रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी! जखमींचा जीव वाचवण्यास प्रथम प्राधान्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

    09-Jun-2025
Total Views |
 
Eknath Shinde
 
मुंबई : मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघाताची घटना दुर्दैवी असून जखमींचा जीव वाचवण्यास आमचे पहिले प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून समोर येईल, असे ते म्हणाले.
 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे. ही अतिशय दुःखदायक घटना आहे. रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून ये जा करतात. मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा येथील रुग्णालयांना दिले असून मी स्वतःदेखील डॉक्टरांशी बोललो आहे. रेल्वेमार्फत सदर दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून दुर्दैवी अपघाताचे नेमके कारण या चौकशीतून लगेच समोर येईल."
 
 
"या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना शासनाच्या माध्यमातून देय मदत करण्यात येईल. तसेच जखमींचा जीव वाचवण्याला आमचे प्राधान्य असून त्यांचे उपचार युद्धपातळीवर करण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी होईल आणि यात ज्या दोषींचे नाव पुढे येईल त्यांच्यावर कारवाई होईल. परंतू, सर्वात आधी जखमींचा जीव वाचवण्यास आम्ही प्राधान्य देणार आहोत," असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.