
मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी जसे समर्पण व भक्ती यांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अजून एक गुण अंगीकारणे फार महत्त्वाचे आहे. कारण, या गुणांमुळेच समर्पण व भक्तीपर्यंत माणूस पोहोचू शकतो आणि हा गुण म्हणजे ‘डिटरमिनेशन’ म्हणजे दृढनिश्चय किंवा निर्धार.
निर्धार करणे म्हणजे एखादे मोठे ध्येय गाठण्यासाठी मनाची सकारात्मक तयारी करणे व कोणतीही परिस्थिती समोर आली किंवा परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल तरीही मनाची एकाग्रता, निश्चलता, मनाचा समतोल व संतुलन न ढळू देता प्रगतीच्या वाटेवर व ध्येयाच्या दिशेने सतत व अविरत केलेले प्रयत्न म्हणजेच मनाचा निर्धार. मनाचा निर्धार ही फार सकारात्मक शक्ती आहे. कुठल्याही परिस्थितीशी तोंड देणे व त्यात स्वतःची सरशी करून घेण्याचा प्रयत्न करणे हा मोठा गुण आहे, जो माणसाच्या रोगप्रतिकारक शक्तीशीसुद्धा मिळताजुळता आहे. रोगप्रतिकारकशक्ती सुद्धा कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत शरीर व मनाला सांभाळत असते व सहसा हार मानत नाही. शरीर व मन यांच्यामध्ये हा गुण समान असल्यामुळे मनाच्या शक्तीकडून तो शरीराकडे येतो. कारण, मनाची ऊर्जा ही ‘डायनॅमिक एनर्जी’ असते व या मनाच्या ऊर्जेकडूनच मग शरीराकडे ऊर्जा परावर्तित होते. म्हणूनच जर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायची असल्यास मनाची ऊर्जा वाढवणे हा मुख्य उपाय असतो.
एखादी चांगली गोष्ट करण्याचा निर्धार करण्याची सवय जेव्हा माणसाला लागते, त्यावेळी मनाच्या दृढनिश्चयामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होते व या सकारात्मक ऊर्जेमुळे व मनातील निर्धारामुळे हा गुण मेंदूच्या नसांद्वारे (Neurons, Synopsis and Central Peripheral Nervous System) शरीरातील प्रत्येक अवयवाकडे हा निर्धार पाठवला जातो. कारण, शरीरातील मेंदूच्या पेशी व इतर पेशी एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. सकारात्मक ऊर्जा मेंदूकडून मिळाल्यामुळे शरीरसुद्धा प्रतिकारशक्ती वाढवतो. जंतूंना परतवून लावण्याचा निर्धार करते व पर्यायाने माणसाला जंतुसंसर्ग होत नाही. कारण, त्याचा प्रतिकार हा निर्धारामुळे अभेद्य होतो. निर्धार, दृढनिश्चय हा गुण जर आपल्याला अंगी बाणवायचा असेल, तर आपल्या समोर एक फार मोठे उदाहरण आहे, हेलन केलरचे.
हेलन केलर ही जन्मतः मूकबधिर व अंध असूनही त्यांनी आयुष्यात आनंद शोधण्याचा व सकारात्मक जगण्याचा जो अपूर्व निर्धार केला, त्यातूनच त्यांना जग कळत गेले. शारीरिक व्यंग असूनही त्यांनी केवळ मनाच्या निश्चयामुळे, निर्धारामुळे या व्यंगांवर विजय मिळवला. त्याचप्रमाणे आपणही ‘डिटरमिनेशन’ हा गुण जर अंगीकारला तर मनातील चुकीच्या समजुती, अहंकार तसेच भय इत्यादी नकारात्मक गोष्टींवर आपण विजय मिळवू शकतो. निसर्गाच्या शुद्ध व सत्य अशा गुणांना जर आपण निश्चयपूर्वक अभ्यासले, तर मग आपले मन व शरीर हे निसर्गनियमांना पूरक असे वर्तन करते व जेव्हा निसर्गच आपल्या पाठीशी उभा असेल तर आपल्याला रोग कसा होईल?
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी होमियोपॅथी आहेत.)