कोट्यवधी खर्चून तरी मुंबईची हवा शुद्ध होणार का?

    23-Feb-2022   
Total Views |

air-pollution
 
 
 
फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील वायुप्रदूषणात मोठी वाढ नोंदवण्यात आली. हवेचा दर्जा दाखविणारा निर्देशांकदेखील ३००च्यावर गेला. त्यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, यंदाच्या महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात ‘मुंबई क्लायमेंट अ‍ॅक्शन प्लॅन’ अंतर्गत एक कोटींची तरतूद करुनही खरोखरच मुंबईची हवा शुद्ध होणार का?
 
 
 
मुंबईमध्ये दि. ६ फेब्रुवारीला ‘हवा गुणवत्ता निर्देशांक’ (अटख) ३१६, तर दि. ७ फेब्रुवारीला ३१८ आणि दि. ८ तारखेच्या सकाळी ३२० असा सातत्याने वाढणारा आढळून आला. इथे लक्षात घ्यायला हवे की, ‘एक्यूआय’ ३०१ ते ४०० पर्यंतचा हवेचा दर्जा धोकादायक वा फार खराब मानला जातो. ‘एक्यूआय’ हा विविध प्रदूषकांच्या दर्जांच्या पातळीवरून सरासरी बघून काढला जातो. ते विविध प्रदूषक म्हणजे ‘पार्टिक्युलेट मॅटर्स’ (पीएम २.५ आणि पीएम १०), ओझोन (ओ३), नायट्रोजन ऑक्साईड (एनओ२), सल्फर डायाक्सॉईड (एसओ२) आणि कार्बन मोनॉक्साईड (सीओ) या सर्वांचे एकत्रितपणे उत्सर्जन. जितका ‘एक्यूआय’ जास्त, तितके प्रदूषण जास्त व धोकादायक समजले जाते. मुंबईतील माझगाव भागात ‘एक्यूआय’ची पातळी तर ४९५ पर्यंत पोहोचली होते. म्हणजे त्या भागात मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरणारे प्रदूषण नोंदवण्यात आले होते. ‘अर्थ सायन्स सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अ‍ॅन्ड वेदर फोरकास्टिंग रिसर्च’ अर्थात ‘सफर’च्या माहितीवरून दुपारी १.३०च्या सुमारास माझगावचा सर्वसाधारण ‘एक्यूआय’ अतिगंभीर अशा अवस्थेत होता. म्हणजे दिल्ली, पुणे आणि अहमदाबाद येथील ‘एक्यूआय’पेक्षाही येथील स्थिती बिकट झाली होती.
 
 
 
मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणाला जबाबदार कोण?
‘सफर’ संस्थेच्या माहितीनुसार, मुंबईतील वायुप्रदूषणात वाढ झाली ती युएअईमध्ये उगम पावलेल्या धुळीच्या वादळामुळे. दि. ३ फेब्रुवारी रोजी अफगाणिस्तान, पाकिस्तान व राजस्थानच्या हद्दीतील प्रदेशात मोठ्या धुळीच्या वादळामुळे महाराष्ट्रातील वायव्य विभागात, गुजरात व राजस्थानमध्ये धुळीचे व धुक्याचे साम्राज्य पसरले. या स्थितीमुळे मुंबईचे तापमान १९.४ अंश व नंतर ते १७.८ अंशांपर्यंत घसरले. मंद वाहणारे वारे, जास्ती किमतीची सापेक्ष आर्द्रता आणि थंड हवा प्रदूषणवाढीस अनुकूल ठरल्या. मुंबईला समुद्र किनारा लाभल्यामुळे शहरात जोराचे वारे वाहतात. पण, फेब्रुवारीमध्ये दुदैवाने वारे जोराचे नव्हते. जोराचे वारे असले की, विविध प्रदूषके हवेत शिरकाव करत नाहीत व ती प्रदूषके बाहेर फेकली जातात व हवेतील विषारी द्रव्यांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत करतात. पण, यंदा तसे झालेले दिसत नाही.
 
 
 
वायुप्रदूषणाचा धोका कधीपर्यंतकायम राहील?
‘सफर’ संस्था सध्या मुंबईत दहा ठिकाणी हवेच्या गुणवत्तेची २४ तास नोंदणी करते व त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हवेची गुणवत्ता अतिवाईट स्थितीमधून थोडी सुधारून कमी वाईट स्थितीत येण्यास पुढील काही दिवसांचा अवधी लागेल व त्यानंतर ‘एक्यूआय’ २०१ ते ३०० पर्यंत खाली येऊ शकतो. ‘सफर’च्या संकेतस्थळाला भेट दिल्यास कोणालाही मुंबईतील हवेच्या प्रदूषणाची नेमकी पातळी समजू शकते. ही परिस्थिती लक्षात घेता, ‘सफर’ने मुंबईकरांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. या अशा जास्त व धोक्याच्या प्रदूषणावेळी शक्यतो घराबाहेरचे पडणे टाळण्याचा सल्लाही ‘सफर’ने दिला आहे. खासकरुन ज्यांना दम्याचा विकार आहे, त्यांनी ‘एन-९५’ वा ‘पी १००’ची मुखपट्टी लावावी. तसेच सर्वांनी घरात थांबावे व दारे खिडक्या बंद ठेवून बाहेरच्या हवेचा धोका घरात आणणे टाळावे, असेही ‘सफर’ने म्हटले आहे.
 
 
 
दिवाळीनंतर मुंबईच्या वायुप्रदूषणात वाढ
‘सफर’कडून मुंबईतील ज्या दहा ठिकाणी ‘एक्यूआय’ तपासला जातो, तो दि. १६ नोव्हेंबर, २०२१ ला खालीलप्रमाणे आढळला होता. बोरिवली (१५९), मालाड (३२७), अंधेरी (१८३), वांद्रे-कुर्ला संकुल (३११), वरळी (१४२), कुलाबा (३७०), माझगाव (३३१), नवी मुंबई (१८३), चेंबूर (१८३), भांडुप (१२५) तसेच मुंबईत कार्बन उत्सर्जन देखील धोक्याच्या पलीकडच्या पातळीत नोंदवले गेले आहे. मुंबई महानगरलपालिका, राज्य सरकारच्या आणि खासगी कंपन्यांच्या यंत्रणांनी गेल्या काही काळात वाहतूक, कचरा, ऊर्जा आणि इतर विविध क्षेत्रांतून होणार्‍या उत्सर्जनाची आकडेवारी नोंदवली आहे. त्यानुसार मुंबई महानगरात कार्बनडाय ऑक्साईडचे एकूण प्रमाण हे अंदाजे २४.३ दशलक्ष टन इतके झाले होते. २०१९च्या आकडेवारीनुसार मुंबईत ते दरडोई अंदाजे २.६७ टन इतका कार्बनडाय ऑक्साईडचा वाटा आहे, तर देशातील हा वाटा दरडोई १.९१ टन इतका आहे. ऊर्जा क्षेत्राकडून उत्सर्जित होणारे हरितगृह वायूंचे प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे ७१ टक्के, वाहतूक क्षेत्राचा वाटा २४ टक्के, घनकचर्‍याचा वाटा पाच टक्के आहे.
 
 
 
मुंबईची हवा, पाणी, जमीन प्रदूषण या सर्वांचा अभ्यास करणार्‍या पहिल्या वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ नुकताच महापालिकेत करण्यात आला. त्या अहवालाप्रमाणे मुंबई ‘सी-४०’ जागतिक हवामान बदल शहरांच्या गटात सहभागी झाली आहे. ‘सी-४०’ची मार्गदर्शक तत्वे व निकषांना अनुसरून आणि मुंबई महापालिका, ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया’ (थठख) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा विकसित होत आहे. ‘डब्ल्यूआरआय’ हे ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून काम पाहत आहेत. २०२० साल हे कोरोना प्रादुर्भावाचे असल्यामुळे २०१९ हे वर्ष वातावरण कृती आराखड्यासाठी हरितगृह उत्सर्जनाचे आधारभूत मानण्यात आले आहे. मुंबईत वापरली जाणारी ९५ टक्के वीज ही औष्णिक प्रकल्पाद्वारे मिळविली जात असून, ऊर्जा क्षेत्र हे सर्वाधिक उत्सर्जन करणारे आहे. २०१९च्या आकडेवारीनुसार विविध वाहनांनी एकत्रितपणे कापलेले अंतर (व्हिकेटी) हे सुमारे ८०५.७१ दशलक्ष किमी इतके असल्यामुळे वाहतूक क्षेत्राकडून मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. घनकचरा व्यवस्थापन क्षेत्राकडून तुलनेने ते कमी होत आहे. परंतु, भविष्यात ते आणखी कमी करण्याची संधी आहे.
 
 
 
शहरातील हरितगृह वायूंचे (ॠकॠ) ७१ टक्के उत्सर्जन हे ‘डब्ल्यूआरआय’च्या अभ्यासाप्रमाणे औष्णिक ऊर्जेपासून होत आहे, २४ टक्के परिवहन क्षेत्रातील आहे. परिवहनातील रस्त्यावरील उत्सर्जन ४४ टक्के, विमान मार्गांमुळे ४५ टक्के, रेल्वेमुळे नऊ टक्के व जलमार्गांमुळे दोन टक्के आहे. मुंबई शहर व उपनगरातून २४.३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण २०१९च्या ‘जीएचजी’च्या बरोबर आहे. या ७१ टक्के उत्सर्जनातले ५५ टक्के निवासी वस्तीतून, ४५ टक्के व्यापारी संकुलातून, चार टक्के औद्योगिक क्षेत्रातून आणि पाच टक्के इतर क्षेत्रातून होत आहे.
 
 
 
पावसाळ्यानंतर मुंबईत ‘पार्टिक्युलेट मॅटर’२.५च्या (पीएम) प्रदूषणात ३२० टक्क्यांनी वाढ
‘नॅशनल अ‍ॅम्बिअन्ट एअर क्वालिटी स्टॅन्डर्ड’प्रमाणे सुरक्षित पातळी ६० मायक्रो ग्रॅम प्रति घनमी हवेकरिता असते, तर ‘जागतिक आरोग्य संघटने’प्रमाणे ती पातळी १५ मायक्रो ग्रॅम प्रति घ.मी आहे. हे प्रदूषक धुळीतून व वाहनांच्या उत्सर्जनातून येतात. हे प्रदूषक छोटे व २.५ मायक्रोमी व्यासाहून लहान आकाराचे असतात. (केसांच्या जाडीच्या एक तिसांशाहून ते लहान असतात). दि. ७ ऑक्टोबरला पीएम २.५ची सरासरी नोंदणी २७.५ मायक्रो ग्रॅम प्रति घ.मी. होती ती दि. १५ नोव्हेंबरला सरासरी ८९.४ मायक्रो ग्रॅम प्रति घमी झाली. म्हणजे ३२० टक्के वाढली आहे.
 
 
 
मुंबईतील प्रदूषणाचे मुख्य स्रोत
मुंबईतील काही भागांमध्ये पक्के रस्ते न झाल्यामुळे अशा भागांमधून धुळीमुळे ४५ टक्के, रस्ता असलेल्या भागातील धुळीमुळे २५ टक्के, बांधकामामुळे आठ टक्के, कचर्‍याच्या आगीमुळे चार टक्के, बेकरीमुळे ३.५ टक्के, डिझेलच्या वाहनांमुळे तीन टक्के, मुंबई मेट्रोच्या धुळीमुळे तीन टक्के आणि इतर कामांमुळे ८.५ टक्के वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. २०१९ पासून गेल्या तीन वर्षांत सरकारकडून ‘नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम’प्रमाणे (छउअझ) हे ‘पीएम २.५’चे प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न फार थोडे झाले. पण, २०२४ मध्ये हे प्रमाण २० ते ३० टक्के कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण खात्यातर्फे ‘मुंबई क्लायमेंट अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्यासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये रुपये एक कोटी राखून ठेवले आहेत. ‘पीएम २.५’चे प्रदूषण कमी करण्यासाठी चार चौकिमी क्षेत्राकरिता एक अशी १२८ ‘एअर क्वालिटी सेन्सर’ यंत्रे शहरात बसविली जातील. सहा महिन्यांत प्रायोगिक तत्वावर सहा ठिकाणी ती कार्यान्वित होणार. पहिल्या टप्प्यात घाटकोपर पंतनगर पालिका शाळा, देवनार शिवाजी नगर बस आगार, शिवडी पालिका शाळा, भायखळा वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, कांदिवली चारकोप प्रसूतीगृह, सहावे ठिकाण लवकरच शोधले जाईल. प्रथम टप्प्याचे काम झाल्यावर इतर ठिकाणी केंद्रे काढली जाणार. त्यामुळे एकूणच काय तर मुंबईतील प्रदूषणाचाही दिल्लीच्या पातळीवर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज असून, दिल्लीनंतर मुंबई तर ‘गॅस चेंबर’ ठरणार नाही ना, याची खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.