कोरोनाचे ‘म्युटेशन्स’ संपणार तरी कधी? लसीकरण या ‘म्युटेशन्स’वर किती परिणामकारक आहे? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देणारा हा माहितीपूर्ण लेख.
मागील दोन वर्षांत ‘कोविड’शी झगडणार्या जगाची २०२२ची पहाटच निराशाजनक उगवली. २०२१च्या उत्तरार्धात ‘कोविड’ची लाट जगातील अनेक देशांतून संपत चाललेली असताना, ‘ओमिक्रॉन’ या कोरोना विषाणूच्या नवीन ‘म्युटेशन’मुळे (उत्परिवर्तन) पुन्हा एकदा जग बंदीच्या दिशेने वाटचाल करतेय की काय, अशी भीती निर्माण झाली. सुदैवाने आफ्रिकेतून आलेला ‘ओमिक्रॉन’ सुरुवातीला जेवढा संसर्गजन्य वाटत होता तेवढा तो निघाला नाही. पण, यामुळे सगळा धोका संपला असेही नाही. दक्षिण आफ्रिकेतून वेगाने वाटचाल करणार्या ‘ओमिक्रॉन’ने पहिला मोर्चा युरोपकडे वळवला. युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स आणि इतर मोठ्या युरोपियन देशांमध्ये दिवसाला लाखो रुग्णसंख्या नोंदवली गेली. पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या जवळपास चौपट रुग्णसंख्या या देशांमध्ये नोंदवली गेली. सुरुवातीला भारतमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढे ‘ओमिक्रॉन’चे असणारे रुग्ण आता लाखोंच्या घरात गेलेत. डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका, ब्रिटन आणि इतर देशांतून येणार्या माहितीवरून ‘ओमिक्रॉन’ या आधीच्या ‘डेल्टा’पेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. मात्र,कमी विषाणूजन्य म्हणजेच यामुळे होणारे मृत्यू ‘डेल्टा’ पेक्षाकमी आहेत, ही एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.
कोरोना विषाणूचे नवीन म्युटेश व व्हेरिएंट का तयार होत आहेत?
हा निसर्ग नियमच आहे, म्हणजेच कोणत्याही सजीवांचे निसर्गाशी समतोल राखून पुन्हा निसर्गाशी एकरूप होण्याची मोठी प्रक्रिया म्हणजेच ‘म्युटेशन’ किंवा ‘उत्परिवर्तन.’ हा नियम सर्वच सजीवांसाठी सारखा असतो. म्हणजेच मानव, सरपटणारे प्राणी, पशु-पक्षी, जलचर, वनस्पती आणि सरतेशेवटी विषाणू आणि जिवाणू हे सर्वच निसर्गामध्ये जसे बदल होत जातात, तसे स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. ही प्रक्रिया खूप मोठी आणि शेकडो-हजारो नव्हे, तर लाखो वर्षे चालू असते. असे बदल फक्त एका पिढीत होत नसतात, तर यासाठी पिढ्यान्पिढ्या जाव्या लागतात. उदाहरणच द्यायचे झाले तर महाराष्ट्रातील मराठवाड्यातील उष्ण भागात राहणार्या एखाद्या व्यक्तीला अचानक हिमालयामध्ये अतिथंड प्रदेशात राहायला पाठवले, तर त्याच्यासाठी ती अशक्यप्राय गोष्ट असते. तरीसुद्धा त्या व्यक्तीवर जर तिथे राहायचा प्रसंग आलाच, तर सुरुवातीला अनेक अडचणींवर मात करून ती व्यक्ती काही महिन्यांत किंवा वर्षांत त्या नवीन वातावरणाशी जुळवून घेतोच. कदाचित त्या व्यक्तीला ते जमले नाही, तर त्याची पुढची नवीन पिढी या वातावरणाशी जुळवून घेते. याच प्रकारे विषाणू आणि जिवाणूसुद्धा बदललेल्या वातावरणाशी स्वतःमध्ये बदल घडवून जुळवून घेतात आणि त्यांची पुढची पिढी आपोआपच जुळवून घेतात. बदललेल्या वेगवेगळ्या परिस्थितीला जुळवून घेताना विषाणू किंवा जिवाणू स्वतःमध्ये बदल घडवून आणतात. याच नैसर्गिक प्रकियेला ‘म्युटेशन’ म्हणतात. काही वेळेला ही प्रक्रिया दीर्घकालीन चालते, तर काही सजीवांच्या बाबतीत कमी वेळेत पार पडते. विषाणू हे सजीवही नाही आणि निर्जीवही नाही. पण, त्याच्याकडे स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता मात्र इतर सजीवांपेक्षा अधिक आहे आणि इतर विषाणूपेक्षा कोरोनाकडे ती अधिकच आहे. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूमध्ये जवळजवळ ६५ हजारांपेक्षा अधिक बदल म्हणजेच ‘म्युटेशन्स’ झालेली आहेत. पण, यामधील काहीच बदल मूळ कोरोना विषाणूपेक्षा अधिक संहारक ठरले. ऑक्टोबर २०२० मध्ये ब्रिटनमधून झालेले कोरोनाचे म्युटेशन (अल्फा) आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये भारतात झालेले कोरोनाचे म्युटेशन (डेल्टा) इतर सर्व ‘म्युटेशन’पेक्षा वेगळी जास्त संसर्गजन्य आणि संहारक होती. ‘ओमिक्रॉन’ हा ‘डेल्टा’मधून बदलून आलेला असून ‘डेल्टा’पेक्षा कितीतरी पटीने तो संसर्गजन्य मात्र कमी संहारक आहे.
हे थांबणार का आणि कधी?
कोरोना विषाणूचे नवनवीन होणारी ‘म्युटेशन्स’ थांबणार का? याचे उत्तर सध्या तरी ‘नाही’ असेच आहे. वर सांगितल्याप्रमाणे विषाणूत होणारी ‘म्युटेशन्स’ त्यामुळे तयार होणारे नवीन ‘व्हेरिएंट’ किंवा ‘स्ट्रेन्स’ ही निरंतन चालणारी प्रक्रिया आहे. ज्या वेगाने कोरोनाचा प्रसार झाला, त्याच वेगाने तो नाहीसा होणार नाही. कोरोना विषाणूमध्ये बदल होत राहतील. यापूर्वीचे काही बदल हे फारच कमी संसर्गजन्य तर काही अधिक होते. ‘ओमिक्रॉन’ हा बदलून आलेला विषाणू कमी संहारक असल्याने कदाचित जर त्याचा पुढचा नवीन ‘स्ट्रेन’ कमी संहारक आणि कमी संसर्गजन्यसुद्धा असू शकतो. या विषाणूची तीव्रता कमी होण्यामागे अजून एक सर्वात मोठे आहे महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे लसीकरण. ज्या वेगाने जगभरातील अनेक देशांमध्ये लसीकरण झाले, त्यामुळे विषाणूची तीव्रता कमी होत गेली. मानवी शरीरात गेल्यावर विषाणू मानवी प्रतिकारशक्तीविरुद्ध लढतो. या लढाईत काही वेळेला प्रतिकारशक्ती जिंकते आणि काही वेळेला विषाणू. विषाणूमध्ये जे काही बदल होत जातात, याला मानवी प्रतिकारशक्ती आणि औषधेसुद्धा कारणीभूत असतात, तर काही वेळेला लससुद्धा! काही वेळेला लसीमुळे तयार झालेल्या प्रतिकारशक्तींविरुद्ध विषाणू लढतो आणि त्यामधून नवीन ‘म्युटेशन’ तयार होते. अशा प्रकारचे ‘म्युटेशन’ तयार झाले, तर पुन्हा पुन्हा लसीकरण करावे लागते किंवा नवीन लसी शोधाव्या लागतात. उदाहरणार्थ, युरोप आणि अमेरिकेत थंडीच्या महिन्यात येणारा फ्लूचा ताप हा ‘इन्फ्लुएंझा’ या विषाणूमुळे होते. या विषाणूविरुद्ध अनेक वेळा लसी शोधण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणावर सार्वत्रिक लसीकरणसुद्धा केले गेले. तरीसुद्धा दरवर्षी हा विषाणू स्वतःमध्ये बदल घडवून पुन्हा लोकांना संसर्ग करतो. याचा मोठा धोका आजारी असणार्या वृद्ध लोकांना होतो. म्हणून या लोकांना दरवर्षी फ्लूची लस दिली जाते आणि ही लससुद्धा नवीन प्रकारे बदलून आणलेली असते. सुदैवाने अशा प्रकारची परिस्थिती कोरोना विषाणूच्या बाबतीत सध्या तरी झालेली नाही. सध्या लसीकरणात असलेल्या सर्वच लसी कोरोनाच्या आलेल्या सर्वच ‘म्युटेशन्स’वर परिणामकारक ठरल्या आहेत. लसीकरण होऊनही ‘कोविड’चे रुग्ण वाढत असले, तरी मृत्यूदर मात्र पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या तुलनेत कमी असून तो रुग्णसंख्या वेगाने वाढली तरी कमीच राहील, अशी सध्या तरी चिन्हे आहेत.
विषाणूची भविष्यातील येणारी नवीन ‘म्युटेशन्स’ थांबवता येतील का?
सध्या तरी हा प्रश्न अनुत्तरीच आहे. वर सांगितल्याप्रमाणे विषाणूचे ‘म्युटेशन’ होणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत हा विषाणू एका व्यक्तीतून दुसर्या व्यक्तीत संसर्गित होईल, त्याचप्रमाणे कमी वेळात लाखो लोकांमध्ये तो जर संसर्गित होत राहिला, तर त्याच्यामध्ये बदल घडून येण्याच्या शक्यता अधिक आहेत. त्यामुळेच जगभरातील सर्वच शास्त्रज्ञ सुरुवातीपासून सांगत होते की, विषाणूची साखळी रोखली पाहिजे, तरच आपण या महामारीवर नियंत्रण करू शकू. दुसरे म्हणजे, जरी विषाणूमध्ये ‘बदल’ ही निरंतर क्रिया असली, तरी ही क्रिया रोखण्यासाठी लस हीसुद्धा तेवढीच प्रभावशाली असते. पूर्वी पोलिओच्या विषाणूमध्ये असेच बदल होत होते, जगभरात लहान मुलांचे सार्वत्रिक लसीकरण करून या प्रक्रियेमध्ये खंड पाडता आला. कदाचित या वर्षाच्या मध्यापर्यंत आपणसुद्धा कोरोनाच्या विषाणूमधील होणार्या नवीन बदलांमध्ये खंड पाडू शकू. भारताचा विचार केला तर गेल्या संपूर्ण वर्षात सरकारी यंत्रणा आणि नागरिक यांच्या सहकार्याने आपण विश्वविक्रमी लसीकरण केले. या लसीकरणाचा फायदा आपल्याला येणार्या नजीकच्या काळात दिसून येईल किंवा तो सध्या दिसूनसुद्धा येत आहे.
सर्व ‘म्युटेशन्स’वर एकच लस निर्माण करता येईल का?
हा प्रश्न अनेक सर्वसामान्य लोकांच्या मनात आहे, कोरोनावरती एकच डोसची लस तयार का करत नाहीत किंवा ती करता येईल का? खरेतर अशा प्रकारच्या नवीन लसीची गरज लागणार नाही आणि ही तयार करणेसुद्धा सहज शक्य नाही. यासाठी आधी कोरोनामध्ये भविष्यात नक्की कोणते बदल होऊ शकतील, याची १०० टक्के खात्रीपूर्वक माहिती असणे गरजेचे आहे आणि सध्या तरी ते शक्य होताना दिसून येत नाही. अनेक देशांतील शास्त्रज्ञ यासाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहेत. पण, अजूनही त्यांच्या पदरी निराशाच लागली आहे. समजा, जर यामध्ये यश मिळाले तर सर्वसामावेशक एकच लस तयार होणे अवघड आहे. कारण, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज लागेल आणि तेही अनेक देशांना शक्य होणार नाही. पण, सध्या तरी अशा लसीची आवश्यकता नाही, ज्या लसी सध्या लसीकरणसाठी वापरल्या जात आहेत त्यामध्ये येणार्या भविष्यात थोडेफार बदल करून आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू, एवढा विश्वास जगातील सर्वच शास्त्रज्ञांना आणि डॉक्टरांना तसेच राज्यकर्त्यांना पण आला आहे.
(लेखक मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ असून मेडिकल सायन्स डिव्हिजन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड येथे कार्यरत आहेत.)