बदलत्या आसामचे अभिनंदन!

    29-Oct-2022   
Total Views |
 
आसाम
 
 
 
 
 
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे 40 बंडखोर आमदार यामुळे गुवाहाटी आणि आसाम राज्य अगदी चर्चेतआले. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सोबती आसामलाच का गेले? असे प्रश्न विचारणार्‍यांना आसाम खूपच निसर्गरम्य आहे आणि तुम्हीसुद्धा आसामला भेट द्या, असे म्हणणारे आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा हेसुद्धा चर्चेचा विषय ठरले. पूर्वी ईशान्य भारतातील आसामची ‘अशांत राज्य’ म्हणून ओळख होती, ती ओळख पुसून ‘सुरक्षित विकास साधणारे राज्य’ अशी आसामची प्रतिमा निर्माण झाली. ती कशी निर्माण झाली? याचा मागोवा घेत नुकत्याच आसाममध्ये घडलेल्या घटनांचाही मागोवा या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे. खरेच बदलत्या आसामचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे.
 
 
 
दि. 26 ऑक्टोबर रोजी हन्ना मिकाएला ब्लूम, मार्कस अर्ने हेनरिक ब्लूम और सुज़ाना एलिज़ाबेथ हाकानासन या तीन स्विडीश नागरिकांना आसाम पोलिसांनी अटक केली. तिघांवरही कारवाई करत त्यांना न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने त्यांना दंड आकारात तत्काळ स्विडनला परत जाण्याचे फर्मान सुनावले. ‘टुरिस्ट व्हिसा’अंतर्गत ते भारतात आसामला आले. मात्र, आसाममध्ये आल्यावर त्यांनी ख्रिश्चन मिशनरीसदृश्य कारवायांना सुरुवात केली. ‘युनायटेड चर्च फेलोशिप’ आणि ‘ब्लेस आसाम मिशन नेटवर्क’ने आसामच्या नाहरकटिया परिसरात दि. 25 ते 27 ऑक्टोबर या दोन दिवसांमध्ये शांती आणि उपचार प्रार्थना महोत्सव आयोजित केला होता. हे तिघे स्विडीश नागरिक या महोत्सवामध्ये सामील झाले. भारतीय कायद्यानुसार, परदेशातील नागरिक अशा कार्यक्रमात केवळ ‘मिशनरी व्हिसा’ असेल तरच सहभागी होऊ शकतात. भारतात मिशनरींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये परदेशी नागरिकांना सहभागी व्हायचे असेल, तर त्यासाठी ‘टुरिस्ट व्हिसा’चा वापर करणे हा गुन्हा आहे. हा अपराध या तिघांनी केला होता.
 
 
 
 
‘मिशनरी व्हिसा’अंतर्गत आलेल्या परदेशी नागरिकांना आसाम राज्य सरकारकडे तशी रीतसर नोंदही करावी लागते. मात्र, या तिघांनी तसे केले नाही. दि. 26 ऑक्टोबर रोजी ही घटना घडते ना घडते, तोच पुन्हा दि. 28 ऑक्टोबर रोजी आसामच्या काझीरंगा नॅशनल पार्क जवळून सात जर्मन नागरिकांना अटक करण्यात आली. क्रिस्टीयन रैझर, मायकल एरीच शपर, मर्टन अस्मस, कॉरनेलिया वॉन ओनॅम्ब, हिनरीच ऑनॅम्ब, ख्रिस्ता ऑलेरीअस, लिसा बोलेम असे हे सात जण. हेसुद्धा ‘टुरिस्ट व्हिसा’अंतर्गत दि. 21 ऑक्टोबर रोजी भारतात आले. त्यांच्यासोबत झारखंडचा मुकूट बोरडा हासुद्धा होता. हे सगळेजण आसाममध्ये विविध ठिकाणी चर्चने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सामील झाले. हे सर्व कार्यक्रम आसाममधील चहा मळ्यात काम करणार्‍या कारबी वनवासी गटातील लोकांसाठी आयोजित करण्यात आले होते. दि. 26 ऑक्टोबर रोजी स्विडीश नागरिक ज्या ठिकाणी ख्रिस्ती चंगाई सभेला हजर होते, ते ठिकाणही चहा मळ्यात काम करणार्‍या वनवासी समुदायाच्या परिसरातलेच होते, हे विशेष!
 
 
 
या दोन घटनांमध्ये बरेच साम्य आहे. जसे ‘टुरिस्ट व्हिसा’वर पाश्चात्त्य देशातले लोक आसामच्या त्याच भागात गेले, ज्या भागात चहाच्या मळ्यांवर काम करणारा वनवासी समाज गट राहतो. ख्रिस्ती प्रार्थना आणि त्या पंथावर आधारीत भाषण, असेच या कार्यक्रमांचे स्वरूप होते. शांती आणि उपचार प्रार्थना असणे हे वर सांगितलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. आता नेमके हे काय असते? तर आशीर्वचन पाणी म्हणजे येशूची प्रार्थना करून आशीर्वाद घेतलेले पाणी पिऊन दुर्धर रोगी बरा होऊ शकतो, अपंग चालू शकतो, अंध बघू शकतो वगैरे वगैरे... हे खरे असते का? असो, तर अशा चंगाई सभा आसाममध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आणि त्या सभांना हे तीन स्विडीश आणि ते सात जर्मन नागरिक सहभागी झाले होते. स्विडन किंवा जर्मनी हे दोन्ही देश ख्रिस्तीबहुल. त्यामुळे या जर्मन किंवा स्विडीश नागरिकांना भारतातच चर्चसंस्थेची चंगाई सभा अनुभवायला मिळणार होती, असेही नाही. मग या सभेला हजर राहायचे त्यांचे प्रयोजन काय होते? एकंदर मागोवा घेतला तर जाणवते की, आजही आपल्या देशातील दुर्गम भागात विदेशी नागरिक त्यांची तथाकथित संपन्नता याबद्दल खूप आदर आणि आश्चर्य आहे. विदेशी नागरिक आले की त्यांना पाहायला लोक जमतात. आसामचा दुर्गम भागही याला अपवाद नाही. ज्यांचे विश्व केवळ चहाचा मळाच आहे, असे चहा मळ्यात काम करणारे गरीब अल्पशिक्षित मजदूर. या मजदुरांसमोर हे विदेशी संपन्न नागरिक त्यांच्यातलेच एक होण्याचा दिखावा करत ‘येशूची कृपा झाली, तर तुम्हीही आमच्यासारखेच व्हाल’ असे म्हणत असतील, तर या मजदुरांची प्रतिक्रिया काय असेल? हे काय वेगळे सांगायला हवे का?
 
 
 
 
तर... याच कारणासाठी हे सगळे विदेशी नागरिक ‘टुरिस्ट व्हिसा’च्या मुखवट्याआड भारतात येऊन हे असले उद्योग करत असावेत. कारण, जसे काही लोक ‘जिहाद’ विसरले नाहीत, तसेच पाश्चात्त्य देशातले काही धर्मांध धर्मांतरांचे ‘क्रुसेड’ही विसरलेले नाहीत. आसाममध्ये तर गेले शतकभर ‘जिहाद’सोबतच ‘क्रुसेड’चाही प्रश्न मोठा आहे. याचे उदाहरणच द्यायचे तर दि. 26 ऑक्टोबर रोजी त्या तीन स्विडीश नागरिकांना पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्या चंगाई सभेला जमलेल्या लोकांनी पोलीस स्टेशनला गराडा घातला. आंदोलन करत तिन्ही स्विडीश नागरिकांना तत्काळ सोडा, अशी मागणी केली. हे तीनही परदेशी नागरिक भारतीय कायद्याचे उल्लंघन करत होते, याबद्दल या आंदोलकांना काहीही देणेघेणे नव्हते. देशातील कायदा-सुव्यवस्थेपेक्षा या आंदोलकांना विदेशी नागरिकांचा पुळका आला. आपल्या देशापेक्षा, देशाच्या कायद्यापेक्षा स्वपंथाच्या विदेशी नागरिकाबद्दल निष्ठा वाटणे, हे देशासाठी कधीही घातकच म्हणा!
 
 
 
 
असो. आसामी नागरिकांचे म्हणणे आहे की, 2014 पासून म्हणजेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आणि आता हिंमता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आसाममध्ये ‘जिहाद’ आणि ‘क्रुसेड’ यांना जरा वचक बसला आहे. गेल्या काही दशकांमध्ये आसाममधील 40 विधानसभा मतदारसंघ हे मुस्लीम मतदार बहुल झाले आहेत. विशेष म्हणजे, या 40 ठिकाणी काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी पक्षच राजकीय निवडणुका जिंकत आहेत आणि उमेदवारही मुस्लीमधर्मीयच आहेत. काँग्रेस जिंकते किंवा निवडून येणारे मुस्लीमधर्मीय आहेत, यावर आक्षेप नाही, तर या भागातली मुस्लीम लोकसंख्या एक-दोन दशकामंध्ये दुप्पट-तिप्पट कशी झाली? हे मात्र आश्चर्य आहे. ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट’ अर्थात ‘एआययुडीएफ’चाप्रमुख खासदार बदरुद्दीन अजमल याचा या क्षेत्रामध्ये बराच प्रभाव आहे. अफाट पैसे असलेला बदरुद्दीन काही काळ मुंबईतही होता. त्याला आसामचे बहुसंख्य मुसलमान धार्मिक नेताही मानतात. ‘भाजपने कितीही कायदे केले तरी मुसलमान मूलं पैदा करतीलच’ तसेच ‘आसाममध्ये एक जरी जागा भाजपने जिंकली तरी आसामच्या मुसलमानांना अल्ला माफ करणार नाही,’ असे विचार बदरुद्दीनने मांडलेले आहेत. ‘सीएए’ आणि ‘तिहेरी तलाक’चाही त्याने कडाडून विरोध केला. आसामचे सगळे मुस्लीम एकत्रित करण्याचा आणि त्याद्वारे सत्ता हस्तगत करण्याची बदरुद्दीनची इच्छा होती. मात्र, त्याच्या या इच्छेला भारतीय जनता पार्टीचे आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी सुरूंग लावला. त्यांनी आसाममधील मुस्लिमांची दोन गटात विभागणी केली. एक स्वदेशी मुसलमान त्यांना ‘खिलोंजिया मुसलमान’ असेही म्हणतात. ‘खिलोंजियां’ची पाच गटात विभागणी केली. ती म्हणजे ‘गोरिया’ आणि ‘मोरिया’ (आसामच्या वरच्या भागातले), देशी (आसामच्या खालच्या भागातले)आणि ‘जुल्हा मुस्लीम’ (चहा मळ्यात काम करणारे), तर दुसरा गट मिया मुसलमानांचा.
 
 
 
 
आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना ‘मिया मुसलमान’ म्हणतात. हिंमता सरकारने 40 लाख खिलौंजी मुसलमानांच्या उत्थानासाठी, विकासासाठी योजना कार्यान्वित केल्या. खिलौंजी मुसलमानांना सरकारने शेतीसाठी जमिनी आणि अवजारे, मच्छीमारीसाठी अवजार, पशुपालनसाठी संबंधित मदत दिली. त्याचबरोबर मिया मुसलमानांकडून त्यांच्या अधिनिवासाचे कागदपत्र मागितलेे. जे अवैध होते, त्यांचे मूळ शोधून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची कायदेशीर तरतूदही केली. त्यामुळे बांगलादेशाच्या घुसखोर मुसलमानांवरच हिंमतांचे भाजप सरकार कारवाई करते आणि भारतीय मुसलमानांना मदत करते, असे आसाममध्ये वातावरण निर्माण झाले. त्यामुळे साहजिकच खिलौंजी आणि मिया मुसलमानांमध्ये दुरावा निर्माण झाला. ‘भारतीय विरूद्ध बांगलादेशी मुसलमान’ असे वातावरण आसाममध्ये तयार झाले. या सगळ्यांमुळे बदरुद्दीनचे एकसंघ मुस्लीम आणि त्याद्वारे आसामवर सत्ता हे स्वप्न भंग पावले. त्यामुळेच की काय, मदरसा नकोत तर डॉक्टर- इंजिनिअर बनवणार्‍या शाळा हव्यात किंवा मुस्लीम मुलीबाळींना ‘हिजाब’ नव्हे, तर शिक्षण हवे, असे म्हणणार्‍या हिंमता सरकारविरोधात आसामचा मुस्लीम अजिबात आक्रमक झाला नाही.
 
 
 
‘मिया मुसलमानां’चा विषय निघालाच आहे, तर आसामच्या गोलपारा जिल्ह्यातले दपकाभिता या गावतल्या मिया संग्रहालयाची चित्तरकथा सांगायलाच हवी. आसाममधील मिया परिषदेने गोलपारामध्ये मिया संग्राहालय उघडले. यामध्ये बांगलादेशी मुसलमानांची अस्मिता आणि आठवण म्हणून काही साहित्य ठेवले गेले होते. त्यामध्ये मासेमारीचे जाळे, नांगर आणि लुंगी या वस्तू होत्या. मात्र, उद्घाटन झाल्यानंतर दोनच दिवसांत या संग्रहालयाला प्रशासनाने टाळे ठोकले. कारण, ‘प्रधानमंत्री आवास योजने’त मंजूर झालेल्या घरात हे संग्रहालय उघडले होते. पोलीस प्रशासनाने या घटनेचा मागोवा घेतल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. ‘मिया परिषदे’चा अध्यक्ष मोहर अली, संघटन महासचिव अब्दुल बातेन शेख आणि या संग्रहालयाचे उद्घाटन करणारा तनु धादुमिया (आम आदमी पक्षाचा स्थानिक नेता) या तिघांचा ‘अल कायदा’ (एक्युआयएस) भारतीय उपमहाद्वीप आणि ‘अन्सारुल बांगला टीम’ (एबीटी) यांच्याशी संबंध आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले. या घटनेवर मत व्यक्त करताना मुख्यमंत्री हिंमता म्हणाले, ”मिया संग्रहालयाचे आसाममध्ये काय काम?तसेच, मासे पकडायचे जाळे किंवा नांगर हे तर हजारो वर्षे आपले आसामी वापरतातच. मग ते मियांची अस्मिता कशी काय झाले? हो, लुंगी मात्र फक्त त्यांचीच आहे.”
 
 
 
 
अर्थात, हिंमता यांच्या वक्तव्यामध्ये असत्य काही नव्हतेच. तसेही हिंमता तर्कशुद्धच बोलतात आणि कारवाई करतात. त्यामुळेच अनधिकृत मदरसे तोडणे किंवा ज्या शाळांमध्ये दहावीचा एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही, त्यांची मान्यता रद्द करणे किंवा नबीच्या काळात ‘लाऊडस्पिकर’ नव्हते, त्यामुळे ‘लाऊडस्पिकर’ला प्रार्थनास्थळांमध्ये मान्यता देणे हे धार्मिक नाही, असे म्हणणे यावर आसाममध्ये हिंमतांना प्रतिप्रश्न करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. उलट आता वातावरण असे आहे की, आसामच्या मुसलमानांचा स्वयंघोषित मसिहा असलेल्या बदरुद्दीनने नुकतेच म्हंटले की, ”हिंमता सरकारने ज्या मदरशांमध्ये दहशतवादी हालचाली होत असतील, त्यांच्यावर अवश्य कारवाई करावी, जे यात सहभागी असतील त्यांना गोळ्या घालाव्यात.” बदरुद्दीनला ही उपरती काय उगीच झाली का? तर नाही! भारतीय जनता पक्षाचे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि हिंमता बिस्वा सरमा यांच्या धडक कारवायांनी आसामचा हिंदू जागा झाला. त्यासोबतच तिथल्या मूळच्या हिंदूच असलेल्या, पण नंतर मुसलमान झालेल्या मुसलमानांनाही आपण प्रथम भारतीय आहोत याची जाणीव गरजेतून का होईना, पण झाली. त्यामुळे आसाम बदलला. त्यामुळेच बदरुद्दीन आणि त्याच्यासारखेच कट्टरपंथी बदलले आणि हो त्यामुळेच ‘टुरिस्ट व्हिसा’आड धर्मांतर अन् मतांतर करणारेही कसे भारतात पोहोचतात, हे कधी नव्हे ते लोकांसमोर आले. बदलत्या आसामचे अभिनंदन!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.