"रोज खोटे बोलले की..."; राहुल गांधींच्या आक्षेपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

    07-Jun-2025
Total Views |
 
Devendra Fadanvis & Rahul Gandhi
 
नागपूर : रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात, असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. राहुल गांधींनी विधानसभा निवडणूकांवर घेतलेल्या आक्षेपावर त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
 
नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "रोज खोटे बोलले की, लोकांना खरे वाटते असे राहुल गांधींना वाटत असल्यामुळे ते सातत्याने त्याच त्या गोष्टी बोलतात. यापूर्वीसुद्धा हा आरोप त्यांनी लावला आणि निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणूकीत किती मतदार वाढले, आता किती वाढले हे सगळे सप्रमाण दिले. पण राहुल गांधींना रोज खोटे बोलण्याची सवय लागली असून ते स्वत: च्या मनाला समजावत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी सत्य स्विकारणार नाहीत, जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलेही भवितव्य उरलेले नाही. राहुल गांधी स्वत:शी खोटे बोलून स्वत:ला दिलासा देण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा आणि आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान करत आहेत. त्यामुळे आता त्यांनी जागे व्हायला हवे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  उबाठा गट-मनसेच्या यूतीवर मंत्री बावनकुळेंची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले, "आम्हाला आणि आमच्या मतदारांना..."
 
विदर्भ पाणी परिषद!
 
"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषदेचे आयोजन केल्याबद्दल विद्यापीठाचे मी अभिनंदन करतो. याठिकाणी पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, उद्योगाकरिता असलेले पाणी, पुनर्वापर या पाण्याच्या संदर्भातील वेगवेगळ्या आयामांवर चर्चासत्र आयोजित होत आहेत. यासोबतच जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धासुद्धा होत आहेत. या परिषदेतून मंथन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचे एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहेत. यातून ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील त्यावर काम करण्यासाठी शासन तत्पर आहे. विद्यापीठाने अतिशय उत्तम काम केले असून याचा मोठा फायदा होईल," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.