किरौलीमध्ये काय घडलं?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Apr-2022   
Total Views |
 
 
kirauli
 
 
किरौलीमध्ये घडलेल्या घटनेचा तेथील हिंदू समुदायावर विपरित परिणाम झाला आहे. साधारणपणे २०१६ साली उत्तर प्रदेशातील कैराना येथे ज्याप्रमाणे हिंदूंना मुस्लिमांच्या दहशतीमुळे पलायन करावे लागले होते, तशीच स्थिती आता किरौलीमध्येही निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
 
 
किरौलीमध्ये काय घडलं? हा प्रश्न कोणीही विचारणार नाही आणि विचारला तरीही त्याचे उत्तर कोणी देणार नाही. कारण, किरौली आहे, राजस्थानमध्ये आणि राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता असून अशोक गेहलोत सत्तेत आहेत. आता काँग्रेसशासित राज्यात काही विपरित घडले तरी ते घडलेच नाही, असे सांगणे क्रमप्राप्त असते. कारण, त्यामुळे काँग्रेसचा कथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा उत्तरोत्तर अधिक काळा होत असतो. त्यामुळे किरौलीमध्ये जे काही घडलं असेल, ते धर्मनिरपेक्षच असल्याचे त्याविषयी बोलण्याऐवजी उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ आणि मध्य प्रदेशात मामाजी शिवराजसिंह चौहान हे हिंदूविरोधात हिंसाचार करणार्‍या दंगेखोर्‍यांच्या घरांवर बुलडोझर चालवतात, ते मात्र देशाच्या ‘गंगाजमुनी तहजीब’ला तडा देणारे असल्याने त्याविषयी बोलले जाते.
 
 
मात्र, तरीदेखील किरौलीमध्ये काय घडलं, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, एरवी भाजपशासित राज्यांना ‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ असे हिणवले जाते. भाजपशासित राज्यांमध्ये मुस्लिमांविरोधात राज्यप्रायोजित हिंसाचार होतो, असा अपप्रचार केला जातो. भाजपशासित राज्यांमध्ये मुस्लिमांमध्ये भयाचे वातावरण असल्याचे सातत्याने सांगितले जाते. त्यानंतर मग ‘इकोसिस्टीम’ कामाला लागते आणि देशात एकूणच असहिष्णुता वाढीस लागल्याची बोंब ठोकते. मात्र, काँग्रेसशासित राज्यांमध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचार, हिंदूंविरोधात होणार्‍या दंगली, भयाच्या वातावरणात जगणारे हिंदू, भयामुळे आपले राहते घर विकून पलायन करणार्‍या हिंदूंविषयी बोलणे जाणीवपूर्वक टाळले जाते. त्यामुळेच राजस्थानमधल्या किरौलीमध्ये काय घडलं, हे जाणून घ्यायची गरज आहे.
 
 
त्याविषयी पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’नुसार, नीरज कुमार यांनी दिलेल्या विनंतीअर्जानंतर त्यांना ओपी टाऊन करौली येथील साहाय्यक उपनिरीक्षक बृजराज शर्मा यांनी नववर्षानिमित्त शांततापूर्ण पद्धतीने शोभायात्रा काढण्यास परवानगी दिली होती. शोभायात्रेमध्ये आदर्श विद्यामंदिर, रामद्वारा येथून मोटारसायकल रॅलीही काढण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, दि. २ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता ४००-५०० लोकांच्या उपस्थितीत सुमारे २०० मोटारसायकली आदर्श विद्या मंदिर रामद्वारापासून विहित मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्या. बाईक रॅलीच्या समोर पोलीस अधिकारी रामेश्वर दयाळ पोलिसांसोबत चालत होते, त्यात सुमारे दोन डझन पोलीस कर्मचारी आणि जिल्हा विशेष शाखेचे हेडकॉन्स्टेबल आणि पोलीस कर्मचारी देखील उपस्थित होते. तसेच, रॅलीची संपूर्ण व्हिडिओग्राफीदेखील पोलिसांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत होती. रॅलीमध्ये परिसरातील प्रसिद्ध संत दुर्गाता महाराज एका जीपमध्ये बसले होते आणि अन्य एका पिकअप वाहनामधूमधून ‘जय श्री राम’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या धार्मिक घोषणा दिल्या जात होत्या.
 
 
शोभायात्रा हाथीघाट, गुलाब बाग, हिंडोन गेट परिसरातील उतारावरून मणियार मशिदीवरून अतिशय शांततेत जात असताना साधारणपणे ५ वाजून १५ मिनिटांनी मार्गावरील जिम सेंटर, बांगडी विक्रेत्यांचे दुकान, बांबू विक्रेत्यांचे दुकानातून शोभायात्रेवर सुनियोजित पद्धतीने हल्ला करण्यासाठी दबा धरून बसलेल्या १०० ते १५० उपद्रवींनी लाठ्या, सळ्या आणि तलवारींनी व दगडांनी हल्ला करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अफरातफरी माजली. उपद्रवींनी शोभायात्रेतील भगवान श्रीरामांच्या प्रतिमेने सुसज्ज असलेल्या रथालाही तोडण्यात आले. पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकार्‍यांसह अतिरिक्त पथक तेथे पोहोचेपर्यंत रॅलीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे धावून हल्लेखोरांनी दगड-काठ्याने हल्ला सुरूच ठेवला होता.
पोलिसांनी दाखल केलेल्या ‘एफआयआर’मधील हा मजकूर अतिशय धक्कादायक आहे. कारण, हिंदूंनी काढलेल्या शोभायात्रेवर झालेला हा हल्ला अचानक झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनेचा कट अनेक दिवसांपासून आखला जात होता, हे स्पष्ट आहे. त्यात राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे मुस्लिमांनी जाणीवपूर्वक हिंदूंच्या शोभायात्रेवर हल्ला घडविला, असे जाणीवपूर्वक लिहिण्यात आले, असाही दावा या प्रकरणात करता येणार नाही.
याविषयी भाजपचे राजस्थान विधानसभेतील उपनेते राजेंद्र राठौड यांच्या नेतृत्वाखालील सत्यशोधत समितीने घटनास्थळास भेट देऊन आपला अहवाल तयार केला. अहवालामध्येही धक्कादायक बाबींचा खुलासा झाला आहे. अहवालामध्येही हिंसापीडितांनी मुस्लीमबहुल भागातून शोभायात्रा जात असताना आजूबाजूच्या घरांमधून झालेली दगडफेक, तलवारींनी झालेला हल्ला याविषयी सांगितले आहे. धक्कादायक म्हणजे, यावेळी पोलिसांनी अजिबात बळाचा वापर केला नाही किंवा जमावास पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या नाहीत. सुमारे ४० मिनिटे करौली शहरातील हाथीघाटा ते मणियार मशिदीपर्यंतच्या संपूर्ण परिसरामध्ये हल्लेखोरांचे वर्चस्व होते. त्याचप्रमाणे ‘पीएफआय’ या इस्लामी कट्टरतावादी संघटनेचा प्रदेशाध्यक्ष मो. आसिफ याने मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून राज्यात अशा प्रकारच्या धार्मिक शोभायात्रेस परवानगी देऊ नये, असे म्हटले होते. त्यामुळे हिंदूंच्या शोभायात्रेविरोधात जाणीवपूर्वक कट रचण्यात आला आणि राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप भाजपने आपल्या अहवालामध्ये केला आहे.
किरौलीमध्ये घडलेल्या घटनेचा तेथील हिंदू समुदायावर विपरित परिणाम झाला आहे. साधारणपणे २०१६ साली उत्तर प्रदेशातील कैराना येथे ज्याप्रमाणे हिंदूंना मुस्लिमांच्या दहशतीमुळे पलायन करावे लागले होते, तशीच स्थिती आता किरौलीमध्येही निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. मुस्लीमबहुल भागातून हिंदू आपली घरे आणि दुकाने विकून स्थलांतरित होत आहेत. दोन घरे आणि काही दुकाने एका विशिष्ट वर्गाच्या लोकांनी ताब्यात घेतली आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हिंदूंनी घरे आणि दुकानांच्या बाहेर ’मालमत्ता विक्रीसाठी’ असे फलक लावले आहेत. याविषयी भारतीय पोलीस सेवेतील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ ‘आयपीएस’ अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या एका आठवड्यात लोक एकतर आपली घरे आणि दुकाने सोडून करौलीमध्येच इतरत्र राहू लागले आहेत किंवा त्यांना कुलूप लावून इतर ठिकाणी गेले आहेत. या लोकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्थलांतरित झालेल्यांमध्ये जाटव, खाटिक, धोबी आणि कुमावत समाजातील लोकांचा समावेश आहे.
हे सर्व झालेले असतानाही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मात्र भाजपशासित राज्यांमध्येही नववर्ष-श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत हिंसाचार झाल्याचे वक्तव्य केले आहे. मात्र, यातून एक विशिष्ट ‘पॅटर्न’ असल्याचे दिसून आले आहे. हिंदूंच्या शोभायात्रांमध्ये जाणीवपूर्वक हल्ले केले जात आहेत. त्यासाठी मुस्लीमबहुल भागातून जाणार्‍या शोभायात्रांना लक्ष्य केले जात आहेत. घरांवरून दगडफेक करण्याचा ‘पॅटर्न’ दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या दंगलीमध्ये दिसून आला होता. दिल्लीत घरांच्या छतांवर दगड, सोडावॉटरच्या बाटल्यांचा मारा करण्यात आला होता. तसाच ‘पॅटर्न’ केवळ करौली नव्हे, तर मध्य प्रदेशात आणि महाराष्ट्रातल्या मालेगावमध्येही नुकताच घडला आहे.
देशात २०१४ सालापूर्वी सर्वत्र आबादीआबाद होते. मात्र, २०१४ साली भारतीय जनता पक्षाची केंद्रात सत्ता आली आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर देशात सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पुन्हा भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यांमध्ये आली, तेथेही सर्वत्र हिंदुत्ववाद्यांचा उन्माद सुरू झाला आणि त्यांनी मुस्लिमांविरोधात हिंसाचार करण्यास प्रारंभ केला, असे चित्र रंगविण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, तृणमूल काँग्रेस आणि या पक्षांची विचारधाराच प्रमाण मानणारे कथित विचारवंत, माध्यमकर्मी, सामाजिक कार्यकर्ते वगैरे आघाडीवर आहेत. अर्थात, देशातील सर्वसामान्य जनतेला कस्पटासमान मानण्याची या टोळीची सवय असल्याने त्यांचे अद्याप फावते. मग कधी महिलाविरोधी ‘हिजाब’चे समर्थ केले जाते, ‘तिहेरी तलाक’ हा कुराणाचा आदेश असल्याचे सांगितले जाते, हिंदू ‘लिंचिंग’ करतात असे सांगितले जाते. मात्र, हे सर्व होत असताना अगदी कालपरवा राजस्थानातल्या किरौलीमध्ये काय घडलं, हे मात्र बेमालूमपणे लपविले जाते. त्यामुळेच किरौलीमध्ये काय घडलं, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
 
@@AUTHORINFO_V1@@