खासदार श्रीकांत शिंदे कळवा रुग्णालयात जखमींच्या भेटीला! म्हणाले, "लोकल सेवा वाढवल्यास..."

    09-Jun-2025
Total Views |
 
Shrikant Shinde
 
ठाणे : मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल अपघातात ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या घटनेतील जखमींना उपचारासाठी कळवा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांनी कळवा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली.
 
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, "अप लोकल आणि डाऊन लोकलमधून काही लोक ट्रेनच्या खाली पडले तर काही लोक ट्रेनच्या आतमध्ये पडले. त्यापैकी १० लोकांना कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एक रुग्ण मृत पावला होता. तर गंभीर जखमी झालेल्या दोन रुग्णांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही जणांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जवळपास ७ रुग्ण धोक्याच्या बाहेर आहेत. काही जणांचे ऑपरेशन करण्याची आवश्यकता आहे. या दुर्घटनेत एकूण ५ लोकांचा मृत्यू झाला आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
"मुंब्रा स्थानकादरम्यान असलेल्या वळणावर दोन ट्रेन जात असताना एकमेकांना घासून दोन्ही लोकल ट्रेनमधील प्रवाशी खाली पडले आणि हा अपघात घडला आहे. दोन्ही ट्रेनमधील प्रवाशी जखमी झाले आहेत. तर काही प्रवाशी ट्रेनच्या आतमध्ये पडल्याने जखमी झाले आहेत," असेही त्यांनी सांगितले.
 
सीएसटीपर्यंत पाचवी आणि सहावी लाईन व्हावी!
 
ते पुढे म्हणाले की, "लोक मोठ्या प्रमाणात कल्याण-कर्जतकडे राहायला गेले आहेत. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वेची उपलब्धता आवश्यक असून त्यासंदर्भात प्रवाशांकडून वारंवार मागणीसुद्धा होत असते. पाचवी, सहावी लाईन झाल्यानंतर ट्रेनच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. परंतू, अजून सीएसटीपर्यंतदेखील ही पाचवी आणि सहावी लाईन व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाचे काम सुरु आहे. ते झाल्यानंतर रेल्वे गाड्यांची संख्या वाढू शकते. तसेच कल्याणच्या पुढे असलेलल्या तिसऱ्या, चौथ्या लाईनचेही काम सुरु आहे," असे त्यांनी सांगितले.
 
दिवा-सीएसएमटी लोकल सुरु करावी!
 
"लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या रेल्वे मार्गावर जास्तीत जास्त रेल्वेगाड्या कशा होतील तसेच १२ डब्यांच्या गाड्या १५ डब्यांच्या कशा होतील याकडे लक्ष दिले पाहिजे. दिवा सीएसएमटी लोकल सुरु करावी, अशी मागणी आम्ही करतो आहोत. त्यामुळे एकंदरित या संपूर्ण मार्गावर लोकल सेवा वाढवायला हव्या. या सुविधा वाढल्यानंतर अपघाताची संख्या कमी होईल," असेही खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.