अहमदाबाद : अहमदाबादमध्ये एअर इंडिया फ्लाइट १७१ चा भीषण अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि काही प्रवासी गंभीर जखमी झाले. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
या घटनेनंतर टाटा सन्सने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडिया आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, “या अपघातामुळे आम्हीलाही दु:ख होत आहे. शब्दांमध्ये हे दुःख व्यक्त करणे कठीण आहे.
चंद्रशेखरन यांनी सांगितले की, “या अपघातात ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांना टाटा ग्रुपकडून प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत केली जाईल.” ही आर्थिक मदत थेट कुटुंबीयांच्या खात्यात दिली जाईल. याशिवाय, जखमी प्रवाशांचा सर्व वैद्यकीय खर्च टाटा सन्सकडून उचलण्यात येईल.
टाटा सन्सने सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या प्रत्येक प्रवाशाला आवश्यक ती सर्व वैद्यकीय सेवा, इतर मदत दिली जाईल. त्यांनी या कठीण काळात कोणतीही कमी पडू दिली जाणार नाही, असे वकहान दिले आहे.
चंद्रशेखरन म्हणाले की, “या अकल्पनीय काळात आम्ही सर्व प्रभावित कुटुंबांसोबत आहोत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. ही मदत आमची सामाजिक जबाबदारी आहे.” या मदतीच्या घोषणेमुळे अनेकांनी टाटा सन्सचे आभार मानले आहेत. संकटाच्या वेळी टाटांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता समाजात सकारात्मक उदाहरण निर्माण करणारी आहे.