विज्ञानसेवाव्रती श्रीरंग पिंपळीकर

    15-Feb-2022   
Total Views |

Shrirang Pimplikar
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीतर्फे महाराष्ट्र प्रातांच्या १६ जिल्ह्यांमध्ये फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचे निमंत्रक आहेत श्रीरंग पिंपळीकर. त्यांच्याविषयी...
 
 
ध्येय ठरवा, लक्ष केंद्रित करा. त्या एका ध्येयासाठी आयुष्य समर्पित करा,” असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला आहे. या व्रतानुसार आयुष्याचे समर्पण विशिष्ट ध्येयासाठी समर्पित करणारे एक विज्ञानसेवाव्रती कृतार्थ व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीरंग पिंपळीकर. गेली ३१ वर्षे श्रीरंग विज्ञानाचा प्रसार-प्रचार फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेच्या माध्यमातून करत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे त्यांच्या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे नियोजन आणि कार्य सुरळीत सुरू आहे. विज्ञानक्षेत्रात कार्यरत असल्याने अनेक मोठमोठ्या शास्त्रज्ञांशी त्यांचा सहज संपर्क आणि संवाद झालेला. फिरत्या विज्ञानप्रयोग शाळेच्या माध्यमातून लाखो चिमुकल्यांच्या विचारांमध्ये विज्ञानाची तर्कसुसंगत ज्योत तेवली, म्हणून श्रीरंग यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. पण, श्रीरंग म्हणतात, “हे लौकिक अर्थाने पुरस्कार असले तरी त्यांच्या आयुष्यातले मनाला आणि जीवनाला समृद्ध करणारे पुरस्कार आहेत.” खेड्यापाड्यातले, दुर्गम भागातले विद्यार्थी... फिरत्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागली आणि ते विद्यार्थी गरिबी आणि असंख्य प्रतिकूलतेला मात करीत डॉक्टर, इंजिनिअर, संशोधक आणि इतरही क्षेत्रात यशस्वी झाले.
 
 
 
गेले ३१ वर्षं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या माध्यमातून फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचे आयोजन नियोजन करणारे श्रीरग पिंपळीकर यांची ध्येयाप्रतीची निष्ठा निश्चितच शब्दातीत आहे. जिथे सुविधांची वानवा आहे, अशा दुर्गम, वनवासी खेड्यापाड्यात दुर्लक्षित आणि लौकिक अर्थाने, भौतिक अर्थाने ज्यात काहीही अर्थपूर्ण व्यवहार होत नाहीत, अशा क्षेत्रात काम करण्यापेक्षा शहरात मोठा पगार आणि संधी देणार्‍या ठिकाणी काम करावे, असे श्रीरंग यांना कधीच वाटले नसेल का? या ध्येयनिष्ठ माणसाच्या आयुष्याची प्रेरणा काय असेल? तर एका वाक्यात त्यांचे उत्तर म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार, प्रेरणा आणि सामाजिक जाणीव! तसे पिंपळीकर कुटुंब मूळचे खानदेशचे.रामचंद्र पिंपळीकर आणि मंगलाबाई यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक श्रीरंग. पिंपळीकर कुटुंबीयांना समाजजागृतीचा वारसाच. श्रीरंग यांचे पणजोबा वासुदेव हे वकील. ते स्वातंत्र्यसैनिक. वासुदेव यांच्या घरी लोकमान्य टिळक, गांधी, नेहरू, डॉ. मुंजे आदी मोठमोठी व्यक्तिमत्त्व भेट देऊन गेली. श्रीरंग यांचे काका वामन भोपाळहे देखील संघाचे सक्रिय स्वयंसेवक. श्रीरंग यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव.
 
 
 
असो. श्रीरंग सहा वर्षांचे असताना त्यांच्या पित्याचे, रामचंद्र यांचे अपघाती निधन झाले. मंगलाबाईंवर आभाळ कोसळले. पण, नातेवाईकांनी त्यांना एकटे पडू दिले नाही. सगळ्यांनी ठरवले की, नागपूरच्या मातृसेवा संघामध्ये मंगलाबाईंनी नर्सिंगचा कोर्स करावा. आपल्या पायावर उभे राहावे, तोपर्यंत पाचही अपत्ये जवळचे काका आणि मामा यांच्याकडे शिक्षणासाठी राहतील. त्यानुसार श्रीरंग नागपूर येथे काकांकडे राहायला आले. काकू निर्मलाबाईंनी त्यांचे खूप चांगल्या प्रकारे संगोपन केले. तिथूनपुढे पुढील शिक्षणासाठी ते धुळ्याला मामा रवींद्र गोसावी यांच्याकडे आले. तसे लहानपणी नागपूरला काकांकडे असताना ते संघाच्या शाखेत जायचेच. दामुअण्णा दाते, नाना ढोबळे, वसंतराव केळकर, मुकुंदराव पणशीकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. पुढे विज्ञान शाखेचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर ते अमळेनर येथे संघाच्या माध्यमातून विस्तारकम्हणून गेले. तिथे त्यांचे विभाग प्रचारकहोते भैय्याजी जोशी. परिसस्पर्श झाला. एकदा जळगावला सगळ्या संघ स्वयंसेवकांना उपक्रमासाठी जायचे होते. त्यासाठी भैय्याजींनी बैठक घेतली. कोण कसे येणार विचारणा केली. एक जण म्हणाला की,“माझे आणि बसच्या कंडक्टरचे चांगले संबंध आहेत. तो विनातिकीट मला प्रवास करू देतो.” यावर भैय्याजी म्हणाले, “तू तिकीट काढत नाहीस. तुझे तिकीट कंडक्टर काढतो का?” यावर तो म्हणाला, “नाही नाही, तो पण नाही काढत.” यावर भैय्याजी म्हणाले, “अरे तिकिटाचे शुल्क या ना त्या रूपाने देशाच्या तिजोरीत जाणार. हे देशाचे नुकसान आहे.” भैय्याजींचे विचार ऐकून सगळे स्तब्ध झाले. छोट्या छोट्याबाबतीतही देशकल्याणाचा विचार करायचाच, ही जाणीव श्रीरंग यांच्या मनावर कोरली गेली. समरसता आणि जातीपेक्षा मानवता मोठी, हे तर संघासोबत घरातूनही दिलेली शिकवण होतीच. काही काळानंतर ते एका कंपनीत कामाला लागले. कंपनीतल्या एका मित्राने त्यांचा विवाह ठरला म्हणून पार्टी दिली. त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांच्या मित्राचे अपघाती निधन झाले होते. निधन पण कसे, तर प्लेटमध्ये चिवडा खात असताना एक घास खाल्ला. कामानिमित्त उठून गेला आणि अपघात घडला. जीवनाची क्षणभंगूरता पाहून श्रीरंग व्यथित झाले. ‘हे माझे... ते माझे’ करण्यात काही अर्थ नाही, काहीच आपले नाही. केवळ सत्कर्म आपले हे त्यांच्या मनावर ठसले.
 
 
 
पुढे नाशिक इथे नोकरीनिमित्त ते रमेश गायधनी यांच्याकडे राहू लागले. त्याचकाळात संघाच्या तिथल्या सेवाकार्याशी परिचय झाला. आपणही संघसमर्पित सेवाकार्य करायचे, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. त्यासंदर्भात त्यांनी भैय्याजी जोशींशी चर्चा केली. १९९१ मध्ये भैय्याजींनी श्रीरंग यांना फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेचीजबाबदारी घेण्याचे सूचविले. तिथून मग श्रीरंग यांचा विज्ञान सेवानिष्ठ प्रवास सुरू झाला. ठरलेल्या दुर्गम भागात फिरती प्रयोगशाळा घेऊन जायचे. विद्यार्थ्यांना प्रयोग करून दाखवायचे. याच माध्यमातून ते ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिबीर आयोजित करू लागले. या शिबिरामध्ये देश, समाजाबद्दलची जागृती आणि चिंतन मुलं करू लागले. स्वत्वाला गवसू लागले. आयुष्यात काय करायचे, याचे ध्येय निश्चित करू लागले. बघता बघता एक-दोन तालुक्यात सुरू असलेली फिरती प्रयोगशाळा महाराष्ट्रातल्या १९ जिल्ह्यातील दुर्गम खेड्यापाड्यांत कार्यरत झाली. यासाठी श्रीरंग समर्पित आयुष्य जगले. श्रीरंग यांच्यासारखे ध्येयनिष्ठ विज्ञानव्रती समाजाचे दीपस्तंभच आहेत.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.