जुन्या संपादकांचा जुनाच डाव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2021   
Total Views |

Kumar Ketkar_1  
भारतीय संसदेचे राज्यसभा हे सभागृह म्हणजे वरिष्ठ सभागृह. लोकसभेपेक्षा त्यास कांकणभर जास्तच महत्त्व. ब्रिटिश संसदेच्या ‘हाऊस ऑफ लॉडर्स’प्रमाणेच राज्यसभेचे स्वरूप. यामध्ये राज्यांना प्रतिनिधित्व असते, त्यासोबतच कला, शिक्षण, साहित्य आदी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक थेट राष्ट्रपती करतात. राजकीय पक्षदेखील विविध क्षेत्रातील आपल्या सोयीच्या व्यक्तींची नेमणूक करीत असतात. मग त्यात माजी न्यायमूर्ती, कलाकार, प्राध्यापक, खेळाडू, संपादक, पत्रकार अशांचा समावेश असतो. हा अत्यंत चांगला पायंडा भारतीय लोकशाहीचा आहे, कारण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी लोकशाहीमध्ये नक्कीच योगदान देऊ शकतात. काँग्रेसनेही अशाच एका मराठी संपादकाला त्याची विद्वता बघून (किंवा कुटुंबाप्रति असलेली निष्ठा बघून) थेट राज्यसभेवर पाठविले. हे संपादकही काही साधेसुधे संपादक नव्हते, ‘लोकशक्ती’ पाठिशी असलेले ते संपादक होते. आपल्या कार्यकाळात ‘लोकमान्य’तेचा अवमान करून अग्रलेखही यांनी कधी मागे घेतला नव्हता. मात्र, यांचे सर्वांत प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे यांना ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’मध्ये बागडायला खूप खूप आवडते. त्यामुळे त्यांनी लोकशाहीचे खून असलेल्या आणीबाणीचे आणि ती लादणाऱ्या पंतप्रधानांचे जीव तोडून समर्थन करण्याचे दुकान लावले होते. तेवढे करूनही त्यांचे भागले नाही, देशात २०१९ साली निवडणूकच होणार नाही, स्वत: राम जरी खाली आले तरीही मोदी निवडूनच येणार नाहीत, लोया प्रकरणात सत्ताधाऱ्यांचाच हात आहे, मोदी निवडून येणे जागतिक षड्यंत्रच आहे, अशा ‘थिअरीज’ प्रसवायला सुरुवात केली. आता गुरुवारी राज्यसभेतही त्याचे प्रत्यंतर त्यांनी दाखविले. पवारपुरस्कृत ठाकरे सरकारची काळजी करण्याच्या नादात अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या ‘जिलेटिन कांड्यां’चा संबंध थेट श्रीराम मंदिरासोबत लावला. ‘जिलेटन कांड्या’ बनविणाऱ्या कंपनीच्या एका माणसाने राम मंदिराला देणगी दिल्याचे कारण त्यांना त्यासाठी पुरेसे होते. अर्थात, ‘कॉन्स्पिरसी थिअरीज’ हेच जीवनध्येय असलेल्या व्यक्तीकडून ‘कुमारा’वस्था असो, प्रौढत्व असो किंवा वार्धक्य असो; समंजसपणाची अपेक्षा करणे मुळी व्यर्थच!
 

‘केजीबी’च्या रमण्यात रमले सारे

 
‘केजीबी’ ही तत्कालीन सोव्हिएत रशियाची कराल गुप्तहेर संघटना. रशियाचे सध्याचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीनही कधीकाळी ‘केजीबी’मध्ये काम करायचे. तर ‘केजीबी’ने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला होता, त्यामध्ये अर्थातच भारताचाही समावेश होता. अर्थात, या केवळ हवेतल्या बाता नाहीत तर तसे पुरावेही समोर आले आहेत. ‘केजीबी’ने भारतात काय काय केले, याचे साद्यंत वर्णन ‘मित्रोखिन आर्काइव्ज’ या पुस्तकात करण्यात आले आहे. ते वाचल्यावर आपण ज्यांना उत्तुंग समजतो, ते किती खुजे होते हे लक्षात येते आणि एकूणच त्यांचे कचकड्याचे वैचारिक विश्वही स्वच्छपणे दिसते. तर झाले असे की, पं. नेहरू यांचे समाजवादावर आंधळे प्रेम. स्टालिन ढुंकूनही बघत नसताना सोव्हिएत संघाला प्रेमपत्रे पाठविण्याची सवय त्यामुळे भारत सरकारला लागली होती. मग या प्रेमाचा फायदा ‘केजीबी’ने अगदी अलगदपणे उचलण्यास सुरुवात केली. पुस्तकात सांगितल्यानुसार थेट पंतप्रधानांच्या कार्यालयातच मॉस्कोने कम्युनिस्ट कृष्ण मेनन यांना वापरण्यास सुरुवात केली. पुढे त्याचे काय परिणाम झाले हेही देशाने बघितले. त्यानंतर इंदिरा गांधींच्या काळात तर ‘केजीबी’ने देशी कम्युनिस्ट जथ्थे तयार केले आणि ते प्रशासन, कला, साहित्य, शिक्षण, वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रात डावी मंडळी पेरली गेली. त्यांचे पालनपोषण करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकार होतेच. या सर्वांना भारतीय संस्कृती पोखरण्याचे आणि पर्यायाने देशाला विचित्र परिस्थितीत कायम जखडून ठेवण्याचे काम देण्यात आले. त्यामध्ये प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रावर तर विशेष मेहेरनजर ‘केजीबी’ची होती. कारण, तेव्हा वृत्तपत्रे हे समाजमनाला प्रभावित करण्याचे महत्त्वाचे साधन होते आणि तेव्हा वृत्तपत्रे-प्रसारमाध्यमांवर जनतेचा विश्वासही असे. त्यामुळे तेव्हाच्या माध्यममुखंडांना हाताशी धरण्यात आले. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन करण्यासाठी तर ‘केजीबी’ने पैसा अक्षरश: ओतला होता. त्यातूनच मग आणीबाणी कशी योग्य आहे, हे सांगणाऱ्या पत्रकारांची एक पिढीच तयार झाली. त्या पिढीचे पाप आजही देशातील माध्यमक्षेत्र भोगत आहे. कारण आज प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता अशा मंडळींमुळेच धुळीला मिळाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@