विक्रमवीर ‘बर्ड मॅन’ची पक्षिसंवर्धन भरारी...

    07-Oct-2022
Total Views | 83
 
बर्ड मॅन
 
 
 
पक्षिसंवर्धनाच्या कामातून पुण्यही मिळावे, या उद्देशाने नाशिकच्या हरेश शाह यांनी व्यवसायालाच पक्षिसंवर्धनाचे कोंदण दिले. तेव्हा, आज वन्य पशू दिनाच्या निमित्ताने अशा या विक्रमवीर ‘बर्ड मॅन’च्या भरारीविषयी...
 
 
हरेश शाह नाशिक येथील पिंपळगाव बसवंत गावी स्थिरावले आणि त्यापुढील 15 वर्षे त्यांनी एका सराफा पेढीत नोकरीही केली. ते ज्या ठिकाणी नोेकरी करायचे, तिथे त्यांची एक गोशाळा होती. त्या गोशाळेचा मासिक खर्च होता 35 ते 40 हजार. तो खर्च स्वत: मालक करत असे. हे बघून आपणही समाजोपयोगी पुण्यकाम केले पाहिजे, असे हरेश शाह यांना वाटे. याच जाणिवेतून त्यांनी आपले धर्मगुरू ‘पद्मभूषण’ आचार्य विजयरत्न सुंदर सुरीश्वरजी महाराज यांना भेटून पुण्यकाम करता येईल आणि चरितार्थही चालवता येेईल, असा व्यवसाय गुरूदेवांनी सुचवावा,’ अशी विनंती त्यांनी केली.
 
 
तेव्हा त्यांच्या गुरूंनी सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा दिली आणि सांगितले की, “तुझ्या हातून असेच भूतदयेचे कार्य होईल.” गुरूंचे आशीर्वचन घेऊन हरेश शाह यांनी पक्षिसंवर्धनासाठी ‘बर्ड फिडर’, ‘वॉटर फिडर’, कृत्रिम चिमणी घरटे तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बाहेरच्या देशातील ‘बर्ड फिडर’ही पाहिले. ते तयार करुन त्याचाच व्यवसाय करावा आणि पक्षिसंवर्धनाचे कार्यही आपल्या हातून घडावे, असे हरेशभाईंना वाटले. त्यासाठी त्यांचे मित्र शकील खान यांनी त्यावर अभ्यास करण्यास सुरुवात केली. ‘पक्षी फिडर’चा पहिला ‘डाय’ तयार करण्यासाठी महावीर चोपडा यांनी त्यांना आर्थिक मदत केली. त्यानंतर त्या उत्पादनाची जाहिरात, ‘मार्केटिंग’ही केले. पक्षिप्रेमींनाही या नव्या उत्पादनाची माहिती मिळावी म्हणून आपल्या गोशाळेतच 300 ‘फिडर’ बसवले. काही दिवसांतच गोशाळेत येणार्‍यांकडून ‘फिडर’साठी मोठी मागणी येऊ लागली. हरेशभाई आपल्या मालकाच्या दुकानातून ‘फिडर’ घेत आणि त्याची पुनर्विक्री करत यातून ‘फिडर’ विक्रीच्या व्यवसायात त्यांचा चांगलाच जम बसवला.
 
 
‘जागतिक चिमणी दिवस’ दरवर्षी दि. 20 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून शाह आणि त्यांचा मित्रपरिवार तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालये, पोलीस स्थानकांना भेटी देत पक्षिसंवर्धनाबद्दल जनजागृती करतो. कृत्रिम घरटे, ‘बर्ड फिडर’, ‘वॉटर फिडर’ याविषयी त्यांनी व्याख्यानांचेही आयोजन केले. भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणी व्याख्यानानंतर ‘धान्य फिडर’, ‘वॉटर फिडर’ आणि पक्ष्यांची कृत्रिम घरटी मोफतही लावून दिली. इतकेच नव्हे, तर विविध संस्थांना दीड ते दोन लाख रुपयांचा कच्चा माल, मटेरियल असे उत्पादन करण्यासाठी आवश्यक त्या सामग्रीचे अगदी मोफत वाटपही शहा यांच्या संस्थेतर्फे केले जाते. याच विषयावर दरवर्षी संस्थेतर्फे विविध संस्थांना मोफत प्रशिक्षणही दिले जाते. टाकाऊतून टिकाऊ घरगुती ‘बर्ड फिडर’ आणि पक्षी घरटे तयार करण्याचेही प्रशिक्षण दिले जाते. ‘आमी जीवदया फाऊंडेशन’ची स्थापना करुन हरेश शाह नियमितपणे पक्षिसंवर्धनासाठी व्याख्याने, कार्यशाळा आयोजित करुन विद्यार्थ्यांना पक्षिसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात अग्रेसर आहे.
 
 
पक्षिसंवर्धन आणि निसर्गाचे जतन करण्यासाठी हरेश शाह यांनी जगातील सर्वात मोठ्या ‘बर्ड फिडर’ची निर्मिती केली. नुकतीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडून त्याची नोंदही घेण्यात आली. 400 किलो वजनाच्या या महाकाय फिडरची धान्य क्षमता 700 किलो असून त्या फिडरमधून एकाच वेळी तब्बल 108 पक्षी एकाच वेळी अन्न खाऊ शकतात.
 
 
अशा या हरेश शाह यांच्या ‘फिडर’ला आणि कृत्रिम घरट्याला देशासह परदेशातून मोठी मागणी आहे. आजवर शहा यांनी दहा लाखांपेक्षाही जास्त ‘फिडर’चे वितरण केले आहे. त्यातली कमीत कमी 25 टक्के उत्पादने ते आजही मोफत वाटप करून पक्षिसंवर्धनाचे अनमोल कार्य करत आहेत.
 
 
ते म्हणतात की, “आजही पक्ष्यांना जेव्हा दाणा खाताना मी बघतो, तेव्हा मला तोच आनंद होतो, जो पहिल्यांदा माझ्या ‘फिडर’मधून दाणा खाणार्‍या पक्ष्याला बघताना झाला होता.” ते पुढे सांगतात की, “मला अभिमान आणि आनंद आहे की, माझ्या या कामामुळे आमच्या परिसरात चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. जिथे अगोदर जिथे 10-20 चिमण्या दिसणेही कठीण होते, त्याच भागात आज हजारो चिमण्या धान्य खाण्यास येतात.”
 
 
हरेश शाह यांना गावातील लोक आता ‘बर्ड मॅन’ म्हणूनच ओळखतात. व्यवसाय करणारे बरेच, पण स्वार्थ आणि परमार्थ साधून शाह यांच्याप्रमाणे व्यवसाय करणारे मात्र विरळेच. कुणाचेही तळतळाट न लागता करता येणारा एकमेव व्यवसाय म्हणजे पक्ष्यांसाठी निवारा आणि दाणा-पाण्याची सोय करणे असे सांगायलाही हरेश शाह विसरत नाहीत. पक्षिमित्र, ‘बर्ड मॅन’ हरेश शाह येत्या काही दिवसांत चिमण्यांसाठी ‘परमा कल्चर’चा प्रकल्प हाती घेणार असून हजारो चिमण्यांसाठी कृत्रिम घरट्यांद्वारे निवार्‍यांची सोय करुन चिमणी संवर्धनाचा जागतिक विक्रम करण्याच्या तयारीलाही ते लागले आहेत. हरेश शहा यांच्या पक्षिसंवर्धन आणि निसर्ग संरक्षणाच्या या कार्याला गरुड पक्ष्यासारखी उंचच उंच भरारी मिळावी आणि त्यांचे कार्य जगभर पोहोचवावे, यासाठी दै. ’मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांना खूप शुभेच्छा...!
 
 
 -निल कुलकर्णी
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121