भारतीय मुसलमानांना आरसा दाखवणारे दलवाई

    25-Sep-2021
Total Views | 290

dalwai_1  H x W


‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे हमीद दलवाई यांचे पुस्तक प्रत्येक सुधारणा मतवादी माणसाकडे असावे, असेच आहे. या पुस्तकातील विचार आजही इतके समर्पक आहेत की, खरोखर राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करायचा असेल तर या पुस्तकात मांडलेले विचार डावलून चालणार नाही. इतकेच नाही, तर तथाकथित सेक्युलर यांना आपल्या जागी जखडून ठेवण्यासाठी या पुस्तकात मुबलक विचारधन आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

भारतीय मुसलमानांच्या मानसिकतेचे विवरण करताना हमीदजी अगदी प्रेषित महम्मद यांच्या वर्तनापासून विवेचन करतात. धार्मिक नेते कसे वेळोवेळी सोयीस्कर अर्थ लावतात, अगदी प्रेषित महम्मद यांच्याही कशा चुका झाल्या की, ज्यामुळे ही पुढील काळात धर्माच्या नावाने पिसाळलेली सत्तापिपासू जमात बोकाळली, हेही मांडताना हे पुस्तक कुठेही हात राखून शब्द वापरत नाही.“मुसलमानांच्या सगळ्याच धर्मश्रद्धा प्रेषितांच्या भोवती एकवटलेल्या आहेत. हे हास्यास्पद आहे. व्यक्तिपूजेचा हा एक विचित्र आविष्कार आहे. प्रेषित महम्मद थोर असले तरी ते मनुष्य होते आणि माणसातले गुणदोष त्यांच्यामध्ये असणे स्वाभाविक आहे (त्यांच्या स्वभावाचे कर्तृत्वाचे आणि दोषांचेही विवेचन का करता येऊ नये?)” असे लिहून त्या पुढे हे पुस्तक त्यांच्या जीवनातील काही घटनांचे गुणदोषासकट विवेचन करते. माझ्या मते, असे निखळ आत्मचिंतन इस्लाम सुधारणावादी विचारवंतांमध्ये अभावानेच दिसून येते, किंबहुना, दिसतच नाही. सर्व सुधारणावादी बोटचेपेपणा करत शब्द वापरतात ज्याचा समाजावर काहीही परिणाम होत नाही.

८०० वर्षे मुसलमान सत्ताधीश असून, इस्लामीकरण झाले नाही, असा भारत हा एकमेव देश. याची खंत भारतीय इस्लामवादी सतत ठेवून आहेत. त्यामुळे जोपर्यंत अल्पसंख्याक आहोत, तोपर्यंत हक्क मागत राहणे व अत्याचाराच्या वावड्या उठवत ठेवून सतत इस्लामवादी ज्योत पेटवत ठेवणे, असा या काही इस्लामवाद्यांचा प्रयत्न असतो. याचा प्रतिकार म्हणून हिंदुत्ववादी चळवळ उभी राहिली, असे परखडपणे मांडण्यास हमीदजी माग-पुढेे पाहत नाहीत.भारतातील इस्लामधार्जिण्या इतिहासकारांविषयी या पुस्तकात असेच खडे बोल आहेत. ते म्हणतात, या इतिहासकारांची पुस्तके वाचली, तर भारतातील प्रत्येक मुसलमानी राजवट गौतम बुद्ध यांच्या ‘धर्म सहिष्णू’ व आधुनिक काळातील नेहरूंच्या ‘धर्मनिरपेक्ष’ याच तत्त्वावर आधारित होत्या. मुसलमानधार्जिण्या लेखकांचे युक्तिवादाचे प्रकार ठरलेले आहेत. आधी ऐतिहासिक सत्य नाकारायचे, अधिकृत पुराव्यावर शंका उपस्थित करायची, सादर पुराव्याच्या खरेपणाविषयी वाद निर्माण करायचा आणि हे काहीच शक्य झाले नाही, तर पुरावा अपवादात्मक आहे व वस्तुस्थितीचा निदर्शक नाही, अशी भूमिका घ्यायची. अगदीच हे जमले नाही, तर काल्पनिक कारण सांगणारी बचावात्मक भूमिका घ्यायची. मात्र, एकही आक्षेप मान्य करायचा नाही.‘मुसलमान उदारमतवादी’ म्हणवणार्‍यांना ते एक महत्त्वाचा सल्ला या पुस्तकातून देतात. यासाठी ते हिंदू उदारमतवादी अनेक सुधारकांचा दाखलाही देतात. हिंदू समाजाने पहिल्यापासूनच ही आत्मटीका मान्य केली आहे. टीका योग्य वा अयोग्य हे महत्त्वाचे नसून, हिंदू मन अंतर्मुख होण्यास कसे सक्षम आहे, हे ते सांगतात. हिंदू समाज अशा टीकेतून दोष घालवण्याचा प्रयत्न करीत असतो, नव्हे दोष घालवण्याचा अट्टहास करीत असतो आणि हे केवळ चिकित्सक व निर्बंधमुक्त समाजाच करू शकतो.

इतर समाजातील या उदारमतवादी वातावरणाचा मुसलमान समाजाने आपल्या टोळीच्या राजकारणासाठीच उपयोग करून घेतला. मुसलमान लेखक स्वतःच्या धर्माची चिकित्सा करीत नाहीत व इतरांनी ती करू नये, अशी त्यांची अपेक्षा असते. याला एक मजेदार उदाहरण देत हमीदजी सांगतात की, “अशा लोकांचे म्हणणे आहे की, इतर धर्मांत त्या धर्मीयांनी स्वतःवर टीका केली असल्याने आपणही केली तर काही वावगे नाही, असे त्यांना वाटते. परंतु, इस्लामवर कोणी मुसलमानाने अजून टीका केली नसल्याने ते आम्ही करणे योग्य नाही, अशी भूमिका ते विचारवंत घेतात. हिंदू व मुसलमान व्यक्तींचे वेगवेगळ्या मोजमापाने मूल्यमापन करण्याचे एक तंत्र मुस्लीम जातीयवादी लोकांनी ठरवले आहे. या मोजमापाप्रमाणे कट्टर हिंदू माणूस जो धर्म निरपेक्ष आहे, तो जातीयवादी असतो व जातीयवादी मुसलमान हा मात्र धर्मनिरपेक्ष असतो.”पुस्तक पुढे वळण घेत मुसलमानांची धर्मयुद्धे, पाकिस्तानची चळवळ असे वळण घेत ‘भारतीय मुसलमान’ या विषयावर येते. मानसिकतेचे विवरण करताना ते हसन सुरवर्दी यांनी दि. १० सप्टेंबर, १९४७ रोजी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करतात. त्यात ते म्हणतात, “पाकिस्तानची मागणी अखेरची नसून सध्याची आहे.” याच प्रकरणात ते म्हणतात, “मुसलमान समाजाची ‘अल्पसंख्याक’ ही कल्पना इतर देशातल्या अल्पसंख्याक लोकांपेक्षा वेगळी आहे. आपण मुख्य प्रवाहात मिसळून जाणे त्यांना मान्य नाही, आत्मटीका मान्य नाही आणि प्रेषितकालीन स्थिती कायम ठेवण्याकडे या काही इस्लामवाद्यांचा कल आहे. समाजात सुधारक आवाज नाहीत. आत्मटीकेशिवाय समाज सुधारू शकत नाही आणि ती करण्याची कोणालाही हिंमत नाही. म्हणून काही लोक चांगले आहेत, सुधारणा व्हावी असे वाटते. पण, विचार वांझोटे आहेत.” ही दहशत किती आहे हे सांगण्यासाठी ते म्हणतात, “प्रचलित व्यवस्थेविरुद्ध नुसता ‘ब्र’ काढला तरी ती व्यक्ती समाजापासून अलिप्त पाडली जाते. त्याला गलिच्छ शिव्या ऐकाव्या लागतात. इतकेच नाही तर खुनी हल्ले होतात, चारित्र्य हनन केले जाते आणि जीवन जगणे कठीण होऊन जाते.”


पुढे हे पुस्तक हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्ववादावरही भाष्य करते. मुस्लीम समाजातील संकुचित धर्मवादाला आणि जातीयवादाला विरोध करणे, काही पाप होत नाही. प्रश्न विरोधाचे स्वरूप कोणते असावे, हा आहे. संकुचित प्रवृत्तीशी आमचा झगडा आहे. इथे ही मंडळी थांबत नाहीत, तर मुस्लीम परके आहेत, इथे त्याची मजल जाते. इथे लक्षात घेतले पाहिजे की, सुधारणेसाठी विरोध झालाच पाहिजे हे ते आवर्जून सांगतात. मात्र, यातील बरेच संदर्भ आज हिंदुत्वाला लागू नाहीत. वर म्हटल्याप्रमाणे त्या काळातील चुका दुरुस्त होऊन हिंदूधार्जिण्या राजकीय पक्षामध्येसुद्धा मोठे बदल घडले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे, इस्लामधार्जिण्या राजकीय पक्षांना पुस्तकातील सर्व संदर्भ आजही लागू होतात.समारोपाला आल्यावर हे पुस्तक कम्युनिस्ट पक्ष व विचारधारेवरही प्रकाशझोत टाकते. धर्मभावना भडकावणे आणि अहम् भावनेतून लोकांना एकाकी पाडणे, हा कम्युनिस्ट लोकांचा खेळ ते उत्तमपणे विस्तृत करतात. ‘कम्युनिझम’ हा आधुनिक काळातील इस्लाम आहे, असेही म्हणायला ते कमी करत नाहीत. ईश्वरविषयक कल्पना सोडली तर ‘इस्लाम प्रसारणवाद’ आणि ‘कम्युनिस्ट प्रसारणवाद’ यामध्ये खूपच साम्य आहे, असे ते म्हणतात. पाकिस्तानच्या फाळणीला कम्युनिस्ट लोकांचा सुरुवातीपासूनच पाठिंबा राहिला आहे. राष्ट्राचे छोटे-छोटे तुकडे करा आणि मग त्यांच्यातील मतभेदाचा फायदा घेत त्या लोकांवर राज्य करा, ही त्यांची नीती हमीदजी छान विशद करतात. अफगाणिस्तानातील अलीकडची परिस्थिती निर्माण झाल्यावर चीन कसा तिथे आकर्षित झाला, हे आताचे उदाहरण घेतले तरी पुस्तक आजही किती मार्गदर्शक आहे, याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

आज बरेच लेख आपण पाहतो की, जगात इस्लामची कशी कुचंबणा होत आहे वगैरे वगैरे. मात्र, आत्मचिंतन करणारा एकही लेख नाही. एक तरी जण हमीदजींइतका प्रामाणिक असला आणि ही सुधारणावादी ज्योत पेटवू शकला, तर भारताचेच नव्हे, तर एकूणच मुसलमान समाजाचे कल्याण होण्यास वेळ लागणार नाही.

संदीप वेलिंग



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121