केजरीवाल, कुभांंड आणि कांगावा

    29-Nov-2022   
Total Views |

Gujrat



गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून, येत्या 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यांत विधानसभेच्या 182 जागांवर मतदान, तर 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने सभा, ‘रोड शो’ घेण्यावर भर दिला आहे. ‘आप’ने सुरत येथे नुकताच अरविंद केजरीवाल यांचा ‘रोड शो’ आयोजित केला होता. मात्र, या ’रोड शो’ दरम्यान दगडफेक झाल्याची चर्चा समोर आली होती. खुद्द केजरीवाल यांनीही त्यांच्या ‘रोड शो’ दरम्यान दगडफेक झाल्याचा दावा केला होता. परंतु, केजरीवालांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडा पडला. कारण, सुरत पोलिसांनी ‘रोड शो’दरम्यान दगडफेक झाल्याच्या घटनेचा इन्कार केला आहे. अरविंद केजरीवालांच्या रॅलीदरम्यान दगडफेकीची कोणतीही घटना घडली नसून रॅली शांततेत पार पडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘डीसीपी’ (झोन-3) पिनाकिन परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्यासाठी सुरत पोलिसांनी संपूर्ण व्यवस्था केली होती. कतारगाम परिसरातील बापा सीताराम चौक ते साई बाबा मंदिर अशी चार किलोमीटरची रॅली होती. या दरम्यान केजरीवालांना ‘झेड प्लस’दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. यासोबतच त्यांना ‘सीएपीएफ’कडून सुरक्षाही दिली गेली. त्यामुळे ‘रोड शो’ शांततेत पार पडला. ‘रोड शो’ दरम्यान रॅलीवर दगडफेक झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परंतु, ती केवळ अफवा असल्याचे समोर आले. ‘रोड शो’ दरम्यान इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाची झाली. परंतु, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून ‘रोड शो’ शांततेत पार पाडला. भाजपने ‘रोड शो’दरम्यान दगडफेक केली, यावेळी फक्त केजरीवाल वीजबिल माफ करतील, तुमच्या मुलांना शिक्षण देतील आणि तुम्हाला दगडांऐवजी फुले देतील, अशी मुक्ताफळेही मोफत वाटप योजनेच्या प्रणेत्यांनी उधळली. ‘आप’ हा सभ्य, देशभक्त आणि प्रामाणिक लोकांचा पक्ष असून मी एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि तुमच्यासाठी शाळा बांधणार आहे. जर तुम्हाला इतरांचा गैरवापर करायचा असेल, तर त्यांच्यासोबत जा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. केजरीवालांनी निवडणुकीच्या तोंडावर सहानुभूती मिळवण्यासाठी भले कुंभाड रचले असेल तरीही सुरत पोलिसांनी मात्र त्याचा भांडाफोड केल्याने केजरीवाल पुन्हा एकदा तोंडावर आपटले....

त्यासाठी राहुलच पुरेसे!


महाराष्ट्रात वादात सापडलेली ‘भारत जोडो’ यात्रा नुकतीच मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये पोहोचली. यावेळी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल करत भाजप माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याचा आरोप केला. भाजपवर टीका करताना राहुल म्हणाले की, “भाजपने माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी हजारो कोटी खर्च केले. परंतु, त्याचा मला फायदाच झाला. सत्य लपवता येत नाही. जर तुम्ही मोठ्या शक्तीशी लढत असाल तर वैयक्तिक हल्ले होतील. जर हे हल्ले होत असतील, तर मला असे वाटते की मी योग्य ते करत आहे. ज्यांनी काँग्रेस सोडली त्यांना पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार का, यावर त्यांनी पैशाने विकत घेतलेल्या लोकांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. अमेठीतून निवडणूक लढवणार का, या प्रश्नावरही त्यांनी गुळमुळीत उत्तर दिले. निवडणूक लढवेन की नाही याचे उत्तर एक ते दीड वर्षांनंतरच मिळेल. सध्या माझे लक्ष ‘भारत जोडो’ यात्रेवर असल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील सुप्त संघर्षावरही त्यांनी बोलणे टाळत वेळ मारून नेली. मुळात राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन बनवण्यासाठी भाजप जबाबदार आहे हे बोलणे हास्यास्पद ठरेल. कळस म्हणजे, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, असे म्हणणे म्हणजे कहरच आहे. जी व्यक्ती स्वतःच स्वतःची प्रतिमा मलिन करून घेण्यास सक्षम आहे, त्यांना मलिन करण्यासाठी भाजप स्वतःहून आणखी प्रयत्न कशाला करेल? अगदी संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असतानाही राहुल गांधींनी काँग्रेसला नेहमीच अडचणीत आणण्याचे काम केले. मनमोहन सिंग यांचा भर पत्रकार परिषदेत अपमान करणारे राहुलच होते. राहुल यांच्या नाकर्तेपणामुळे अनेक सच्चे काँग्रेसी पक्ष सोडून गेले. सतत बेताल वक्तव्यांनी राहुल स्वतः बदनाम झाले. ‘चौकीदार चौर हैं’ ही घोषणा तर त्यांच्या चांगलीच अंगलट आली. संसदेत डोळे मिचकावणे असो वा विनाकारण मोदींना मिठ्या मारणं असो, प्रत्येक वेळी माती कुणी खाल्ली हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजप पुरेसे नाही. त्यासाठी एकटे राहुल गांधी स्वतःच पुरेसे आहेत!





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.