचा अनुभवच शब्दबद्ध केला. वाचकांसाठी तो इतका थरारक ठरला की, या कांदबरीने इंग्रजी साहित्यात ‘थरारकथा’ हा नवा साहित्यप्रकार सुरू केला.
या पाठोपाठ १९५७ साली मॅक्लिनची दुसरी कादंबरी आली-‘गन्स ऑफ नेव्हरोन.’ नेव्हरोन नावाच्या ग्रीक बेटावर जर्मनांनी दोन महाभयंकर तोफा तैनात केलेल्या असतात. काही धाडसी कमांडो जीवाची बाजी लावून त्या तोफा उडवून देतात. ही थरार कादंबरी वाचून लोक इतके वेडे झाले की, पहिल्या सहा महिन्यांत तिच्या चार लाख प्रती संपल्या. अफाट लोकप्रियता आणि अलोट संपत्ती अ‍ॅलेस्टर मॅक्लिनचा पत्ता विचारत धावत आल्या. ‘युलिसिस’चे चित्रपटासाठीचे हक्क लगेचच विकत घेतले गेले. पण, विविध अडचणींमुळे त्यावर कधीच चित्रपट निघाला नाही. ‘गन्स ऑफ नेव्हरोन’चे हक्क कार्ल फोरमन या प्रसिद्ध निर्मात्याने विकत घेतले आणि १९६१ साली त्याच नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटाने त्यावेळी जगभर तुफान धंदा केलाच. पण, आजही तो चित्रपट ‘ऑल टाईम ग्रेट’ चित्रपटांपैकी एक समजला जातो.
भरपूर पैसा मिळाल्यामुळे मॅक्लिनने लेखनाचं काम चक्क थांबवलं आणि त्याला मनापासून आवडणार्‍या हॉटेलच्या धंद्यात उतरला. ब्रिटनच्या वेगवेगळ्या भागात त्याने क्रमशः तीन अलिशान हॉटेल उघडली आणि...
...आणि लेखनातून मिळवलेला सगळा पैसा घालवून बसला. हॉटेल धंदा यशस्वी करण्यासाठी लागणारं कौशल्य आपल्याकडे नाही, हे त्याला कळून चुकलं. १९६६ साली तो पुन्हा लेखनाकडे वळला. एलियट केसनर या चित्रपट निर्मात्यासाठी त्याने पाच पटकथा लिहिल्या. या खेपेस मॅक्लिनने एक अभिनव प्रयोग करून पाहिला. तो एकाच कथाबीजावर प्रथम पटकथा लिहित होता आणि मग त्याच्यावरच कांदबरी पण लिहित होता.
 
 
अशा रितीने सिद्ध होऊन पडद्यावर आलेली आणि पुस्तक म्हणूनही प्रचंड गाजलेली त्याची कादंबरी म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर.’ जिथे उतरण्याची हिंमत फक्त गरूडच करू शकतील, अशा कडेकोट बंदोबस्तातल्या एक जर्मन डोंगरी किल्ल्यातून एका महत्त्वाच्या कैद्याला सोडवायचं असतं. एक ब्रिटिश आणि एक अमेरिकन कमांडो हे काम किती कौशल्याने पार पडतात, ते सांगणारी ही थरार कादंबरी आणि त्याच्यावरचा तितकाच थरारक चित्रपट यांनी पुन्हा एकदा लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. ब्रिटिश रंगभूमीवरचा शेक्सपिअरच्या नाटकांमधून काम करणारा प्रख्यात अभिनेता रिचर्ड बर्टन याने या चित्रपटात नायकाची भूमिका केली.
समकालीन लेखकांमध्ये सर्वाधिक पुस्तकं खपण्याचा विक्रम करणार्‍या अ‍ॅलेस्टर मॅक्लिनचा जन्म दि. २१ एप्रिल, १९२२ या दिवशीचा. म्हणजे येत्या २१ एप्रिल रोजी त्याची जन्मशताब्दी पूर्ण होईल.
 
@@AUTHORINFO_V1@@