कतारमधली अशी ही कट्टरता...

    03-Nov-2022   
Total Views |
 
फीफा विश्व कप 2022
 
 
 
 
एक अधिकारी रात्री 10.30च्या आसपास त्या परिसरात आले आणि त्यांनी त्या परिसरातील 12 इमारतींमधील हजारो लोकांना आदेश दिले की, त्यांनी दोन तासांच्या आत त्यांचे सामान घेऊन तिथून बाहेर निघायचे आहे. दुसर्‍या ठिकाणी त्यांची निवास व्यवस्था केलेली आहे. या हजारो लोकांना सरकारी वाहन व्यवस्थेतून दुसर्‍या शहरांमध्ये टाकण्यात आले. ही घटना आहे कतार देशातील अल मंसौर जिल्ह्यातली.
 
 
 
या 12 इमारतींमध्ये कतार बाहेरच्या देशातून आलेले कामगार राहायचे. रविवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी कतारमध्ये ‘जागतिक सॉकर टुर्नामेंट’ होणार आहे. ती पाहण्यासाठी जगभरातून सॉकरप्रेमी कतारमध्ये येणार आहेत. ते देशात आल्यावर त्यांची राहायची व्यवस्था व्हावी म्हणून या परदेशातून कतारमध्ये आलेल्या नोकरदार किंवा मजदूरांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आले. हे करताना या परदेशी कामगारांच्या संमतीचा आणि मर्जीचा प्रश्नच नाही. यात भारतीय, नेपाळ, पाकिस्तानी, प. बंगाल, श्रीलंका, मलेशिया वगैरे देशांचे कामगार आहेत. या कामगारांना दुसर्‍या शहरात नेण्यात आले. आता या कामगारांच्या कामाची जागा या नव्या शहरापासून दूर आहेत का की जवळ? पुन्हा या नव्या शहरातील सर्वच व्यवस्थांशी या परदेशी नागरिकांनी कसे जुळवून घ्यावे, याचा कुठलाही विचार कतार प्रशासनाने केला नाही, असे या कामगारांचे म्हणणे.
 
 
 
कतारमध्ये लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास आहे आणि त्यातही 85 टक्के लोकसंख्या ही फक्त विदेशी कामगारांची आहे. त्यातही भारतीय नोकरदार कामगारांची संख्या जास्त म्हणजे जवळ जवळ सात लाखांच्या घरात आहे. 2022 साली कतारमध्ये ‘जागतिक सॉकर टुर्नामेंट’ आयेाजित होणार असे ठरले आणि कतारमध्ये ‘अल बायट स्टेडियम’ उभारण्यात आले. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बाहेरील देशातून कामगार भरती करण्यात आली. हे स्टेडियम बांधत असताना, त्यासाठी काम करताना अनेक कामगारांचा मृत्यू झाला. 41 कामगारांच्या नातेवाईकांनी त्याबाबत आवाज उठवला. या कामगारांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी एक समितीही निर्माण केली गेली. मात्र, या समितीने अहवालात केवळ तीन कामगारांचा मृत्यू झाला, अशी नोंद केली.
 
 
 
 
लोकसभेमध्ये चर्चिल्या गेलेल्या माहितीनुसार, 2020 ते 2022 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कतार येथे 7 लाख, 2 हजार, 114 भारतीय मजूर कामासाठी गेले. तसेच, 2011 ते 2022 या कालावधीमध्ये कतार येथे 3 हजार, 313 भारतीय मजुरांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या मजुरांच्या मृत्यूला नैसर्गिक ठरवले गेले. जास्त तापमान सहन झाले नाही किंवा अचानक उद्भवलेल्या हृदयविकाराने कामगार मृत पावला अशीच कारणे सांगितली गेली.
 
 
  
मृत पावलेल्या नातेवाईकांना भयंकर अनुभवही आले. कतारमध्ये मृत पावलेल्या मजुरांचे वेतनही मिळाले नाही किंवा मृत झाल्यानंतर जी काही कंपनीकडून आर्थिक मदत असते, तीसुद्धा मिळालेली नाही. मृत पावलेला मजूर ज्या कंपनीत काम करायचा, त्या कंपनीने मृताच्या नातेवाईकाकडे ‘लाखो रुपये पाठवा, तरच तुमच्या नातेवाईकांचा मृतदेह मायदेशी परत पाठवू,’ असे सांगण्याच्या घटनाही घडल्या आहेत. भारतीय मजदूर संघाने कतारमध्ये भारतीय कामगारांच्या दयनीय स्थितीबद्दल चिंताही व्यक्त केली होती. भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधी मंंडळाने जिनेव्हा येथील आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेमध्येही कतारमधील भारतीय मजुरांच्या स्थितीबद्दल आवाज उठवला होता. कतारमध्ये भारतीय कामगारांच्या स्थितीत सुधारणा झाली नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न उपस्थित केला जाईल, असेही भारतीय मजदूर संघाने म्हंटले होते. असो.
 
 
 
‘फीफा विश्व कप 2022’ मध्ये डेन्मार्क देशही सहभागी होणार आहे. या देशाने ‘जागतिक टुर्नामेंट’च्या निमित्ताने आपल्या खेळाडूंसाठी जर्सी बनण्याचा निर्णय घेतला आहे. कतारमधील टुर्नामेंटसाठी स्टेडियम निर्मिती करताना ज्या जगभरातील कामगारांचा मृत्यू झाला, त्यांना ही जर्सी समर्पित आहे, असे डेन्मार्कनेजाहीर केले. नुकताच कतार नुपूर शर्मा विषयावरून भारताच्या विरोधात उतरला होता. मात्र, कतारमध्ये मृत परदेशी गरीब मजुरांबद्दल कतारची करूणा, समता, बंधुता वगैरे कुठे गेली? की केवळ कट्टरतेवरच कतारची मदार आहे? कतारमधील विदेशी मजुरांना न्याय मिळायलाच हवा.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.