स्वयंसिद्धा राखी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2021
Total Views |
rakhi  _1  H x
 
 
माँसाहेब जिजाऊंचा आदर्श प्रमाण मानून प्रत्येक सुख-दुःखात संकटात स्वत्त्व आणि मानवी मूल्य जपत जीवनक्रमण करणार्‍या साहित्यिक आणि समाजसेविका राखी रासकर यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.
 
 
या दु:खाने माझ्या जीवनी
गाडुनी मातीत
अन् जाळुनी तुम्हाला
फिनिक्स पक्ष्यासारखी
संपुनी पुन्हा नव्याने,
नव्याने जगते मी
 
 
कवयित्री राखी रासकर यांच्याच या काव्यपंक्ती. त्या पुण्यातल्या ‘सत्यशोधक महिला फाऊंडेशन’ आणि ‘सावित्रीबाई फुले जागृती मंच’ या दोन्ही संस्थांच्या अध्यक्षा आहेत. त्या एक उत्तम कवयित्री असून ‘मातृवंदना’, ‘युगनायक-महात्मा जोतिबा फुले’, ‘ज्ञानाई सावित्रीआई फुले’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. त्या पेशाने शिक्षिका असून, आजवर त्यांना शिक्षण, साहित्य आणि समाजसेवेबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
 
 
राखी यांनी कित्येक बालविवाह रोखून मुलींची आयुष्य खुडण्यापासून वाचवली आहेत. इतकेच नव्हे, तर त्या मुलींचे पुढचे आयुष्य सुकर व्हावे यासाठी प्रयत्न केेले आहेत. बालविवाह रोखला म्हणून त्यांच्यावर एकदा प्राणघातक हल्लाही झाला. मुलींनी शिकावे, स्वावलंबी व्हावे म्हणून त्या विशेष प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य वेचले. पुढील काळातही त्यांना बालिका उज्ज्वल भविष्य आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्य करायचे आहे. राखी यांचे सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातले योगदानही मोठे आहे.
 
अंमळनेरचे धनराज पानकर आणि मीनाक्षी पानकर हे माळी समाजातील मध्यमवर्गीय कुटुंब. त्यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक राखी. नक्षत्रासारख्या सुंदर आणि प्रचंड संवेदनशील राखी. राखी यांचे संगोपन केले ते पुण्यातल्या आजीआजोबांनी. आजोबा शिस्तीचे भोक्ते.ते रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज ते स्वातंत्र्य सेनानींच्या कथा लहानग्या राखीला सांगायचे. त्यातही माँसाहेब जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांच्या कथाही अगत्याने सांगायचे. लहान राखीला त्याही काळात या महिला शक्तीचे अप्रूप वाटे.
 
 
पुढील शिक्षणासाठी मग राखी मावशी शोभा सातकर आणि काका लक्ष्मण सातकर यांच्याकडे नवेगाव, धुळे येथे राहायला गेल्या. काका आणि मावशी यांनी राखीच्या वैयक्तिक विकासाकडे प्रकर्षाने लक्ष दिले. राखी यांचे डीएडपर्यंत शिक्षण झाले, नोकरीही लागली. त्यानंतर १९व्या वर्षी त्यांचा विवाह पुण्याच्या रवींद्र रासकर यांच्याशी झाला. तेही समाजशीलच. राखीही त्यांच्यासोबत समाजकार्य करू लागल्या. राजाराणीचा संसार होता. राखींना एक मुलगा झाला. दुसर्‍या बाळाचीही चाहूल लागली. पण, रवींद्र यांना त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री हृदयविकाराचा झटका आला आणि पोटात बाळ असलेल्या आणि वयाची 24 वर्षेही पार न केलेल्या राखींनी त्यांच्या पतीचा मृत्यू डोळ्यासमोर पाहिला.
 
 
दुःखाच्या प्रसंगीच कळते की, कोण आपले कोण परके. सासरच्यांचे म्हणणे आमचा मुलगा गेला. सगळे संपले. दिरांनी कोर्टात केस टाकली की, पतीची पेन्शन आणि इतर मिळकत राखी यांना न मिळता रवींद्रच्या मातापित्यांना मिळावी. राखीचे सासर तुटले. राखी एकट्या पडल्या. सतत रडत असायच्या. स्वतःकडे लक्ष नाही की, खाण्या-पिण्याकडे लक्ष नाही. उणेपुरे सहा वर्षांचे वैवाहिक आयुष्य. आता पुढचे आयुष्य कसे जाईल, ही चिंता. सहाव्या महिन्यात डॉक्टरांनी राखीला सांगितले की, तुमच्या बाळाची वाढ होत नाही. तुम्ही जर असेच रडत कुढत राहाल, तर तुमचे बाळ गतिमंद होऊ शकते. त्या रात्री राखीने निश्चय केला. जे झाले ते झाले. आता रडायचे नाही. राखी यांना दुसराही मुलगाच झाला.
 
 
रवींद्र यांनी मृत्यूआधी एक महिन्यापूर्वीच बँकेतून कर्ज काढून घर घेतले होते. त्यांच्या मृत्यूनंतर या घराचे कर्ज राखी यांच्या डोक्यावर आले. “घराचे कर्ज कसे फेडणार? तू तर विधवा आहेस. मी आहे ना,” असे म्हणत बँकेचा मॅनेजर राखीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू लागला. राखीने त्याला सांगितले की, रवींद्र यांच्या बचत खात्याचे पैसे कर्ज खात्यावर टाका. त्या पैसेही भरायला तयार होत्या. पण, तरीही केवळ राखीला त्रास देण्यासाठी त्याने घरावर जप्ती आणली. मात्र, राखी यांनी पाठपुरावा करून बँकेच्या मुख्य ब्रांचला भेट दिली. त्यांच्यावर झालेला अन्याय सांगितला. राखी यांच्या घरावरचा कब्जा उठला.
 
 
दुसरीकडे गावातल्या एका नगरसेवकाची वक्र नजर राखीवर पडली. त्यानेही नानापरीने राखीला त्रास द्यायला सुरुवात केली. हे सगळे का? तर राखी नक्षत्रासारख्या सुंदर, त्यात तरुण विधवा, एकट्याच लहान मुलांसोबत राहत होत्या म्हणून. अर्थात, खूप जणांना वाटेल हा काय सिनेमा आहे का? पण, ‘जावे त्यांच्या वंशी.’ असो. या काळात राखी यांच्या मनात येऊ लागले की, माता जिजाऊ यांनी तर मुस्लिमांच्या क्रूर राज्यात शिवबांना घडवले.
 
 
लोक सावित्रीमाईंना दगडगोटे मारत. पण, त्या ध्येयापासून विचलित झाल्या नाहीत. आपणही धीटपणे मार्गक्रमण करत राहायचे. त्यांनी समाजाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न केला, तर त्यांना जाणवले की, आपल्यापेक्षाही भयंकर अत्याचार सहन करत असलेल्या मुलीबाळी, लेकी-सुना आहेत. या सगळ्या जणींमध्ये राखी स्वतःला पाहत असत. मग अशा महिलांसाठी त्या लढू लागल्या. हळूहळू समाजात त्यांच्या न्यायकार्यांची वाहवा होऊ लागली.
 
 
साहित्य आणि समाजजागृती यासाठी त्या कार्य करू लागल्या. समाजातल्या महिलांचे प्रश्न सोडवता सोडवता त्या स्वयंसिद्धा झाल्या. आता त्यांना केवळ राखी नाही, तर ‘स्वयंसिद्धा राखी’ असेच म्हणतात. राखी म्हणतात की, “कोणत्याही मुलीने स्वतःला दुबळी अबला समजू नये. माँसाहेब जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या आपण वारसदार आहोत. त्यांना आठवा आणि जगा. प्रत्येक समस्येवर यशस्वी मात करा,” तसेही ‘कोशिश करनेवालों की हार नहीं होती।”



@@AUTHORINFO_V1@@