येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपली दुसरी परीक्षा! जोमाने तयारीला लागा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन
23-May-2025
Total Views | 15
सांगली : येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपली दुसरी परीक्षा आहे. त्यासाठी जोमाने तयारीला लागा, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे रणशिंग फुंकले. शुक्रवार, २३ मे रोजी सांगली येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यातआला होता. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "यावेळीच्या विधानसभा निवडणूकीत सांगली जिल्ह्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने भाजपला प्रचंड यश मिळाले. आता येत्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आपली दुसरी परीक्षा येणार आहे. त्यावेळी जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुका होतील. एक ते दीड महिन्यात सगळ्या निवडणुका आटोपतील. कदाचित जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणूक एकत्र होईल. मागच्या काळात सांगली जिल्ह्याने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद जिंकली. मध्यंतरीच्या काळात निवडणूकाच न झाल्याने काही अडचणी आल्या."
"लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे ते यश मिळू शकले नाही. पण त्यामागची कारणे जाणून घेऊनच आपण विधानसभेची तयारी केली आणि आपण काय करू शकतो हे आपल्याला पाहायला मिळाले. निवडणूकांच्या दृष्टीने आपणही तयारी सुरु केली पाहिजे. आपल्याला पूर्ण ताकदीने या निवडणूका लढल्या पाहिजे. जिथे जिथे तुम्ही जिंकाल तिथे मी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही," असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले.