‘डीआरडीओ’कडून ‘चॅफ’ची निर्मिती

    06-Apr-2021
Total Views | 93

drdo 'chaf'_1  



क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करता येणार


नवी दिल्ली: शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत ‘चॅफ’ तंत्रज्ञान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. ‘डीआरडीओ’च्या जोधपूर इथल्या संरक्षण प्रयोगशाळेने (डीएलजे) या महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. ‘डीएलजे’ने यशस्वीरीत्या विकसित केलेले अद्ययावत ‘चॅफ’ तंत्रज्ञान म्हणजे आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे.



भारतीय नौदलाने या तिन्ही प्रकारांच्या अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर नुकत्याच चाचण्या घेतल्या असून, या संदर्भातली कामगिरी समाधानकारक आढळली आहे. शत्रूच्या रडार आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी ‘चॅफ’ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची ‘चॅफ’ सामग्री काम करते. भविष्यातल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी ‘डीआरडीओ’चे हे तंत्रज्ञान मोलाचे ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उद्योगांना पुरवण्यात येत आहे. या कामगिरीसाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘डीआरडीओ’, भारतीय नौदल आणि उद्योगक्षेत्राचे अभिनंदन केले आहे.



भारतीय नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे हे महत्त्वाचे तंत्रज्ञान स्वदेशात विकसित करण्यासाठी व्यग्र असलेल्या चमूच्या प्रयत्नाची ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनी प्रशंसा केली आहे. धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात विकसित करून मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मोकळे केल्याबद्दल ‘व्हाईस एडमिरल’ जी अशोक कुमार यांनी ‘डीआरडीओ’च्या प्रयत्नांची प्रशंसा केली.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121