कोरोना आणि ‘लॉकडाऊन’ यामुळे त्रस्त झालेल्या गरजू नागरिकांना ‘सॅनिटायझर’पासून ते अन्नधान्य पुरवण्यापर्यंत मदत करून समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना कोरोनाविरुद्ध लढ्यात साथ देणारे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महामंत्री मुकेश गावकर यांच्या कोरोना काळातील कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि राज्यामध्ये ‘लॉकडाऊन’ लागू झाल्याने अनेक हातावर पोट असणार्या मजूरवर्गासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा राहिला. ‘लॉकडाऊन’मध्ये सर्व जगाचा कारभारच जवळपास ठप्प झाल्यामुळे बर्याच कुटुंबांची तारांबळ उडाली. एकीकडे कोरोनाने नागरिकांचे प्राण जात होते, तर दुसरीकडे ‘लॉकडाऊन’मुळे छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्या हातांना काम मिळत नव्हते. अचानक आलेल्या या महामारीमुळे नागरिकांचे आर्थिक, सामाजिक, मानसिकरित्या चांगलेच खच्चीकरण झाले.
यामुळे सुरुवातीचे काही महिने नागरिकांना अतोनात हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र, कालांतराने या कुटुंबांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण आपापल्यापरीने लोकांची मदत करू लागले. यापैकीच एक महत्त्वाचे नाव म्हणजे मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील महामंत्री मुकेश विष्णू गावकर. त्यांनी नगरसेवक अतुल शाह यांच्या साथीने नागरिकांची मदत करण्याचा विडा उचलला. सुरुवातीला त्यांनी मास्क वाटप, ‘स्क्रीनिंग’, ‘कोविड’ चाचणी, गरजवंतांना मोफत अन्नधान्य वाटप तसेच प्रभागामधील सोसायट्यांचे ‘सॅनिटायझेशन’ असे विविध उपक्रम राबवत त्यांनी कोरोनाशी लढा देण्यास नागरिकांना मदत केली.
जेव्हा कोरोनाचा हा कहर सुरू झाला, तेव्हा देशामध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. यानंतर मुंबईमध्ये कोरोनाचे काही रुग्ण आढळून येऊ लागले. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रभाग क्र. २२० मध्ये पुढाकार घेतला आणि ते लोकांच्या मदतीसाठी पुढे आले. प्रथम त्यांनी विविध डॉक्टरांसोबत कोरोना आणि त्याबाबतीतील जनजागृतीसाठी पुढाकार घेतला. तसेच, अनेक भागांमध्ये ‘सॅनिटायझेशन’चेदेखील काम पाहिले. केवळ प्रभाग क्र. २२० नव्हे, तर इतर आजूबाजूच्या परिसरांमध्ये त्यांनी नागरिकांना गरजेच्या वस्तू पोहोचवण्याची व्यवस्था केली. प्रभागातील डॉक्टरांच्या मदतीने अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचार्यांसाठी लागणारे ‘पीपीई किट्स’, ‘ऑक्सिमीटर’ अशा काही महत्त्वाच्या गोष्टी पुरवण्याचे कामदेखील त्यांनी केले आहे. यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनीही प्रचंड मेहनत घेतली आणि कोरोनासारख्या विषाणूला प्रभागापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात अनेक असे व्यापारी आणि कामगार होते, ज्यांचे ‘लॉकडाऊन’मुळे प्रचंड हाल झाले. यावेळी सर्व नियमांचे पालन करून गावकर हे नागरिक आणि व्यापारी वर्गामधील दुवादेखील बनले. तसेच प्रभाग क्र. २२०, २१३ आणि २२३ या प्रभागांमधील काही गरजूंना अन्नधान्यांची पाकिटे पोहोचवण्यास मदत केली. जिल्हाधिकार्यांकडून येणार्या जेवणाच्या पाकिटांना गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचे कामदेखील ते पाहत होते. याव्यतिरिक्त कोरोनाशी लढायचे असेल, तर ‘मास्क’ हा प्रत्येक नागरिकाकडे असलाच पाहिजे. परंतु, सुरुवातीच्या काळात मास्कचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. अनेकांना मास्क मिळत नव्हते. यावेळी त्यांनी सामान्य नागरिक, व्यापारी तसेच रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी यांना मास्क वाटपही केले. यामुळे कोरोनासारख्या भयंकर व्याधीशी लढण्यास सामान्य नागरिकांना आणखी बळ मिळाले.
‘लॉकडाऊन’ लागल्यानंतर सुरुवातीच्या काळात नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली होती. यावेळेस सामान्य नागरिकांना भाजीपाला, तसेच किराणा सामान कसे उपलब्ध होणार, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. यावेळी सुरुवातीच्या काळात प्रभाग क्र. २२०, २१३ आणि २१६ या प्रभागांमध्ये गावकर यांनी किराणा सामान तसेच भाजीपालादेखील उपलब्ध करून दिला. युवा कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहात या सामाजिक कार्यात हातभार लावला. प्रभागातील तब्बल हजारो गरजू कुटुंबांना या सर्व सुविधांचा फायदा होईल, याचा विचार त्यांनी केला. सुरुवातीचे तीन-चार महिने सकाळ-संध्याकाळ त्यांनी अखंडित सेवा केली.
‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली, तरीही देशभरात कोरोनाची भीती अद्याप संपली नव्हती. यावेळी साधारण लक्षणे असलेल्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये, विलगीकरण कक्षात दाखल केले जाई लागले. अशावेळी मुकेश गावकर यांनी विलगीकरणात असलेल्या रुग्णांचीदेखील सेवा केली. एखाद्या कुटुंबामध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर विभागातील प्रशासकीय अधिकार्यांशी संपर्क करून त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी किंवा विलगीकरणासाठी मदत करणे, औषधे मिळवून देण्यासाठीची मदतदेखील त्यांनी केली. याचसोबत प्रभागातील शिधावाटप कार्यालयाच्या प्रक्रियेवरही ते लक्ष ठेवून होते. दारिद्य्ररेषेखालील गरजू नागरिकांना काही कमी पडत नाही ना? पडल्यास त्यांच्यासाठी शिधा मिळवून देण्याची जबाबदारीदेखील त्यांनी घेतली होती.
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक बाजारपेठच आहे. इथे हातगाडी चालवणारे, रोजगारावर अवलंबून असणारा सर्वाधिक वर्ग आहे. यांच्यासाठी सकाळ-संध्याकाळ जेवणाची व्यवस्था करणे, हे खूप महत्त्वाचे होते. अनेक बाजारपेठा बंद असल्याकारणाने दिवसाच्या कमाईवर अवलंबून असलेल्या या नागरिकांना ही मदत खूप मोलाची ठरली. तिथे राहणार्या अनेक नागरिकांनी त्यांचे आभारदेखील मानले.
नव्या निर्बंधांनुसार, एखाद्या इमारतीमध्ये रुग्ण आढळ्यास संपूर्ण इमारत ही ‘सील’ केली जात होती. अशावेळेस गावकर यांनी तेथील नागरिकांशी संपर्क साधून इमारतीमध्ये किती नागरिक वास्तव्यास आहेत, याची माहिती गोळा केली. त्यानुसार त्या इमारतींमध्ये सर्व नियमांचे पालन करत तांदूळ, मसाला, तेल अशा सात-आठ प्रकारच्या गरजेच्या वस्तूंचे एक पोते बनवून प्रत्येक घरात त्याचे वाटप केले जायचे. या मदतीमध्ये तेथील तरुण मुलांनीही त्यांना चांगली साथ दिली. दानशूर व्यक्तींनी दिलेली मदत एका गरजूपर्यंत पोहोचवण्याचे कामदेखील त्यांनी केले.
जेव्हा इतरांच्या मदतीसाठी एखादी व्यक्ती पुढाकार घेते, तेव्हा स्वतःच्या कुटुंबाची साथदेखील तेवढीच महत्त्वाची असते. मुकेश गावकर यांनादेखील त्यांच्या कुटुंबाची उत्तम साथ मिळाली. घरगुती साथ सोबत असताना त्यांना सोबत असणार्या मित्रमंडळींनी, इतर कार्यकर्त्यांनीदेखील मदतीसाठी दोन हात केले. यावेळी त्यांना त्यांचे युवा मोर्चाचे सहकारी मनीष चौरसिया, पराग भोसले, प्रभाग क्र. २२३चे अध्यक्ष अनिल तिवारी, महामंत्री रमेश वाघेला, पुष्पा पारघी, तसेच प्रभाग क्र. २१३चे अध्यक्ष दीपक हामंद, अल्पसंख्याक मोर्चा द. मु. अध्यक्ष रमेश मेहता, महिला अध्यक्षा वरा लक्ष्मी अलिशेट्टी यांनी साथ दिली. यामध्ये कुटुंबांना जेवण पुरवण्यासाठी महिलांचादेखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. जे. जे. रुग्णालय जवळ असल्याने तेथील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना त्यावेळी काहीच पर्याय नव्हता. त्यांनादेखील हवी ती मदत करणे, त्यांच्या जेवणाची सोय करणे ही सर्व कामे सहकार्यांसोबत गावकर यांनी केली. त्यांच्या या कार्याला दै. मुंबई तरुण भारतचा सलाम!