वनसेवेचा पाईक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2022   
Total Views |

kharale.jpg


देशसेवेच्या एका अंकावर पडदा पडल्यानंतर वनसेवेचे व्रत उचलून आयुष्याचा दुसरा अंक जगत असलेले वनरक्षक रमेश गणपत खरमाळे यांच्याविषयी...


माणसाने खांद्यावर बंदूक घेऊन देशेसेवेसाठी आपल्या जीवनातील १७ वर्षे वाहिली. सैन्यातील निवृत्तीनंतर या माणसाने सुकर आयुष्य न जगता, पर्यावरण संरक्षणाचे व्रत घेऊन वनसेवेत प्रवेश केला. निसर्गाकडून विनामूल्य मिळणार्‍या श्वासाची किंमत आता ‘कोविड’ काळात अमूल्य झाली आहे. म्हणूनच निसर्गाची सेवा करणे माझे दायित्व असल्याचे ते सांगतात. सह्याद्रीच्या दर्‍या- खोर्‍यांमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हा माणूस म्हणजे साक्षात देवदूतच! आता या माणसाने माळरान आणि त्यावर अधिवास करणार्‍या वन्यजीवांच्या संवर्धनाचा वसा घेतला आहे. त्यासाठी जुन्नरमध्ये ६० दिवसांत ७० चर खोदून जलसंधारणाबरोबरच वनसंपदा फुलवण्याचे काम केले आहे. ‘देशसेवा ते वनसेवा’ असा प्रेरणादायी प्रवास असणारा हा माणूस म्हणजे जुन्नरचे वनरक्षक रमेश खरमाळे.

 
खरमाळे यांचा जन्म दि.१३ नोव्हेंबर, १९७६ रोजी जुन्नर तालुक्यातील खोदड या गावी झाला. त्यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीची होती. मात्र, लहानपणापासूनच खरमाळे यांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी झाले. बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली. १९९५ साली खरमाळे सैन्यामध्ये भरती झाले. भारतीय सैन्यातील ‘मराठा लाईट इन्फन्ट्री’ बेळगावमध्ये त्यांची भरती झाली. यादरम्यान त्यांनी कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, अरूणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यात सेवा दिली. सैन्यातील काळात त्यांनी आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या काळात पर्यावरणाविषयीचे आकर्षणही त्यांना निर्माण झाले होते. १७ वर्षे देशसेवा करून हवालदार रँकमधून २०१२ मध्ये खरमाळे निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना आपले आयुष्य स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणून सहा महिने बँकेत नोकरी केली. मात्र, निसर्गाची आवड त्यांना सतत खुणावत होती. अशावेळी पोलीस विभागात भरती होण्याची संधी असतानाही खरमाळे हे वन विभागात रुजू झाले. २०१४ पासून खरमाळे जुन्नर वन विभागात वनरक्षक पदावर कार्यरत आहेत.
 

 
आपल्या आजवरच्या वनसेवेदरम्यान खरमाळे यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली आहेत. दर्‍या-खोर्‍यांमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी ते वन विभागात ओळखले जातात. जुन्नरच्या डोंगररांगांची इत्थंभूत माहिती असल्याने दरीत पडलेल्या किंवा अडकलेल्या लोकांना वाचवण्यामध्ये खरमाळे यांचा हातखंडा आहे. किल्ले हडसर पाहण्यासाठी आलेल्या पुण्याच्या १६ पर्यटकांची रात्रीच्या वेळी सुटका करण्यामध्ये त्यांचा प्रमुख सहभाग होता. या कार्यासाठी पुणे जिल्हा तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. २०१७ मध्ये रात्री कुकडी नदीच्या पुरात अडकलेल्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींना जीवदान देण्यात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. अशा कित्येक घटनांसह खरमाळेंनी वन्यजीवांना वाचवण्याचेही काम केले आहे.
 
 
 
वनसंवर्धनामध्ये खरमाळे यांचे उत्तम काम आहे. सोनावळे येथील शासकीय आश्रमशाळेत स्वखर्चाने ३५० वृक्षांची रोपे देऊन लागवड केली. लेण्याद्री ते हटकेश्वर ट्रेक दरम्यान २५ किलो बियांचे आव्हानांद्वारे रोपण केले. वरसबाईमाता आणि सोनावळे परिसरात वटवृक्ष स्टंप लावले. दुर्गादेवी आणि किल्ले जीवदान ते नाणेघाट दरम्यान बियांचे रोपण केले. जुन्नर तालुक्यातील सात किल्ले, लेणी, पुरातन वास्तू, घाट, मंदिरे आणि देवराई यांना प्लास्टिकमुक्त करण्यासाठी खरमाळे यांनी विविध ट्रेक आयोजित केले. या माध्यमातून पर्यटकांकडूनच स्वच्छता अभियान राबविले. २०२१ पर्यंत जुन्नर तालुक्यातील ४२ बारवांचे संशोधन आणि स्वच्छता अभियान राबवत, त्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. जलसंधारण करुन माळरानावरील वन आणि वन्यजीवन अबाधित ठेवण्यासाठी खरमाळे यांनी मोठे काम केले आहे. यासाठी जुन्नर तालुक्यातील धामणखेल डोंगर माथ्यावर सलग ६० दिवसांत ३०० तास आपल्या पत्नीसोबत काम केले. दोघांनी मिळून ७० जलशोषक समतल चर खोदून तयार केले. हे सर्व काम जवळपास ४१२ मीटरचे करत जमिनीत एका पावसात आठ लाख लीटर पाणी जिरेल एवढे वैयक्तिक श्रमदानातून योगदान दिले. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी हे कामआपल्या शासकीय सेवेचा वापर न करता केले.
 
 
 
सर्व क्षेत्रातील अशा उल्लेखनीय कामांसाठी खरमाळे यांना विविध संस्थांनी गौरविले आहे. २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत शिवजयंतीला रोखरक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन तत्कालीन शिक्षणमंत्रीविनोद तावडे आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ‘शिवनेरी भूषण’ शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले. ‘महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण बोर्ड’चा पुरस्कार आणि ‘माजी सैनिक विशेष गौरव’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. ’जगेन मायभू तुझ्यासाठी’ हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. देशसेवेच्या एका अंकावर पडदा पडल्यानंतर वनसेवेचे व्रत उचलून आयुष्याचा दुसरा अंक जगणार्‍या खरमाळे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@